Tuesday, January 3, 2017

मकरंद बोरीकर

आमचा एक मोठा सॉफ्टवेअरचा प्रोजेक्ट चालू होता. आमचा क्लायंट होता,अमेरिकेचा. तिथला एक मोठा उद्योगसमूह त्यांचा होता. हा प्रोजेक्ट आमच्या कंपनीसाठी खूप महत्वाचा होता. त्यामुळे खूप मोठी टीम, ज्यात भरपूर डेव्हलपर, टेस्टर, डीबीए, इन्फ्रा, त्यांचे लीड्स, प्रोजेक्ट मॅनेजर, रिलीज मॅनेजर, व्हर्जन मॅनेजर, अशी सगळी मांदियाळी कामाला जुंपली होती.

भारतात दोन तीन शहरात तर जोमात काम चालु होतच. पण तिकडे क्लायंटच्या ऑफिसमध्ये म्हणजेच साईटवरसुद्धा आमची मोठी टीम होती. त्या देशातल्या आमच्या कंपनीच्या ऑफिसमध्येसुद्धा काही लोक काम करत होते. असं भौगोलिक दृष्ट्या वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या टाईम झोन मध्ये आमचा प्रोजेक्ट सुरु होता.

त्या प्रोजेक्टची पहिली आणि सर्वात मोठी, महत्वाची रिलीज यशस्वीरित्या झाली. त्यानंतर रीतसर क्लायंटकडून आभाराचे मेल आले. आमच्या कंपनीमधल्या डिरेक्टर, सिनियर मॅनेजमेंट कडून कौतुकाचे, हे ह्या टीममुळेच शक्य झालं, हा सांघिक विजय आहे, आपण असंच काम करत रहायला हवं, वगैरे वगैरे नेहमीचे मेल आले.

पुढच्या रिलीजमध्ये पहिल्या इतके मोठे काम नसल्यामुळे टीममधले काही लोक दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये गेले. काही दिवसांनी अचानक ऑफिसमधली गर्दी वाढलेली दिसली. भरपूर लोक इकडे तिकडे गप्पा मारत उभे होते. पाहतो तर आतापर्यंत ऑनसाईट असलेले लोक आधीची रिलीज संपल्यामुळे भारतात परत आले होते. जवळपास वर्षभराने हे सगळे भारतात आलेले असल्यामुळे उत्साहाचे वातावरण होते.

सगळ्या जुन्या मित्रांच्या गप्पा टप्पा, नव्या लोकांशी ओळखी, हास्यविनोद चालु होतं. हळूहळू ते दुपारपर्यंत ऑफिसमध्ये स्थिरावले. एक वर्षाने ते आजच आले असल्यामुळे त्यांची जागा ठरलेली नव्हती. आणि अशा गोष्टी क्वचितच अगदी योजनाबद्ध, आणि वेळेआधी केल्या जातात. मग त्यांच्यासाठी जागा बघणे, लॅपटॉप कनेक्ट करणे अशी कामे सुरु झाली. मग कोणाला जागा नाही, कोणाच्या डेस्कवर नेट कनेक्शन चालु नाही, अशा समस्या आल्या. त्याचं निराकरण झालं.

त्यांना आता इथे कोणत्या प्रोजेक्टमध्ये टाकायचं हेही पक्कं नव्हतं. सर्वाचंच नाही. काही लोक आधीच दुसऱ्या  प्रोजेक्टमध्ये गेले होते. काही तात्पुरते एखाद्या ठिकाणी काम करत होते. सावकाश हे हि ठरलं आणि सर्वांना प्रोजेक्ट मिळाले.

या लोकांपैकी आमच्यासोबत आला मकरंद बोरीकर. एकदम बोलघेवडा. सतत बडबड करणारा. माझ्यापेक्षा एखाद वर्ष पुढे असेल. उंच. अंगापिंडाने मजबूत. आणि कायम आपल्या दाढीची आणि केसांची नवनवी स्टाईल करणारा.

मकरंद साईटवरून भारतात आला तरी मनाने अजून तिकडेच होता. तिकडे सगळं त्याला इतकं आवडलं होतं कि इकडे प्रत्येक गोष्टीत नाव ठेवण्याला जागा सापडत होती. आणि मुख्य म्हणजे इथे कमवायला संधी कमी, म्हणुन नाराज होता.

चित्र स्रोत : http://insight.choicebroking.in/wp-content/uploads/2015/08/things-to-complete-before-becoming-NRI.png


पहिल्याच दिवशी तो त्याच्या पगाराचं बोलत होता. एका मुलीला सांगत होता, तिकडे तर एकदम भारी होती यार कमाई. ती कधी कुठे गेलेली नव्हती म्हणून तिला फंडे समजावून सांगत होता. आता मी एक वर्ष तिकडे होतो न तर तिकडच्या नियमानुसार तिकडच्या पेरोल वर होतो. कमी दिवस असेल तर फक्त अलोअंस मिळतात. पण माझी केस लॉंग टर्म होती ना, सो मला तिकडच्या पेरोलवर टाकून दिलं. इकडचा पगार बंद. आता मी परत आलोय ना, सो तात्पुरतं माझं आधीचंच पॅकेज चालु होईल. पण आता एचआरवाले ते माझा एक्सपीरियंस आणि परफॉर्मंस वगैरे बघुन रीस्ट्रक्चर करतील. बघु किती मिळतंय ते…

आणि नंतर काही खास मिळालं नाही हे त्याच्या वागण्यावरून समजलंच.

साईटवरून आलेल्या सगळ्यांकडे तिकडे प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर क्लायंटकडच्या माणसांसोबत काढलेला एक ग्रुप फोटो होता. असे वेगवेगळ्या प्रसंगी काढलेले बरेच फोटो लोकांच्या डेस्कवर दिसतात. तसे ह्या लोकांकडे तो फोटो होता. मकरंदच्या डेस्कवर त्यासोबत तिकडचे आणि फक्त तिकडचे आणखीही काही फोटो, आणि स्मृतीचिन्हे लावलेली होती.

साईटवर त्याची भक्ती होती. दिवसा तो भरपूरदा साईटचा जप करायचा. कदाचित म्हणूनच त्याने देवासारखे ते फोटो लावले असावेत.

सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथल्या प्रत्येक गोष्टीचीसाईट शी तुलना करायचा, किंवा गप्पातला प्रत्येक विषय शेवटी साईटवर नेऊन सोडायचा.

ऑफिसमध्ये पोचल्यावर, केवढी ट्राफिक असते यार इथे. किती वेळ लागतो. साले काय फालतू गाडी चालवतात सगळे. तिकडे असं काही नाही. फार शिस्त असते.

काम करताना इथे मजा नाही रे काम करण्यात. ना मजा ना पैसा. साईटवर दोन्ही मिळतं. वाट लागते कधी कधी. ती तर इथेपण लागते. पण तिकडे काही वाटत नाही. कारण तुला पैसे मिळतात ना तेवढे. वर्थ आहे तिकडे.

जेवताना, यार काय बकवास जेवण आहे यार इथे कॅंटीनमध्ये. इंडियामध्ये आहोत तर इंडियन फूड तरी चांगलं पाहिजे ना यार. तेही फालतू. आणि वेस्टर्न फूड तर विचारायचं काम नाही. तिकडे ऑफिसच्या कॅंटीनमध्ये ज्या टाईपचं फूड असेल ते चांगलं असणार. कधी कधी आम्ही इतके इंडियन लोक होतो तर इंडियन फूड पण मागवायचो ते पण एकदम ऑथेंटिक. आणि जवळ इतके आउटलेट होते भारी.

सॉफ्टवेअर डेव्हलप करताना किंवा त्यातले इश्यू सोडवताना अनेक पर्याय असतात. एक गोष्ट बऱ्याच पद्धतीने करता येते. काही पद्धती चांगल्या असतात, काही तितक्या चांगल्या नसतात. काही पद्धतीने एखादा इश्यू लगेच सुटतो, पण पुढे चालुन नवे इश्यू येऊ शकतात. त्यामुळे होईल तितका सर्वांगीण विचार करून त्यातल्या त्यात चांगला पर्याय निवडायचा असतो. त्यामुळे हि निवड सहज सोपी नसेल तर आम्ही चर्चा करतो, एकमेकांचे मत घेतो कारण प्रत्येकजण वेगळा विचार करतो.

अशा चर्चेमध्ये मकरंद सहसा फक्त ते हि गोष्ट साईटवर कशी करायचे हेच सांगायचा. कधी कधी त्या साईटवरून आलेले लोक सहभागी व्हायचे. त्या लोकांमध्ये मकरंदचं एकदम कुल असं टोपण नाव होतं. "मॅक्स".

त्याला मॅक्स म्हटलं कि त्याच्या चेहऱ्यावर जरा चमक यायची. ते त्याला पिन मारायचे. "क्या चल रहा है, मॅक्स? एक इश्यू सॉल्व नाही हो रहा तेरे से? साले अपनी युएस टीम का नाम बदनाम करेगा क्या?"

मग तर बास. अरे आठवतं का, आपण तो इश्यू सोडवायला कसे बसलो होतो दोन तीन वाजेपर्यंत. गेला विषय भरकटत. मग ते दोन तीन वाजेपर्यंत कसे बसले होते. अमका तमका कसा पेंगत होता. मग त्यांना कशी भूक लागली. मग ते बाहेर जाऊन काय खाउन आले. कधी काय पिउन आले. मग तो इश्यू कसा सॉल्व झाला. मग कसा मॅनेजरच्या जीवात जीव आला. वगैरे वगैरे वगैरे.

भारतातला इश्यू तिथल्या तिथेच.

ह्या सगळ्या गोष्टींमुळे बहुतेक त्याचं कामात पण मन लागत नव्हतं. कारण तो असल्या गप्पाच जास्त मारायचा.

ऑफिसमध्ये डेस्कजवळ किंवा आता जिला बे(bay) म्हणतात तिथे होणाऱ्या अवांतर चर्चा सहसा खूप मस्त असतात. सिनेमे, राजकारण, क्रिकेट, फुटबाल, ऑफिसमधल्या बातम्या, अश्या कुठल्याही विषयावर. एक दोघांची चर्चा सुरु होते. आणि बाकीच्यांना रस येतो. आणि एक एक जण त्या चर्चेत उडी मारतो आणि ग्रुप मोठा होत जातो. चर्चा रंगत जाते.

मकरंद अशा चर्चेमध्येसुद्धा कुठून तरी साईट आणायचाच. हळूहळू सगळे याला पकत चालले होते. आम्ही त्याची टिंगल पण करायचो. अरे मक्या, (मॅक्स नाही), हि अमकी गोष्ट तिकडे कशी असते रे? अरे जरा सांगा ना राव आम्हा गरीब लोकांना." फिरकी घेतोय हे त्याच्या लक्षात आलं कि तो म्हणायचा अरे साल्या तू गेला नाही तिकडे म्हणून तुला माहित नाही.

"काय मग भाऊ, कधी जाणार तुम्ही साईटवर?", हा खिजवणारा प्रश्न मी त्याच्याकडून कितीदा तरी ऐकला असेल.

साईटसुद्धा एक चटक लावणारी गोष्ट आहे. एकदा माणसाला ती चटक लागली कि सुटत नाही. भारतात करमत नाही. काही जणांना कुठेही का असेना पण साईटवर जायचेच असते. तर काही जणांना फक्त अमेरिकेचे आकर्षण असते.

साईटमध्येसुद्धा उच्चनीच दर्जा असतो. अमेरिका, इंग्लंड ह्या उच्च दर्जाच्या साईट. बाकी अमेरिकन खंडातले देश, आणि युरोपातले देश जरा दुय्यम दर्जा. ऑस्ट्रेलिया त्यातल्या त्यात बरे. सिंगापूरसुद्धा. पण बाकी चीन, मलेशिया, केनिया, असला कुठला देश सांगितला कि ह्या, हि काय साईट झाली असा प्रश्न विचारतात लोक.

काही जण फक्त पैसा पाहतात. ज्या देशात पैसा चांगला, त्या देशात जायला काही हरकत नाही. बाकी कशाशी देणं घेणं नाही. काही जणांना साईटचे प्रेम नसले तरी एक लवकर पैसे कमावण्याचा मार्ग म्हणुन आकर्षण असते.

एक वर्ष जाऊन येऊ, दोन वर्ष जाऊन येऊ, एवढे पैसे साठवून येऊ, फ्लॅटचं डाऊन पेमेंट करण्यापुरतं कमावु, असे बेत आखून लोक जातात. विशेषतः अमेरिकेत बहुतांश लोक असले बेत फक्त थोडं अजून, थोडं नंतर असे करत पुढे ढकलत राहतात आणि शेवटी तिकडचेच होऊन जातात. परतीची वाट धरणारे फार कमी.

मकरंदला चॉईस दिला असता तर तो तिथेच राहिला असता. नाईलाज म्हणुन फक्त तो परत आला होता. आणि इथे कुढत होता. त्याला पैशाची गरज होती असं नाही म्हणता येणार, पण एकदा तिकडची जीवनशैली अंगवळणी पडल्यावर इकडे जुळवुन घेणं त्याला जमलं नाही, किंवा जमवायचं नव्हतं.

येन केन प्रकारेण, मॅनेजरच्या मागे अक्षरशः धोशा लावून त्याने पुन्हा आपली वर्णी तिकडे लावून घेतली. एकदाचा पुन्हा आपल्या प्रिय साईटवर गेला. तो गेला आणि आम्हाला रटाळ झालेला साईट एके साईटचा जप अखेर बंद झाला.