Saturday, December 19, 2015

वॅली ऑफ फ्लॉवर्स : ४ : वॅलीमधला पहिला दिवस

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे इंग्रजांनी दिलेले नाव आहे. भारतात अजिंठा, लोणार, हि व्हॅली अशा गोष्टींची महती लोकांना कळायला इंग्रज लोकच का लागतात काय कि? विसाव्या शतकात 1931 मध्ये काही इंग्रज गिर्यारोहक चुकून इथे आले आणि त्यांना या सुंदर जागेचा शोध लागला. त्यापैकी एकाने “व्हॅली ऑफ फ्लॉवर्स” याच नावाने पुस्तक लिहिले आणि या नावाने हि जागा प्रसिद्ध झाली.


इंद्राची बाग असाही कुठे तरी उल्लेख वाचला मी. दर वर्षी इथे हिवाळ्यात पूर्ण बर्फ साचतो. हि व्हॅली, घांगरिया, हेमकुंड सर्व बर्फाच्छादित असतं. उन्हाळ्यात तो वितळतो, आणि मगच या ठिकाणी जाता येतं.


हि जागा संरक्षित आहे आणि जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. तेथे फक्त दिवसा फिरता येते आणि मुक्काम करता येत नाही. मुक्कामाला त्यामुळेच घांगरियालाच यावे लागते.


दुपारनंतर पार्क बंद होतो म्हणून जास्त वेळ तिथे घालवायचा असेल तर जितक्या लवकर जाता येईल तितकं चांगलं.


आमचा तो प्रयत्न असला तरी सगळ्यांचं आवरून खाऊन निघेपर्यंत कालसारखा पुन्हा उशीर झाला.


घांगरियापासून व्हॅली 6 किमी अंतरावर आहे. सुरुवातीला प्रशस्त असणारी पायवाट तिथे पोचेपर्यंत चिंचोळी होत जाते. पार्कच्या सुरुवातीला एक परमिट काढावे लागते. ते तीन दिवस वैध असते.





रस्त्यात बरिच चढण आहे आणि दोन तीन धबधबे आणि छोटे प्रवाह पार करून जावं लागत. घांगरिया गाव, तो रस्ता, हिमालयाची शिखरे, सर्व काही अति सुंदर आहे.

ती व्हॅली आणि तिथे जाण्याचा प्रवास सर्वच अप्रतिम अविस्मरणीय. मांझीच्या भाषेत शानदार झबरदस्त झिंदाबाद.



कालसारखा थांबुन गतीभंग होऊ नये म्हणुन मी फार न थांबता पुढे चाललो होतो. त्यामुळे मी एकटाच पुन्हा पुढे होतो. बाकीजण थांबत फोटो काढत येत होते. बाकी ग्रुपमध्ये अंगदकडे प्रोफेशनल कामेरा होता, हरप्रीतकडेसुद्धा सुपरझुम होता. बाकी सर्व जणांकडे आयफोनसारखे भारी फोन होतेच. सर्व आपला फोटोग्राफीचा शौक पुरा करत होते.

एस.एल.आर कॅमेरा गळ्यातच अडकवून चढाईवर जाणे म्हणजे कसरत आहे. माझ्यात थोडं उन असल्यामुळे तेवढा उत्साह नव्हता. काही वेळ मी फोटो न काढताच चाललो होतो. आणि दुसरं म्हणजे आपल्याला तिथलं प्रत्येक पाउल, प्रत्येक व्ह्यु इतका सुंदर वाटतो कि किती म्हणुन फोटो काढणार?

तरी आता डिजिटल क्रांतीमुळे मोबाईल, डिजिटल कॅमेरा वापरून फोटो काढणे, आठवणी जतन करणे इतके सोपे झाले आहे. आणि महत्वाचे म्हणजे स्वस्त झाले आहे. प्रत्येक जण खचाखच क्लिकक्लिकाट करून ढीगभर फोटो काढू शकतो. रोलच्या जमान्यात प्रत्येक फोटो किती विचारपूर्वक काढावा लागायचा.


वॅलीच्या जवळ पोचल्याची चिन्हे दिसत होती. मग मी मोबाईल काढला आणि हिमालयाच्या पार्श्वभूमीवर माझा सेल्फी काढून फोटो काढणे पुन्हा सुरु झाले. तो सेल्फी पुढे बरेच दिवस माझा डीपी होता. तिथून पुढे मग मी जरा निवांत मोबाईलवरच फोटो काढत फिरलो.

उन सुद्धा कमी झालं, थोडा दिलासा मिळाला. पण लगेच आभाळ अगदी गडद झालं आणि मग जरा भीती वाटली. पाऊस पडेल असंही वाटत होतं आणि धुकंसुद्धा दाटून येत होतं. त्या भागात धुकं दाटून सगळं काही दिसेनासं व्हायला वेळ लागत नाही. आणि पुन्हा उन पडून सगळं स्वच्छ व्हायलासुद्धा वेळ लागत नाही. पण या दोन्हीमध्ये किती वेळ जाईल ते सांगता येत नाही. दुपारपर्यंत हे टिकलं असतं तर आजचा दिवस बराच अंशी वायाच. कारण दुपारनंतर तिकडून परतीला निघावेच लागते.

वॅली अगदी जवळ आली आणि तिथे छान पक्षी दिसु लागले. माझा कॅमेरा आता वर काढणे भागच होते. त्यांचे फोटो घेण्याचे निष्फळ प्रयत्न करून झाले. फारच चपळ आणि चंचल पक्षी होते.




मग एक जलप्रवाह पार करायला कामचलाऊ लाकडं आणि पत्रा टाकला होता. तो पार करून आम्ही अधिकृतरित्या वॅलीमध्ये दाखल झालो. आणि समोरचा नजारा पाहून एकदम उल्हसित (पागल) झालो. हिमालयाच्या रांगा, भरपूर हिरवळ, आणि भरपूर फुलं.








दिसेल त्या प्रत्येक फुलाचा फोटो काढणं सुरु झालं. आमचे मॅनेजर जे होते देवकांत संगवान. ते स्वतः आधी काही वर्षांपूर्वी फिरत फिरत इथे आले आणि या जागेच्या प्रेमात पडले. मग पुन्हा पुन्हा आले, आणि हा व्यवसायच सुरु केला. (हेवा वाटतो अशा लोकांचा) ते वॅली आणि हेमकुंड प्रवाशांसाठी खुले असतानाचे वर्षातले ४ महिने गोविंदघाटला येउन राहतात. आणि एक एक आठवडा भरपूर ग्रुप्सला घेऊन फिरतात.




इतकी वर्षे आल्यामुळे त्यांच्याकडे इथल्या जवळपास सगळ्याच फुल पक्षी प्राण्यांच्या फोटो आणि व्हिडीओचा संग्रह आहे. एका भेटीमध्ये सर्वकाही दिसणे शक्य नाही. त्यांनी एक फोटोबुक छापले आहे या फोटोंचे. आम्हाला सगळ्यांना एक एक प्रत दिली होती. आम्ही ती काढुन समोर दिसणाऱ्या फुलाचे नाव शोधत होतो.

पण हा उत्साह खूप टिकत नाही. आपल्याला वैज्ञानिक नाव आणि माहिती जाणून तरी काय करायचं असतं? तेव्हा काही पाठ झालेली नावं आता इथे आल्यावर पुन्हा विस्मरणात गेली. त्या रात्री आम्ही घांगरीया गावात एका छोटेखानी दालनात प्रोजेक्टरवर एक माहितीपट पाहिला. त्यात फुल आणि वनस्पतींची शास्त्रीय माहिती  जरा जास्तच होती. तो पाहता पाहता अंधारात सगळेच झोपले होते. आणि आपण सोडून बाकी लोक सुद्धा झोपले होते हे आम्हाला बाहेर आल्यावर कळलं. शेवटी आपल्याला (म्हणजे आम आदमीला) भावतं आणि लक्षात राहतं ते सौंदर्य.





थोड्या अंतराने तीच तीच फुले असली तरीसुद्धा न थांबता फोटो सुरु होते. कारण प्रत्येक ठिकाणी फुलांचं कॉम्बिनेशन वेगळं होतं. आणि मग ज्याची भीती होती तेच झाले. पाउस सुरु झाला. खूप जोरात नसला तरी कॅमेरा आत ठेवणे भाग होते. मग पुन्हा मोबाईल (पिशवीत गुंडाळुन) फोटो काढणे सुरु.



बरीच गर्दी वाटली त्या दिवशी. आम्ही बरेच पुढे गेलो. पाऊस न थांबता चालू होता. काही जण येताना भेटले. ते म्हणाले आम्ही खूप लवकर आलो इथे, त्यांना पूर्ण उन्हात, बिना पावसात फिरता आलं. आम्हाला उशीर झाला म्हणून मनात जर चरफड झाली.

हिमालयन ऑर्किड
पुढे एका ओढ्याच्या अलीकडे सगळे थांबले होते. तिथे देवकांत एक दुर्मिळ असलेले फुल "हिमालयन ऑर्किड" सगळ्यांना दाखवत होते. पायाखाली काही चिरडू नका म्हणून सगळ्यांना डाफरत होते. ते पाहून झाल्यावर आम्ही परत फिरलो. पुढे पावसामुळे पाणी वाढले होते. आणि पहिल्या दिवशी लोक इथपर्यंतच जातात म्हणून सांगितले.

देवकांत यांनी आम्हाला सांगितले होते कि बाकी सगळे ऑपरेटर एकच दिवस वॅलीमध्ये नेतात. आणि इथपर्यंतच नेतात. मी दुसऱ्या दिवशीसुद्धा नेतो. आणि यापेक्षा बरंच पुढे. तिकडे कोणी नेत नाही. आणि खरंच जेव्हा आम्ही नंतर त्यापुढे बरंच अंतर गेलो, तेव्हा कोणीही तिकडे नव्हतं. फक्त आमचा ग्रुप.

मग परत आलो. पाउस आणि वाऱ्यामुळे थंडी वाजत होती. वॅलीच्या सुरुवातीला एक मोठ्ठी शिळा आहे. तिथे बसायला खडकावर बरीच जागा आहे. तिथेच सगळे जेवत होते. आम्हीपण तिथे जेवायला बसलो. थंडीमुळे पुरीभाजी आणलेली होती, ती एकदम कडक झाली होती. ती खायला जरा कठीण झाली होती. कसंबसं ते संपवलं. आणि परत निघालो. परतीचा प्रवास नेहमीच निवांत आणि मजेत होतो. लवकर लवकर चढुन जाण्याची घाई नसते.

येताना सुदैवाने मला पक्ष्यांचे थोडे फोटो मोठ्या मुश्किलीने घेत आले. एक लाल रंगाचा चिमणी सारखा पक्षी, तितकाच चपळ, सतत इकडून तिकडे उडत होता. लेन्स बदलून फोटो काढायचा प्रयत्न करत होतो, पण बरेच फोटो काढूनही स्थिर आले नाहीत. शेवटी एका जागी बसला, ती लेन्स च्या आवाक्या बाहेरची होती, तरी फोटो काढला. झूम केलेली प्रत इथे टाकली आहे.



आणि एक स्थानिक जातीचे कबुतर. हि जोडी रस्त्या पासून बरीच बाजूला एका झाडावर शांत बसली होती. पण दोघांचा चांगला व्ह्यू मिळत नव्हता. होईल तितके जवळ जाऊन फोटो काढण्याच्या नादात माझे पाय (बूट) शेणात बरबटले. ते साफ करण्याचा एक वेगळा उद्योग करावा लागला.



घांगरीयाला रूमवर आम्लेट, भजे मागवुन त्याच्या सोबतीने गप्पा झाल्या. तिथे असेपर्यंत रोज संध्याकाळी ट्रेक संपल्यावर आम्ही हेच करायचो.

घांगरीया गावात फोनची खूप समस्या आहे. खाली गोविंदघाटला आम्ही नेलेल्या बी.एस.एन.एल कार्डवर फक्त फोन येऊ शकत होते. जात नव्हते. मेसेज जात होते. पण इथे वर आल्यावर मात्र आमचे सगळे फोन बंद पडले. इथे फक्त बी.एस.एन.एल आणि आयडिया चालतं म्हणतात. पण तेही बहुधा उत्तराखंडचेच. आमचे फोन काही चालले नाहीत.

त्यामुळे इथे बाकी गोष्टींचे भाव ठीकठाक असले तरी फोन करणे मात्र एकदम महाग. आयडियाचे वायरलेस लॅंडलाइन फोन वापरून इथे पीसीओ उघडले होते. १० रुपये एका मिनिटाला असा किती तरी पट भाव होता. आणि ते प्रीपेड फोन असल्यामुळे किती पैसे कटले ते दिसायचे आणि राग यायचा. कि आपण काही पैशांच्या कॉलला २०-३० रुपये मोजतोय. पण हे ४ महिने हाच त्या लोकांचा धंद्याचा टाईम. आणि रोज बोलून जरा ओळख झाल्यावर ते लोक थोडी सवलतसुद्धा देत होते.

जेवण झालं. देवकांत विचारत होते कि आता तुमच्यापैकी कोण कोण उद्या पुन्हा वॅली मध्ये येणार? त्यांचं असं विचारण्याचं कारण म्हणजे त्यांनी प्लानमध्ये दोन दिवस वॅलीमध्ये ठेवले होते. एक दिवस असा पाउसपाण्यामुळे जादा असावा हा एक हेतू. आणि जास्त फिरण्यासाठी सुद्धा. पण बऱ्याच लोकांना पहिल्या दिवशी जाऊन आल्यावर दुसऱ्या दिवशी त्राण राहायचं नाही. आम्ही जाणारच म्हणुन सांगितलं.

रूमवर आलो, पुन्हा गप्पागोष्टी करून, भरपूर टीपी करून, आणि उद्या लवकर जायचंच अशी एकमेकांना तंबी देऊन आम्ही झोपलो.