गणपतीपुळे हे गणपतीचे अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे. समुद्रकिनारी वसलेले हे सुंदर गणपतीचे मंदिर आणि गाव याबद्दल सर्वांनी ऐकेलेले असते. बऱ्याच जणांनी तिथे नक्किच भेटसुद्धा दिलेली असेल त्यामुळे त्याबद्दल वेगळे सांगत नाही.
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्यामुळे गणपतीपुळ्याला खूप गर्दी असते आणि हे पक्के व्यापारीकरण झालेले गाव आहे. सगळ्या गोष्टी मग ते जेवण असो कि रूमचे भाडे सर्व बाकी कोकणापेक्षा तुलनेने महाग. आम्हाला महागड्या हॉटेलमध्ये जायचे नव्हते म्हणून घरगुती रूम कॉटेज शोधताना बरेच फिरावे लागले होते. कशीबशी एक रूम आम्हाला मिळाली.
एका ठिकाणी जेवणाला बरीच गर्दी दिसत होती म्हणून तिथे गेलो. भूक लागलेली असताना रात्रीच्या जेवणाला अर्धा पाउण तास प्रतीक्षा करावी लागली आणि तेवढे करून जेवण अगदी नेहमीसारखेच. भाव मात्र नेहमीसारखे नव्हते.
रात्री आम्ही थोडावेळ बीचवर जाऊन गप्पा मारत बसलो होतो. बरीच गर्दी होती तेव्हा पण. छान वाटलं होतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर तयार झालो. आम्ही गर्दीमुळे लवकर मंदिरात जायचं ठरवलं होतं. त्यामुळे त्यानंतर बीचवर पाण्यात उतरायचा आणि मग परत अंघोळी करून आवरायचा आम्हाला कंटाळा आला होता. अक्षयला तर तसाही पाण्यात विशेष रस नव्हता तेव्हा. गणपतीपुळे तसा धोकादायक बीच आहे.
आम्ही सोबत कुर्ते घेतले होते पण सहलीत कुठे वापरलेच नव्हते. मग मंदिरात पण जायचय, बीचवर पाण्यात नाही जाणार, आणि सहल पण संपलीच आता तर कुठे वापरणार, म्हणून आणलेच आहेत तर घालुयात म्हणून आम्ही कुर्ते घातले.
मंदिरात काही वाटले नाही, पण आम्ही तिघेच्या तिघे कुर्ते घालून बीचवर हिंडायला लागलो तेव्हा सगळे आमच्याकडेच बघत होते, आणि आम्ही हसत होतो.
बॅटरी अगदी थोडी चार्ज झाली होती. तिथे आम्ही ठरवलं आता काय शेवटचाच दिवस आहे, काढायचे तेवढे फोटो काढून हौस फिटवून घेऊ.
आणि मग आम्ही भरपूर फोटो काढले. उभे, बसलेले, मयुरचे राजकारण्यांसारखे, सर्व प्रकारचे. "सरकार"ची त्याला प्रचंड क्रेझ होती, त्यामुळे ह्या फोटोंमुळेच ह्या सहलीनंतर त्याचे एक टोपणनाव सरकार असे पडले.
त्यानंतर आम्ही तिथल्या एका कोकण ग्रामजीवन म्युझियममध्ये गेलो. इथे सिद्धगिरी (कोल्हापूर) सारखे एक आभासी कोकणी शैलीचे गाव वसवलेले आहे. आणि गावकऱ्यांची शिल्पे आहेत. पारंपारिक कोकणी गावातले बलुतेदार, त्यांची रोजची कामे करतानाची शिल्पे, यातून कोकणी संस्कृती दर्शविली आहे.
माझे आडनाव खोत आहे. आता माझे कुटुंब तसे देशस्थच आहे. आमच्या कित्येक पिढ्या देशातच वाढल्यात. आमच्या कुटुंबाचा आजोबांनी सांगितलेला इतिहास वेगळ्या पोस्टमधेच लिहावा लागेल. पण खोत हि पदवी मुळची कोकणातली आहे. त्यामुळे ह्या सहलीत अक्षय "देश"पांडे मला कोकणस्थ असल्यावरून, आणि मी माझ्या मुळ ठिकाणी आलोय अशा मुद्द्यावरून चिडवत होता.
त्यात ह्या काल्पनिक गावात खोताचे घर होते. आणि खोताचे अक्खे कुटुंब दाखवले होते. इथली गाईड खोतान्बद्दल माहिती सांगत होती तेव्हा साहजिक माझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य आलं होतं. ते पाहून अक्षय पेटला आणि चिडवायला लागला. मग मी पण हे पहा आमचा इतिहास. लोकांनी जतन करून ठेवलाय. तुमचं आहे का कुठलं असं संग्रहालय देशात? देशपांड्याबद्दल कोणी खास माहिती सांगतात का? म्हणून चिडवलं.
त्याला डिवचायला मी गाईडला वन्समोर करून व्हिडीओ रेकॉर्ड केला. अजून पण अक्षय त्या सहलीची आणि कोकणाची, त्या म्युझियमची आठवण काढून मला चिडवतो, आणि आम्हाला हसायला एक निमित्त मिळतं.
गणपतीपुळ्याला आलो तेव्हा आमचा पास संपत आला होता. त्या पासवर आम्हाला घरी जाण्यापुरता एक दिवस शिल्लक होता. पण अक्षयने धांदरटपणाने आमचे तिघांचे पास हरवून टाकले. आम्ही नीट ठेवायला म्हणून एकाकडे ठेवत होतो. पण दुर्दैव असं कि तो हरवला, आणि सुदैव असं कि तो शेवटच्या दिवशी हरवला.
त्यामुळे परतीचा प्रवास आम्हाला तिकीट काढून करावा लागला. मयुरकडे पासची झेरोक्स प्रत होती पण तिचा काही उपयोग झाला नाही.
तिथून मी ठाण्याला माझ्या काही दिवस काकाकडे गेलो. मयुर अक्षय तिथून घरी परत गेले.
परत आल्यावर आणखी एक किस्सा झाला. मध्ये एकदा मेमरी कार्ड भरल्यामुळे आम्ही एका इंटरनेट काफेमध्ये (अति) दर देऊन फोटो कॉपी केले आणि एक सीडी बनवली. मी तिथे कॅमेरा घेऊन बसलो होतो, आणि तो चार्ज झाल्याशिवाय कनेक्ट होणार नव्हता. म्हणून मी तिथेच बसलो, आणि अक्षय मयुरकडे ५० ची नोट देऊन सीडी आणायला पाठवलं . (त्या सहलीत मी कॅशीअर होतो)
त्यांनी फक्त एक सीडी आणली. आम्ही ती भरली आणि मी ती माझ्या बॅगमध्ये ठेवली. ठाण्याला गेल्यावर मी बॅग उघडली तेव्हा तिचा चुराडा झाला होता. आम्ही तिला कव्हर घेऊन त्यात ठेवायला विसरलो होतो. :D
मी लगेच ह्या दोघांना फोन लावला, आणि फोनवर आमची वादावादी झाली.
"तुला नीट ठेवता येत नाही का? माझ्याकडे द्यायची असती. मी निट ठेवली असती"
"तुझी आणि माझी बॅग वेगळी आहे का? सारख्याच आहेत? कशी ठेवली असती?"
"तुम्हाला सीडी सोबत कव्हर आणायला काय झालं होतं? सगळं सांगावं लागतं का?"
असं आम्ही एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न केला. माझा मूड (सगळ्यांचाच) गेला होता थोडा. नंतर औरंगाबादला आम्ही भेटलो तेव्हाहि वाद घातला.
पण कोणावरहि ढकललं तरी शेवटी व्हायचं ते झालं होतं. आमच्या अर्ध्या सहलीचे फोटो गेले होते. मार्लेश्वरच्या पुढचेच फोटो शिल्लक होते. आणि ते अगदी शेवटच्या भागातले . नशीब तेवढे तरी राहिले.
त्यामुळे ह्या लेख मालिकेतले बरेचसे फोटो, त्या ठिकाणचे असले तरी आमच्या सहलीतले नाहीत. नेटवरून घेतलेले किंवा पुन्हा त्या ठिकाणी काढलेले आहेत.
ते फोटो आणि ते क्षण चित्र स्वरुपात उपलब्ध नाहीत, याची खंत जरूर आहे. पण ह्या सहलीत आम्ही खूप धमाल केली, मजा केली. मस्त अनुभव घेतले. हि आमची पहिली इतकी मोठी सहल होती. ते फोटो दुसऱ्यांना दाखवायला झाले असते, पण त्याची फिल्म आमच्या मनात अगदी ताजी आहे. म्हणूनच मी इतक्या वर्षानंतरसुद्धा ह्या सहलीबद्दल इतकं सविस्तर लिहू शकलो.
हे लिहिताना मी ते क्षण पुन्हा जगलो. आम्ही नेहमीच ते आठवत असतो. हे वाचताना माझ्या मित्रांच्या डोळ्यासमोरूनसुद्धा फ्लॅशबॅक सरकला असेल. हि लेखमालिका आम्हाला ह्या सहलीला जाऊ देणाऱ्या आमच्या आई बाबांना, माझ्या सगळ्या मित्रांना, विशेष करून या सहलीचे सोबती अक्षय आणि मयुर यांना, आणि प्रवासाची आवड असणाऱ्या सर्वांना समर्पित. :)
No comments:
Post a Comment