आज पार्किंगमधून माझी मोटरसायकल काढायला गेलो, आणि तिथे मला माझी गाडी, एका बाजूची गाडी आणि दुसऱ्या बाजूचा खांब या सगळ्याचा आधार घेऊन कोळ्याने विणलेलं बरंच मोठं जाळं दिसलं. सकाळच्या उन्हात त्या जाळ्याच्या रेषा छान चमकत होत्या. फोटो काढावा असंच दृश्य होतं. पण मी घाईत होतो.
एका बाजूला हाताने जाळे साफ करत मी गाडीपर्यंत पोचून गाडीवर बसलो. आणखी हात फिरवून थोडं चेहऱ्यावर आलेलं जाळं काढलं. गाडी काढताना उरलंसुरलं जाळं संपलं. मला थोडं वाईट वाटलं.
मी विचार करत होतो, कि या कोळ्याला हि गाडी म्हणजे काही कायम इथेच राहणारी स्थिर वस्तू नाही, कधी न कधी हि इथून हलणार हे कळलं असतं तर किती बरं झालं असतं…
त्याची ती कैक फुट जाळं विणण्याची मेहनत मी गाडी काढण्यामुळे एका मिनिटाच्या आत वाया गेली होती. आता त्याला आपले सावज पकडायला, आपली रोजी रोटी चालवायला पुन्हा कुठे तरी मेहनत करावी लागणार होती. माणसांच्या दुनियेमुळे आणि अनैसर्गिक दुनियादारीमुळे बाकी सगळ्या सजीवांची किती परवड होते.
त्यांना या जगाशी जुळवून घेण्याशिवाय आणि सोसण्याशिवाय काही पर्याय सुद्धा नाही. आणि आपल्याविरुद्ध लढा देऊन पृथ्वी परत मिळवायला त्यांची संघटना पण नाही. विचार करा, गाय बैल, हत्ती, यासारखे प्राणी जर माणसाविरुद्ध एकत्र झाले तर? शस्त्रास्त्र सोडली तर शरीर बळावर आपण यांच्याविरुद्ध जिंकू शकणं अशक्य कोटीतली गोष्ट आहे.
पण कोळी आणि प्राणीच का? आपल्या हातात तरी किती गोष्टी असतात? त्यांच्यापेक्षा नक्कीच जास्त असतील. पण आपल्याला वाटतं त्यापेक्षा कमीच. त्या कोळ्यासारखे आपणपण कितीतरी गोष्टी गृहीत धरून स्वप्नांची जाळी विणतो. त्यानुसार आखणी काही निर्णय घेतो.
छान व्ह्यू आहे म्हणून कोणी घर घ्यावं आणि समोरची जागा बिल्डरने घेऊन टोलेजंग इमारत बांधावी. चांगली कंपनी म्हणून कोणी रुजू होतं आणि मंदीची लाट यावी.
आपल्यासमोर कायम काही पर्याय असतात. आणि आपण काही गृहितक, समज, अपेक्षा, अशा अनेक गोष्टींमुळे काही तरी निवडतो .
आमच्या कंपनीमध्ये एकदा ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे एका सत्रात बोलण्यासाठी आले होते. ते एक मानसोपचार तज्ञ आहेत हे फार कमी लोकांना माहित असेल. त्यांनी बऱ्याच विषयावरती टिप्पणी केलि.
ते म्हणाले आजकाल तुमच्या पिढीमध्ये सगळ्यात मोठा क्रायसिस म्हणजे पर्याय. तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी इतके पर्याय असतात कि त्यावर विचार करून निवड करण्यातच अर्धा वेळ जातो.
साधं एक कॉफी घ्यायला जावं तर त्यात इतके पर्याय… गरम कि थंड… लाटे कि एस्प्रेसो… दुध हवं कि नको… साखर हवी कि नको… विकेंडला कोणत्या हॉटेलमध्ये जायचं इथून सुरुवात. तिथे गेल्यावर खायला काय यात आणखी पर्याय.
एका अर्थाने पाहायला गेलं तर पर्याय असणं हि चांगलीच गोष्ट आहे. पण कधीकधी अगदी साध्या गरजा आणि आवडी असल्या तर बरेच ताण हलके होतात.
आपण इतका विचार करून पर्याय निवडतो, निर्णय घेतो, म्हणून आपण त्यात भावनिक पातळीवर गुंतत जातो. आपण निवडलेलं घर, गाडी, जोडीदार, नोकरी, मार्ग यात आपण खूप गुंतलेले असतो.
त्यामुळे एखादा निर्णय चुकला, निर्णय घेताना आपण गृहीत धरलेली एखादी गोष्ट चुकीची ठरली तरी बरेच परिणाम होतात. बाकी काही झालं न झालं तरी आपला हिरमोड होतो. आणि माणूस इथेच कमजोर होतो.
ज्या कोळ्याची जाळी मी गाडी काढताना मोडली… त्याच्या भावना तर आपल्यापर्यंत पोचणार नाहीत. पण त्याचा माझ्या गाडीवर जाळं विणण्याचा निर्णय मी चुकवला होता. तो फार काही रेंगाळला नसेल. उद्यापर्यंत पार्किंगच्या दुसऱ्या कुठल्या कोपऱ्यात त्याचं जाळं तयार झालेलं असेल.
त्या कोळ्याने मला हेच शिकवलं. जगात काहीच चिरकाल टिकणार नाही. काही गोष्टी लगेच जातील, काही जरा उशिरा… आपलं काम जाळं विणून सावजाची वाट पहायचं आहे. इथे नाही तर तिथे.