Wednesday, November 23, 2011

पहाटे ५ वाजता...

आज कशी कोण जाणे मला पहाटे ५ वाजताच जाग आली. स्वप्नात आठवत नाही काय पाहत होतो.. पण औरंगाबाद जवळचं कुठलं तरी ठिकाण डोळ्यांसमोर होतं. जाग आली तेव्हा समोरच्या मोठ्या खिडकीतून मोकळं मैदान आणि त्यापलीकडच्या हिरानंदानी इस्टेटच्या भव्य इमारतींच दृश्य दिसत होतं. मी कुठे आहे आणि काय दिसतंय समोर याचं भान येण्यात काही क्षण गेले.

माझं असं बऱ्याचदा होतं. पहाटे गाढ झोपेत कसली कसली स्वप्नं रंगत असतात. दोन तीन ठिकाणे, खोल्या, व्यक्ती सगळं जग मिक्स होऊन काही तरी वेगळाच कॉकटेल मसाला तयार होतो. मी कॉलेज शाळा ऑफिस सगळ्या ठिकाणच्या लोकांना घेऊन कुठले वर्ग करत असतो, कधी जहाजावर असतो... कधी एकटाच कुठल्या मिशनवर, कधी कुठल्या प्रयोगशाळेत.. माझी आई मला सकाळची शाळा आणि क्लास असताना उठवायचे कष्ट घ्यायची तेव्हा मी अशा जगात असायचो. तिला पण त्याच जगात समाविष्ट करायचो. तिने मला उठवताना मी कसले कसले फोर्मूले, इक्वेशन्स, प्रोग्राम्स, असली बडबड केलीये तिच्या समोर. :D भानावर यायला वेळ लागायचा. आज तसंच झालं.

मग उठून समोर पाहत उभा राहिलो. मस्त दृश्य असतं ते. रात्री अंधार पडल्यापासून ते सकाळी उजाडेपर्यंत. अनेक इमारती.. त्यांच्यातून जाणारा रस्ता.. पथदिवे.. इमारतींच्या सदनिकांचे दिवे. दिवाळीसारखा अनुभव येतो. सकाळी उठल्यापासूनच माझा असा साहित्यिक मूड होता. समोर बराच दूर जो रस्ता होता, त्यावरून एखादी गाडी गेली तरी घरातल्या सगळ्या सावल्या हलत होत्या. समोरचे दिवे पाहून मी विचार करायला लागलो.. प्रत्येक दिवा एका घराचा. आणि तो दिवा सुरु असण्यामागे काही तरी गोष्ट. कोणी रात्री दिवे बंद करायचा विसरून झोपले.. कोणी पहाटे उठून दिवसाच्या तयारीला लागले.. तर कोणी भीतीमुळे बंदच नसतील केले. कुठे एखाद्या निशाचाराने वाचन अथवा चित्रपटांच्या संगतीत रात्र जागवली असेल.इतक्या सकाळी उठल्यामुळे मी कधी नव्हे ते ठाण्यामध्ये थंडी अनुभवली. काही वेळात माझ्या मोबाईलचा गजर सुरु झाला. मला आठवले मी किती तरी दिवसांपूर्वी सकाळी लवकर उठायला हवे या उद्देशाने तो लावला होता. रोज वाजत असेल. आज मी प्रथमच ऐकला कित्येक दिवसात.

आज उठलोच होतो तर थोडे सूर्यनमस्कार घातले. आणि संगीत-वादक (music player) घेऊन फिरायला निघालो. बाहेर छान थंडी होती. इतक्या हौसेने घेतलेलं जाकेट मुंबईला घेऊन येण्याचं सार्थक झालं. संकुलातून बाहेर पडलो, आणि वर चंद्राचे दर्शन झाले. निरलस सुंदर अशी चंद्रकोर. आजची पहाट सर्वांग सुंदर करण्याचा देवाने घाटच घातला होता वाटतं.

रॉकस्टार मधलं 'फिर से उड चला' हे प्रसन्न गाणे ऐकत मी फेरफटका सुरु केला. इतक्या पहाटेसुद्धा लोकांची माफक वर्दळ होतीच रस्त्यावर. पेपरवाले, दुधवाले, लोकांकडे पहाटे कामावर जाणाऱ्या बायका, शाळेत निघालेली मुले, छोट्यांसोबत बस थांब्यावर उभ्या आया, कामावर निघालेले मजूर, सकाळच्या पाळीसाठी निघालेले गणवेशातील लोक.. असे अनेकजण. बहुतेकांच्या चेहऱ्यावर अर्धवट राहिलेली झोप, अनावर जांभया, थोडा कंटाळा, पण नाईलाज म्हणून रोजीरहाटीला सरावलेले लोक.

गाणे ऐकत मी रमतगमत सगळ्यांची मजा पाहत चाललो होतो. समोरून घाई-घाईमध्ये बस स्टोपकडे चाललेल्या माणसाच्या रस्त्यामध्ये मी आलो, किंवा तो माझ्या रस्त्यामध्ये आला. अचानक आलेल्या अडथळ्यामुळे तो त्रासला आणि माझ्याकडे तसलाच त्रासिक दृष्टीक्षेप टाकला. त्या दृष्टीक्षेपात क्षणिक त्रासापलीकडे काहीही नसावं. पण मला त्या भावांमधून वेगळीच जाणीव झाली.

उणंपुरं १ वर्ष हि नाही झालं मला नोकरीला लागून. पण आतापासूनच वेळ नाही, निवांतपणा नाही असल्या फाजील तक्रारी करणाऱ्या माझ्याकडे असं रोज मनाजोगतं झोपण्याइतका, कधी लवकर उठलोच तर गाणी ऐकत निवांत , पहाटेच्या सौंदर्याचा साहित्यिक अनुस्वाद घेत रमण्याचा निवांतपणा तर नक्कीच आहे. का तक्रार करत राहून दुखी व्हायचं?

मला एक दृष्टांतच झाला. मला असे देवाचा आपल्यावर हात असल्याचे दृष्टांत वारंवार होत राहतात. :D आणि नेहमीप्रमाणे दृष्टांत झाल्यावर मी देवाचे आभार मानले.

लोकांचे अनेक प्रकार पाहिले. उत्तम आरोग्याचा वरदान लाभलेले आणि टिकवण्यासाठी फिरणारे लोक, वजन कमी करण्यासाठी फिरणारे लोक, कामासाठी फिरणारे लोक, ज्येष्ठ नागरिकांचे कट्टे, मजा करत क्लासला निघालेले मित्रांचे घोळके, एक तरुण प्रेमी युगुल.. स्वतःतच इतकं मश्गुल, कि आजूबाजूच्या जगाचं भान नाही. त्या सोनेरी किनारीच्या निळ्या-जांभळ्या पहाटेमध्ये त्यांनी आपला गुलाबी रंग भरला होता. एक आई आणि छोटीशी गोड मुलगी वाद घालत होत्या शाळेत न जाण्यावरून. कोणी बेंचवर पेपरमधून बातम्या वाचण्यात दंग.

सगळ्यांचे निरीक्षण करत माझी भटकंती सुरु होती. मी राहतो ब्रह्मांड परिसरात, ठाण्याला. तिथून जवळच आझादनगर चौकात ब्रह्मांडाची शिल्पकृती आहे.. त्या वर्तुळापर्यंत पोचतानाच मला धाप लागली होती. पायात गोळे आले होते. चालण्याचा सरावच सुटलाय. एके काळी आळंदी-पंढरपूर वारी केलेला मी. गेल्याच पावसाळ्यात कैक किल्ल्यांच्या सफरी हिरीरीने केलेला मी. आज माझी हि अवस्था होती. त्या वर्तुळाला प्रदक्षिणा घालून परत फिरलो तेव्हा साक्षात ब्रह्मांडाला प्रदक्षिणा घातलेल्या कार्तिकेयासारखी विजयी भावना मनात आली. थोडीसी लाजसुद्धा. रोज फिरायचा निश्चय केला मनाशी. आतापर्यंत अनेकदा केलाय तसा.

काही का असेना, आज अभावितपणे उगवलेली पहाट मला बहुमोल आनंद आणि प्रसन्नता देऊन गेली. स्वतःला हा आनंद वारंवार देण्याचा निश्चय मी तर केला खरा. बाकी योग घडवणे ईश्वराधीन. :)