चेक इन झालं. सिक्युरिटी, इमिग्रेशन सगळं झालं. आता फक्त विमानाची वाट बघत बसायचं. यावेळी पाय निघत नाहीये इकडुन. बाबा आता अर्ध्या रस्त्यात असतील. असं वाटतंय त्यांना फोन करून पुन्हा बोलवावं, आणि तिकीट कॅन्सल करून पुन्हा घरी जावं. पण किती दिवस राहणार असं. आज ना उद्या तर पुन्हा स्वतःच्या घरी सॅनफ्रॅन्सिस्कोला जावंच लागेल.
किती दिवसांनी एवढी मजा आली, एवढी हसले खुलून मी. दीपेशला कितीदा म्हटलं चल सोबत, तर काही आला नाही. कामाचा आणि सुटीचा बहाणा केला. खरं कारण बोलुन नाही दाखवलं तरी दोघांना माहित आहे.
यावेळेस त्याच्या एका आतेबहिणीचं लग्न तर होतंच पण माझ्या बॅचचं रीयुनियनसुद्धा होतं पहिलं. इतक्या वर्षांनी पहिलंच. ते मला चुकवायचं नव्हतं, आणि ते नेमकं त्याला टाळायचं होतं. झालं मग. त्याने भारतात यायचंच टाळलं. त्याच्या बाजूच्या लग्नात मीच आईबाबांसोबत लावली हजेरी प्रतिनिधी म्हणुन. आणि रियुनियनलासुद्धा गेले एकटीच.
किती मजा आली. सगळे आपापल्या नवराबायकोला घेऊन आले होते. म्हणजे ज्यांची लग्न झालीयेत ते. काहीजण अजूनही एकटे जीव सदाशिव. मी लग्न झालेली असून एकटीच गेली होते. सगळे मला विचारत होते काय गं राधा एकटीच का आलीस. दीपेशला का नाही आणलं. दिपेशचाच कामाचा बहाणा सांगुन दिली उत्तरं त्यांना. तरी बरं खोलात नाही शिरले कोणी.
या वेळेस जाणवलेला सगळ्यात सुखद बदल म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड तनु. केवढी बदलली आहे ती. तिचा पोशाख, वावर, आत्मविश्वास सगळंच नवीन. लग्न मानवलेलं दिसतंय तिला. तिचा नवरा गौरवपण आला होता रियुनियनला. सगळ्यांत मिसळला. ओळखी करून घेतल्या. जोडी आवडली सगळ्यांनाच.
तनु जशी सगळ्यांशी बोलत होती, उत्साहाने गेम्स गाणीवगैरेमध्ये भाग घेत होती ते पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. हे कॉलेजमध्ये असताना मुळीच नव्हतं तनुचं. शांत असायची. आपल्यात गुंग. माझ्यासोबत यायची सगळी कडे. पण सोबतीपुरतीच. तिचा स्वतःचा सहभाग कमी असायचा खुप. आता फारच फरक पडलाय. मस्त दिसतेय काय, हसतेय काय.
तो सुजय तर बोललासूध्दा. लग्नानंतर कसा सगळ्यांमध्ये वेगवेगळा फरक पडतो पहा. राधा काकूबाई झाली, आणि तनु तर आधीपेक्षा यंग दिसतेय. विक्षिप्तच आहे तो आधीपासून. कुठे काय बोलावं याची जरासुद्धा अक्कल नाही.
एक दिवस तनु घरी राहायला येऊन गेली. दिवस कमी पडला आम्हाला बोलायला. अमेरिका आणि भारतात दिवस रात्रीचा फरक. वेळेची गणितं सांभाळून दोन्हीकडचे आई बाबा, महत्वाचे नातेवाईक यांच्याशी फोनवर बोलणं झालं तरी पुरे. तनुशी मेसेज आणि फोनवर कितीही बोललं तरी समोर आल्यावर अजून विषय निघतात.
तिच्यात लग्नामुळे म्हणजे खरं तर गौरव मुळे फरक पडला हे निश्चित.
मी कॉलेजात असताना पॉप्युलर होते. बऱ्याचजणांनी प्रपोज केलं मला. तनु दिसायला पण साधी होती आणि राहायची पण अगदी साधी. तिच्या वाट्याला कोणी फारसं जायचं नाही. पण ती माझी बेस्ट फ्रेंड होती. आम्ही नेहमी सोबत असायचो. त्यामुळे माझी मैत्रीण म्हणून ती पण सगळ्यांना माहित होती.
तिला याचा कधीकधी राग यायचा. म्हणायची मी पिक्चरमधल्या सारखी सुंदर हिरोईनची साधी मैत्रीण वाटते सगळ्यांना. काही मुलं माझ्याकडे येऊन तुझ्याबद्दल बोलतात. मी काय नोकर आहे का तुझी. पण यात माझी काय चूक होती? हे तिलासुद्धा माहित होतं. म्हणून यायची पुन्हा नॉर्मलवर.
आपण बरं आपलं काम बरं असा तिचा स्वभाव होता. कॉलेजच्या फेस्टिवल्समध्ये तिचा क्रिएटिव्ह गोष्टीत सहभाग असायचा खरा. पण होस्ट करायला, बाकी कॉलेजमध्ये जाऊन प्रमोशन करायला मलाच सांगायचे. मला आणि अजून अशा कॉलेजमधल्या गुड लुकिंग मुलामुलींना. हे मार्केटिंगचे फंडे, कॉलेजात पण वापरतात. चांगले चेहरे जिकडे तिकडे दिसायला हवेत.
मला सहानुभूती वाटायची कधी कधी. आज तिला माझी स्थिती सांगितली तर तिला सहानुभूती वाटेल माझ्याबद्दल. असो.
मी फक्त सुंदर होते असं नाही. हुशार पण होते. मार्क्स नेहमी चांगले असायचे, अभ्यास चांगला करायचे. पण हे कोणाला दिसत नसावच. माझी ओळख कॉलेजातली मस्त पोरगी म्हणुनच होती. तनु माझी बेस्ट फ्रेंड तर होतीच. पण बाकीपण ग्रुप होता आमचा मोठा. मुलं आणि मुली दोन्ही होते त्यात.
पण काही छपरी पोरांना राग यायचा याचा. माझ्या जोड्या लावायचे कोणा कोणासोबत, कमेंट्स पास करायचे. बाकी मुलांशी बोलते आणि त्यांच्याशी बोलत नाही याचा राग असावा बहुतेक. ते चांगले वागले असते तर का नसते बोलले त्यांच्याशी? तनुला तसा त्रास कमी होता तुलनेने. तसा सगळ्याच मुली बायकांना इकडे तिकडे रस्त्यावर वगैरे काही न काही त्रास होतच असतो. पण जितकं रूप चांगलं तितका त्रास जास्त असं मला वाटतं.
बऱ्याच जणांना मी शिष्ट वाटते. माझे हावभाव शिष्ट वाटतात. दिसत असेल काही चेहऱ्यावर. मला अगदी नाही नाही म्हणायचं. पण सगळीकडे सगळ्यांचा वळलेल्या माना, रोखलेल्या नजरा, एक्सरेसारखी फिलिंग याचा काही परिणाम होत नसेल का चेहऱ्यावरच्या हावभावांवर?
मुलींमध्ये लोक रूपापेक्षा दुसरं काही बघतात का असा मला प्रश्न पडतो. म्हणजे मुलींकडे अक्कल पण असते, त्या आपलं डोकं वापरू शकतील अशी अपेक्षाच नसावी लोकांना. आणि सुंदर मुलींना अक्कल कमी असते हा तर सगळ्यांचा आवडता डायलॉग आहे.
लग्नाआधी माझं रिलेशनशिप होतं पंकजशी एक दोन वर्ष. त्यानेसुद्धा रूप सोडून दुसरं काही पाहिलं नाही असंच वाटतं. ऑफिसमध्येच भेटला. लगेच अट्रॅक्ट झाला. "लव्ह अँट फर्स्ट साईट" म्हणायचा तो. माझा आता या गोष्टींवरचा विश्वास उठलाय. फर्स्ट साईट म्हणजे तुम्ही काय बघता? फक्त रूप. तुम्हाला त्या व्यक्तीचा स्वभाव कळतो? आवडी कळतात? बॅकग्राउंड कळतं?
सुरुवातीला छान वागायचा तो. पण नंतर मी त्याच्याच ऑफिसमध्ये काम करते, मला पण तेवढाच ताण असतो, सुटीला दुसरे काही प्लॅन असू शकतात, मी माझ्या आधीच्या मित्र मैत्रिणी (खास करून मित्र) यांच्यासोबत कुठे जाऊ शकते. हे सगळं विसरून वागायचा. म्हणजे या "लव्ह अँट फर्स्ट साईट"मध्ये फक्त फिजिकल अट्रॅक्शन आलं तर. बाकी आपलं व्यक्तिमत्व आणि आयुष्य राहिलं बाजुला. भांडणं होऊन होऊन शेवटी संपलं एकदाचं रिलेशन.
ऑफिसमध्ये बाकी लोकांचं पण तेच. मी न मागता मला जास्त अटेन्शन मिळायचं. माझ्या सोबत जॉईन झालेल्या लोकांमध्ये, मुलींना, त्यातल्या त्यात आम्हा एक दोघींना जास्त तत्परतेने मदत मिळायची. मग साहजिकच बाकीजण हे कडवट नजरेने बघायचे.
मी हुशार होतेच. मेहनत पण करायचे बरीच. कशात काही कौतुक झालं, किंवा अवॉर्ड, प्रमोशन वगैरे मिळायचं. तेव्हा लोकांना माझी मेहनत दिसायची नाही. मी सुंदर आहे म्हणून मला एवढा भाव मिळतो, असाच भाव त्यांच्या चेहऱ्यावर असायचा. फक्त मुलांच्याच नाही तर मुलींच्यासुद्धा.
कंटाळा आला होता मला या सगळ्याचा. आणि पंकजबद्दल घरी सांगितलेलं होतंच. त्याच्याशी ब्रेकप झालं तेव्हा काही दिवस थांबून आईबाबांनी माझ्या लग्नाचं मनावर घेतलं.
नातेवाईक पण हेच बोलायचे. एवढी सुंदर आहे आपली मुलगी, हजार चांगली स्थळं येतील. म्हणजे मी शिकलेली होते, चांगल्या नोकरीला होते, याचं काही महत्व नव्हतं.
दीपेशचं स्थळ आलं. दिसायला खूप भारी नसला तरी स्मार्ट आहे दीपेश. स्वभावाने पण छान आहे. त्याच्या घरचे पण आवडले सगळ्यांना. त्याच्या अमेरिकेतल्या नोकरीचं कौतुक तर होतंच.
मला इथल्या ह्या वातावरणाचा कंटाळा आला होता. दीपेशला तो सुटीवर भारतात आला असताना दोन तीनदा भेटले. तो आवडला, त्याला मी आवडले. अमेरिकेत गेल्यावर, स्थिर स्थावर झाल्यावर नोकरी बघायची असा माझा बेत होता. त्यानेही माझ्या काम करण्याला कसली हरकत घेतली नव्हती. मी त्याला होकार दिला, आणि लग्न करून भारतातली नोकरी सोडून अमेरिकेत आले.
झालं. पैसे पाहून अमेरिकेतला नवरा पकडला, असा सगळ्यांचा समज झाला. तो माझ्या तुलनेत दिसायला ठीक ठाक असल्यामुळे पैसे पाहूनच लग्न केला अशी खात्रीच पटली सगळ्यांची. आमची जोडी पाहून लग्नात काही जणांनी "लंगूर के हाथ अंगूर" असल्या छापाच्या थेट किंवा छुप्या कमेंट्स पण केल्या. मला वाटतं प्रॉब्लेम तिथूनच सुरु झाला.
दीपेश सुरुवातीला खूप छान राहिला. स्वभाव चांगलाच आहे त्याचा. आम्ही हनिमूनला गेलो, तेव्हा मी सर्व प्रकारचे ड्रेस नेले होते, ते सगळे त्याला आवडले. कुठल्याच ड्रेसला त्याने कसली आडकाठी केली नाही. भरपूर फिरलो आम्ही, एन्जॉय केलं. फोटो काढले,
पहिल्या वर्षी आम्ही प्रत्येक सण, प्रत्येक ऑकेजन खूप उत्साहाने साजरे केले. भारताबाहेर भारतीय लोक जरा जास्त जवळ येतात. आम्ही अशा कार्यक्रमांना जायचो, गेट टुगेदर्स ना जायचो. आमच्या घरीसुद्धा आम्ही बऱ्याचदा पार्टी केली. आम्ही बरेच फोटो काढून आमच्या ग्रुप्स मध्ये, फेसबुक वर टाकायचो.
त्याच्या काही बावळट मित्रांनी भाई थोडा फेअर अँड हँडसम लगा ले, भाभी के सामने अच्छा लगेगा, असल्या कमेंट टाकल्या. इथून जरा दीपेशचा मुड बदलायला लागला.
मला जे अटेन्शन आधीपासून मिळतं ते त्याला खुपायला लागलं. आमच्या रूपात जो फरक आहे त्यामुळे त्याच्या मनात एक अढी, एक कॉम्प्लेक्स निर्माण झाला. त्याने माझ्या ड्रेसमध्ये लक्ष देणं सुरु केलं. मी बाहेर जाताना जास्त तयार झालेलं त्याला खटकायला लागलं. मी अगदी साधं राहावं अशी त्याची अपेक्षा होती. आमची भांडणं सुरु झाली.
आमचं बाहेर जाणंच हळू हळू कमी झालं. हे फोटो शेअरिंग वगैरे त्या फालतू कमेंट्सनंतर तसंही जवळपास बंदच झालं होतं. मला आता घरात बसून कंटाळा आला होता. आणि पुरेसा ब्रेक झाला होता. मी नोकरीचा विषय काढला. त्याने आता आढेवेढे घेणं सुरु केलं. पण मी हट्टाला पेटून नोकरी मिळवलीच.
अगदी साधे कपडे घालून, काहीच विशेष तयार न होता मी ऑफिस ला जाते. रोज सकाळी दीपेशचं माझ्या कडे लक्ष असतं. मी कशी तयार होऊन जाते हे तो बारीक नजरेने पाहत असतो. बोलत नाही. पण वाद नको म्हणून मीच काही करत नाही.
पण मला नाही आवडत हे असं मन मारून जगणं. तयार होणं, छान दिसणं, बाहेर जाणं, लोकांत मिसळणं हे आपण फक्त दुसऱ्यांसाठी करतो का? हे सगळं करून आपल्याला सुद्धा छान वाटतं ना? आपण आपल्यासाठीसुद्धा काही नको का करायला? जाऊ दे.
तनुचं माझ्या उलट. दिसायला, राहायला साधी सावळी. कॉलेजात, ऑफिसात कुणाच्या अध्यात न मध्यात अशी राहायची. तिचं लग्न जुळायला तसा वेळ लागला जरा. बऱ्याचदा पत्रिकेचं कारण सांगुन नकार यायचा.
मी आणि दीपेशसारखे गौरव आणि तीसुद्धा लग्ना आधी काही वेळा भेटले. त्यांना एकमेकांचा स्वभाव आवडला. त्याचं लग्न झालं तेव्हा मी गडबडीत भारतात येऊन गेले. गौरवशी भेटणं बोलणं तर जमलं नाही. पण आत्ता तनु भेटली तेव्हा गप्पा मारताना त्याच्याबद्दल भरभरून बोलली.
गौरव तिच्यापेक्षा दिसायला उजवा आहे. हे तिच्या आणि त्याच्या दोन्हीकडच्या नातेवाईकांनी टिप्पणी करून आपलं मत नोंदवलंच. असे कुचकट लोक आपले नातेवाईक का असतात, आणि का आपण त्यांना भाव देतो? दीपेशसुद्धा कोण कुठल्या लोकांच्या मनात आमची जोडी कशी दिसते हे एवढं मनावर का घेऊन बसलाय?
गौरवला तनुचं खूप कौतुक आहे. त्याचं पण तिच्या ड्रेसेसकडे, मेकअप कडे लक्ष असतं. पण वेगळ्या अर्थाने. तो तिच्या सगळ्याच गोष्टींत खूप इंटरेस्ट दाखवतो. तिचं कौतुक करतो. त्यामुळे हळू हळू तिने पण स्वतःकडे जास्त लक्ष देणं सुरु केलं. फटाफट शॉपिंग उरकणारी ती बाकी मुलींसारखी चुझी होत गेली. कुणी कौतुक करणारं असलं कि आपोआप आपल्यामध्ये रिफ्रेशिंग फिलिंग येते. उत्साह येतो.
मला तिचा हेवाच वाटायला लागला. ती इतकी सुंदर नाही, त्यामुळे गौरवला कसली चिंता नसेल, त्याला सेफ वाटत असेल म्हणुन तो इतका छान राहत असेल असा निरर्थक विचारसुद्धा माझ्या मनात येऊन गेला.
पण नाही. मी भेटले ना गौरव ला. रियुनियनला, तनुच्या घरी जेवायला गेले तेव्हा. तो ज्या नजरेने, ज्या प्रेमाने तनु कडे बघतो, त्या नजरेने दिपेशने मला पाहिलं, तर मला मी कोणते कपडे घालतेय, मेकअप करतेय कि नाही याचं काहीच वाटणार नाही. बाकी कोणी मला काकूबाई म्हटलं तरी काही वाटणार नाही.
तुमच्या आयुष्यातली माणसं, वातावरण, सुख दुःख, हे सगळं तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. देहबोलीत दिसतं. जो माणूस आनंदी असतो, खुलून हसतो, तो सुंदरच दिसतो. रूढार्थाने सुंदर अशी मी, पण मी माझ्या बॅचमेटला काकूबाई वाटले, आणि रूढार्थाने साधी अशी तनु, ती छान चमकत होती.
प्रत्येक लहान बाळ आपल्या सगळ्यांना क्युट वाटतं. मग तेच मोठं झाल्यावर काय होतं?
आज मला पटलं. सौंदर्य हे माणसाच्या मनात असतं. विचारांत असतं. पाहणाऱ्याच्या नजरेत असतं.
No comments:
Post a Comment