Showing posts with label Fiction. Show all posts
Showing posts with label Fiction. Show all posts

Sunday, October 2, 2016

ब्लॅक अँड व्हाईट

चेक इन झालं. सिक्युरिटी, इमिग्रेशन सगळं झालं. आता फक्त विमानाची वाट बघत बसायचं. यावेळी पाय निघत नाहीये इकडुन. बाबा आता अर्ध्या रस्त्यात असतील. असं वाटतंय त्यांना फोन करून पुन्हा बोलवावं, आणि तिकीट कॅन्सल करून पुन्हा घरी जावं. पण किती दिवस राहणार असं. आज ना उद्या तर पुन्हा स्वतःच्या घरी सॅनफ्रॅन्सिस्कोला जावंच लागेल. 

किती दिवसांनी एवढी मजा आली, एवढी हसले खुलून मी. दीपेशला कितीदा म्हटलं चल सोबत, तर काही आला नाही. कामाचा आणि सुटीचा बहाणा केला. खरं कारण बोलुन नाही दाखवलं तरी दोघांना माहित आहे. 

यावेळेस त्याच्या एका आतेबहिणीचं लग्न तर होतंच पण माझ्या बॅचचं रीयुनियनसुद्धा होतं पहिलं. इतक्या वर्षांनी पहिलंच. ते मला चुकवायचं नव्हतं, आणि ते नेमकं त्याला टाळायचं होतं. झालं मग. त्याने भारतात यायचंच टाळलं. त्याच्या बाजूच्या लग्नात मीच आईबाबांसोबत लावली हजेरी प्रतिनिधी म्हणुन. आणि रियुनियनलासुद्धा गेले एकटीच. 

किती मजा आली. सगळे आपापल्या नवराबायकोला घेऊन आले होते. म्हणजे ज्यांची लग्न झालीयेत ते. काहीजण अजूनही एकटे जीव सदाशिव. मी लग्न झालेली असून एकटीच गेली होते. सगळे मला विचारत होते काय गं राधा एकटीच का आलीस. दीपेशला का नाही आणलं. दिपेशचाच कामाचा बहाणा सांगुन दिली उत्तरं त्यांना. तरी बरं खोलात नाही शिरले कोणी. 

या वेळेस जाणवलेला सगळ्यात सुखद बदल म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड तनु. केवढी बदलली आहे ती. तिचा पोशाख, वावर, आत्मविश्वास सगळंच नवीन. लग्न मानवलेलं दिसतंय तिला. तिचा नवरा गौरवपण आला होता रियुनियनला. सगळ्यांत मिसळला. ओळखी करून घेतल्या. जोडी आवडली सगळ्यांनाच. 

तनु जशी सगळ्यांशी बोलत होती, उत्साहाने गेम्स गाणीवगैरेमध्ये भाग घेत होती ते पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. हे कॉलेजमध्ये असताना मुळीच नव्हतं तनुचं. शांत असायची. आपल्यात गुंग. माझ्यासोबत यायची सगळी कडे. पण सोबतीपुरतीच. तिचा स्वतःचा सहभाग कमी असायचा खुप. आता फारच फरक पडलाय. मस्त दिसतेय काय, हसतेय काय. 

तो सुजय तर बोललासूध्दा. लग्नानंतर कसा सगळ्यांमध्ये वेगवेगळा फरक पडतो पहा. राधा काकूबाई झाली, आणि तनु तर आधीपेक्षा यंग दिसतेय. विक्षिप्तच आहे तो आधीपासून. कुठे काय बोलावं याची जरासुद्धा अक्कल नाही. 

एक दिवस तनु घरी राहायला येऊन गेली. दिवस कमी पडला आम्हाला बोलायला. अमेरिका आणि भारतात दिवस रात्रीचा फरक. वेळेची गणितं सांभाळून दोन्हीकडचे आई बाबा, महत्वाचे नातेवाईक यांच्याशी फोनवर बोलणं झालं तरी पुरे. तनुशी मेसेज आणि फोनवर कितीही बोललं तरी समोर आल्यावर अजून विषय निघतात. 
तिच्यात लग्नामुळे म्हणजे खरं तर गौरव मुळे फरक पडला हे निश्चित.

मी कॉलेजात असताना पॉप्युलर होते. बऱ्याचजणांनी प्रपोज केलं मला. तनु दिसायला पण साधी होती आणि राहायची पण अगदी साधी. तिच्या वाट्याला कोणी फारसं जायचं नाही. पण ती माझी बेस्ट फ्रेंड होती. आम्ही नेहमी सोबत असायचो. त्यामुळे माझी मैत्रीण म्हणून ती पण सगळ्यांना माहित होती. 

तिला याचा कधीकधी राग यायचा. म्हणायची मी पिक्चरमधल्या सारखी सुंदर हिरोईनची साधी मैत्रीण वाटते सगळ्यांना. काही मुलं माझ्याकडे येऊन तुझ्याबद्दल बोलतात. मी काय नोकर आहे का तुझी. पण यात माझी काय चूक होती? हे तिलासुद्धा माहित होतं. म्हणून यायची पुन्हा नॉर्मलवर. 

आपण बरं आपलं काम बरं असा तिचा स्वभाव होता. कॉलेजच्या फेस्टिवल्समध्ये तिचा क्रिएटिव्ह गोष्टीत सहभाग असायचा खरा. पण होस्ट करायला, बाकी कॉलेजमध्ये जाऊन प्रमोशन करायला मलाच सांगायचे. मला आणि अजून अशा कॉलेजमधल्या गुड लुकिंग मुलामुलींना. हे मार्केटिंगचे फंडे, कॉलेजात पण वापरतात. चांगले चेहरे जिकडे तिकडे दिसायला हवेत. 

मला सहानुभूती वाटायची कधी कधी. आज तिला माझी स्थिती सांगितली तर तिला सहानुभूती वाटेल माझ्याबद्दल. असो. 

मी फक्त सुंदर होते असं नाही. हुशार पण होते. मार्क्स नेहमी चांगले असायचे, अभ्यास चांगला करायचे. पण हे कोणाला दिसत नसावच. माझी ओळख कॉलेजातली मस्त पोरगी म्हणुनच होती. तनु माझी बेस्ट फ्रेंड तर होतीच. पण बाकीपण ग्रुप होता आमचा मोठा. मुलं आणि मुली दोन्ही होते त्यात. 

पण काही छपरी पोरांना राग यायचा याचा. माझ्या जोड्या लावायचे कोणा कोणासोबत, कमेंट्स पास करायचे. बाकी मुलांशी बोलते आणि त्यांच्याशी बोलत नाही याचा राग असावा बहुतेक. ते चांगले वागले असते तर का नसते बोलले त्यांच्याशी? तनुला तसा त्रास कमी होता तुलनेने. तसा सगळ्याच मुली बायकांना इकडे तिकडे रस्त्यावर वगैरे काही न काही त्रास होतच असतो. पण जितकं रूप चांगलं तितका त्रास जास्त असं मला वाटतं. 

बऱ्याच जणांना मी शिष्ट वाटते. माझे हावभाव शिष्ट वाटतात. दिसत असेल काही चेहऱ्यावर. मला अगदी नाही नाही म्हणायचं. पण सगळीकडे सगळ्यांचा वळलेल्या माना, रोखलेल्या नजरा, एक्सरेसारखी फिलिंग याचा काही परिणाम होत नसेल का चेहऱ्यावरच्या हावभावांवर?

मुलींमध्ये लोक रूपापेक्षा दुसरं काही बघतात का असा मला प्रश्न पडतो. म्हणजे मुलींकडे अक्कल पण असते, त्या आपलं डोकं वापरू शकतील अशी अपेक्षाच नसावी लोकांना. आणि सुंदर मुलींना अक्कल कमी असते हा तर सगळ्यांचा आवडता डायलॉग आहे. 

लग्नाआधी माझं रिलेशनशिप होतं पंकजशी एक दोन वर्ष. त्यानेसुद्धा रूप सोडून दुसरं काही पाहिलं नाही असंच वाटतं. ऑफिसमध्येच भेटला. लगेच अट्रॅक्ट झाला. "लव्ह अँट फर्स्ट साईट" म्हणायचा तो. माझा आता या गोष्टींवरचा विश्वास उठलाय. फर्स्ट साईट म्हणजे तुम्ही काय बघता? फक्त रूप. तुम्हाला त्या व्यक्तीचा स्वभाव कळतो? आवडी कळतात? बॅकग्राउंड कळतं?

सुरुवातीला छान वागायचा तो. पण नंतर मी त्याच्याच ऑफिसमध्ये काम करते, मला पण तेवढाच ताण असतो, सुटीला दुसरे काही प्लॅन असू शकतात, मी माझ्या आधीच्या मित्र मैत्रिणी (खास करून मित्र) यांच्यासोबत कुठे जाऊ शकते. हे सगळं विसरून वागायचा. म्हणजे या "लव्ह अँट फर्स्ट साईट"मध्ये फक्त फिजिकल अट्रॅक्शन आलं तर. बाकी आपलं व्यक्तिमत्व आणि आयुष्य राहिलं बाजुला. भांडणं होऊन होऊन शेवटी संपलं एकदाचं रिलेशन. 

ऑफिसमध्ये बाकी लोकांचं पण तेच. मी न मागता मला जास्त अटेन्शन मिळायचं. माझ्या सोबत जॉईन झालेल्या लोकांमध्ये, मुलींना, त्यातल्या त्यात आम्हा एक दोघींना जास्त तत्परतेने मदत मिळायची. मग साहजिकच बाकीजण हे कडवट नजरेने बघायचे. 

मी हुशार होतेच. मेहनत पण करायचे बरीच. कशात काही कौतुक झालं, किंवा अवॉर्ड, प्रमोशन वगैरे मिळायचं. तेव्हा लोकांना माझी मेहनत दिसायची नाही. मी सुंदर आहे म्हणून मला एवढा भाव मिळतो, असाच भाव त्यांच्या चेहऱ्यावर असायचा. फक्त मुलांच्याच नाही तर मुलींच्यासुद्धा. 

कंटाळा आला होता मला या सगळ्याचा. आणि पंकजबद्दल घरी सांगितलेलं होतंच. त्याच्याशी ब्रेकप झालं तेव्हा काही दिवस थांबून आईबाबांनी माझ्या लग्नाचं मनावर घेतलं. 

नातेवाईक पण हेच बोलायचे. एवढी सुंदर आहे आपली मुलगी, हजार चांगली स्थळं येतील. म्हणजे मी शिकलेली होते, चांगल्या नोकरीला होते, याचं काही महत्व नव्हतं. 



दीपेशचं स्थळ आलं. दिसायला खूप भारी नसला तरी स्मार्ट आहे दीपेश. स्वभावाने पण छान आहे. त्याच्या घरचे पण आवडले सगळ्यांना. त्याच्या अमेरिकेतल्या नोकरीचं कौतुक तर होतंच. 

मला इथल्या ह्या वातावरणाचा कंटाळा आला होता. दीपेशला तो सुटीवर भारतात आला असताना दोन तीनदा भेटले. तो आवडला, त्याला मी आवडले. अमेरिकेत गेल्यावर, स्थिर स्थावर झाल्यावर नोकरी बघायची असा माझा बेत होता. त्यानेही माझ्या काम करण्याला कसली हरकत घेतली नव्हती. मी त्याला होकार दिला, आणि लग्न करून भारतातली नोकरी सोडून अमेरिकेत आले. 

झालं. पैसे पाहून अमेरिकेतला नवरा पकडला, असा सगळ्यांचा समज झाला. तो माझ्या तुलनेत दिसायला ठीक ठाक असल्यामुळे पैसे पाहूनच लग्न केला अशी खात्रीच पटली सगळ्यांची. आमची जोडी पाहून लग्नात काही जणांनी "लंगूर के हाथ अंगूर" असल्या छापाच्या थेट किंवा छुप्या कमेंट्स पण केल्या. मला वाटतं प्रॉब्लेम तिथूनच सुरु झाला. 

दीपेश सुरुवातीला खूप छान राहिला. स्वभाव चांगलाच आहे त्याचा. आम्ही हनिमूनला गेलो, तेव्हा मी सर्व प्रकारचे ड्रेस नेले होते, ते सगळे त्याला आवडले. कुठल्याच ड्रेसला त्याने कसली आडकाठी केली नाही. भरपूर फिरलो आम्ही, एन्जॉय केलं. फोटो काढले, 

पहिल्या वर्षी आम्ही प्रत्येक सण, प्रत्येक ऑकेजन खूप उत्साहाने साजरे केले. भारताबाहेर भारतीय लोक जरा जास्त जवळ येतात. आम्ही अशा कार्यक्रमांना जायचो, गेट टुगेदर्स ना जायचो. आमच्या घरीसुद्धा आम्ही बऱ्याचदा पार्टी केली. आम्ही बरेच फोटो काढून आमच्या ग्रुप्स मध्ये, फेसबुक वर टाकायचो. 

त्याच्या काही बावळट मित्रांनी भाई थोडा फेअर अँड हँडसम लगा ले, भाभी के सामने अच्छा लगेगा, असल्या कमेंट टाकल्या. इथून जरा दीपेशचा मुड बदलायला लागला. 

मला जे अटेन्शन आधीपासून मिळतं ते त्याला खुपायला लागलं. आमच्या रूपात जो फरक आहे त्यामुळे त्याच्या मनात एक अढी, एक कॉम्प्लेक्स निर्माण झाला. त्याने माझ्या ड्रेसमध्ये लक्ष देणं सुरु केलं. मी बाहेर जाताना जास्त तयार झालेलं त्याला खटकायला लागलं. मी अगदी साधं राहावं अशी त्याची अपेक्षा होती. आमची भांडणं सुरु झाली. 

आमचं बाहेर जाणंच हळू हळू कमी झालं. हे फोटो शेअरिंग वगैरे त्या फालतू कमेंट्सनंतर तसंही जवळपास बंदच झालं होतं. मला आता घरात बसून कंटाळा आला होता. आणि पुरेसा ब्रेक झाला होता. मी नोकरीचा विषय काढला. त्याने आता आढेवेढे घेणं सुरु केलं. पण मी हट्टाला पेटून नोकरी मिळवलीच. 

अगदी साधे कपडे घालून, काहीच विशेष तयार न होता मी ऑफिस ला जाते. रोज सकाळी दीपेशचं माझ्या कडे लक्ष असतं. मी कशी तयार होऊन जाते हे तो बारीक नजरेने पाहत असतो. बोलत नाही. पण वाद नको म्हणून मीच काही करत नाही. 

पण मला नाही आवडत हे असं मन मारून जगणं. तयार होणं, छान दिसणं, बाहेर जाणं, लोकांत मिसळणं हे आपण फक्त दुसऱ्यांसाठी करतो का? हे सगळं करून आपल्याला सुद्धा छान वाटतं ना? आपण आपल्यासाठीसुद्धा काही नको का करायला? जाऊ दे. 

तनुचं माझ्या उलट. दिसायला, राहायला साधी सावळी. कॉलेजात, ऑफिसात कुणाच्या अध्यात न मध्यात अशी राहायची. तिचं लग्न जुळायला तसा वेळ लागला जरा. बऱ्याचदा पत्रिकेचं कारण सांगुन नकार यायचा. 

मी आणि दीपेशसारखे गौरव आणि तीसुद्धा लग्ना आधी काही वेळा भेटले. त्यांना एकमेकांचा स्वभाव आवडला. त्याचं लग्न झालं तेव्हा मी गडबडीत भारतात येऊन गेले. गौरवशी भेटणं बोलणं तर जमलं नाही. पण आत्ता तनु भेटली तेव्हा गप्पा मारताना त्याच्याबद्दल भरभरून बोलली. 

गौरव तिच्यापेक्षा दिसायला उजवा आहे. हे तिच्या आणि त्याच्या दोन्हीकडच्या नातेवाईकांनी टिप्पणी करून आपलं मत नोंदवलंच. असे कुचकट लोक आपले नातेवाईक का असतात, आणि का आपण त्यांना भाव देतो? दीपेशसुद्धा कोण कुठल्या लोकांच्या मनात आमची जोडी कशी दिसते हे एवढं मनावर का घेऊन बसलाय?

गौरवला तनुचं खूप कौतुक आहे. त्याचं पण तिच्या ड्रेसेसकडे, मेकअप कडे लक्ष असतं. पण वेगळ्या अर्थाने. तो तिच्या सगळ्याच गोष्टींत खूप इंटरेस्ट दाखवतो. तिचं कौतुक करतो. त्यामुळे हळू हळू तिने पण स्वतःकडे जास्त लक्ष देणं सुरु केलं. फटाफट शॉपिंग उरकणारी ती बाकी मुलींसारखी चुझी होत गेली. कुणी कौतुक करणारं असलं कि आपोआप आपल्यामध्ये रिफ्रेशिंग फिलिंग येते. उत्साह येतो. 

मला तिचा हेवाच वाटायला लागला. ती इतकी सुंदर नाही, त्यामुळे गौरवला कसली चिंता नसेल, त्याला सेफ वाटत असेल म्हणुन तो इतका छान राहत असेल असा निरर्थक विचारसुद्धा माझ्या मनात येऊन गेला. 

पण नाही. मी भेटले ना गौरव ला. रियुनियनला, तनुच्या घरी जेवायला गेले तेव्हा. तो ज्या नजरेने, ज्या प्रेमाने तनु कडे बघतो, त्या नजरेने दिपेशने मला पाहिलं, तर मला मी कोणते कपडे घालतेय, मेकअप करतेय कि नाही याचं काहीच वाटणार नाही. बाकी कोणी मला काकूबाई म्हटलं तरी काही वाटणार नाही. 

तुमच्या आयुष्यातली माणसं, वातावरण, सुख दुःख, हे सगळं तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. देहबोलीत दिसतं. जो माणूस आनंदी असतो, खुलून हसतो, तो सुंदरच दिसतो. रूढार्थाने सुंदर अशी मी, पण मी माझ्या बॅचमेटला काकूबाई वाटले, आणि रूढार्थाने साधी अशी तनु, ती छान चमकत होती. 

प्रत्येक लहान बाळ आपल्या सगळ्यांना क्युट वाटतं. मग तेच मोठं झाल्यावर काय होतं?

आज मला पटलं. सौंदर्य हे माणसाच्या मनात असतं. विचारांत असतं. पाहणाऱ्याच्या नजरेत असतं.

Wednesday, July 15, 2015

दाग अच्छे है

मी गोरेगावच्या एका आयटी कंपनीत काम करतो. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर हब मॉलच्या बाजुलाच आमचं ऑफिस आहे. 

त्यादिवशी आमची एक महत्वाची रिलीज होती. ह्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला वेगवेगळ्या कारणांनी बऱ्याच अडचणी आल्या. त्यावर मात करत आम्ही अगदी वेळेत काम संपवलं होतं. आज टेस्टिंगचा शेवटचा दिवस होता. संध्याकाळी उशिर होणार याचा अंदाज होताच. पण पुन्हा आम्हाला नेटवर्क, डेटाबेस अश्या तांत्रिक आणि प्रोजेक्ट मधल्याही काही अडचणी आल्या. 

त्या दिवशी कोणीही रिलीज संपल्याशिवाय जायचं नाही असं ठरलेलं होतंच. पण अपेक्षेपेक्षा जास्तच उशीर झाला. ते काम दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत चाललं. ज्या लोकांवर ज्या मोड्यूलची जबाबदारी होती, त्याचं काम संपलं कि ते घरी जात होते. असे करत आम्ही तिघे चौघेच पहाटेपर्यंत उरलो होतो. 

त्यात दोघेजण अगदी जवळच राहत होते. ते पायीपायी निघाले. मी आणि माझी एक मैत्रीण दोघे उरलो. पहाट झाली असली तरी सामसूम असल्यामुळे मी आधी तिला सोडून मग घरी जायचं ठरवलं. 

छायाचित्राचा स्त्रोत
तिथे एक दोनच टॅक्सी होत्या. आम्ही त्यातल्या एकात बसलो आणि निघालो. आम्ही बसुन निघाल्यावर आमचं टॅक्सीमध्ये आजुबाजुला लक्ष गेलं. त्या सीटवर खूपच विचित्र डाग पडलेले होते. मुळचे काळे नसले तरी थोडे काळपट. 




एवढ्या थकव्यानंतर अशी गचाळ टॅक्सी मिळाल्यामुळे आम्ही वैतागलो. 

"कसले कसले लोक बसतात टॅक्सीमध्ये कोण जाणे. किती घाण करून ठेवलंय हे सीट? आणि ह्यांना साफ करता येत नाही का?" इति मैत्रीण. 

"काय हो. सीट इतकं घाण झालंय, आणि तरी तुम्ही कसं काय बसवता लोकांना टॅक्सीमध्ये? ते साफ करा न आधी." मी त्या चालकावर डाफरलो. 

"सॉरी सर. करायचं आहे ते काम. पण राहुन जातंय. करेल सर लवकरच. सॉरी." चालक अपेक्षेपेक्षा विनम्र निघाला. 

छायाचित्राचा स्त्रोत
"आधीच करायचं ना मग. आणि आहेत कसले हे घाणेरडे डाग?" तो फक्त मला उद्देशुन सॉरी म्हणाला म्हणुन बहुतेक तिचा राग अजून कायम होता. 

"रक्ताचे". त्याने असं उत्तर दिल्यावर आम्ही दोघं दचकलो. 

"काय???" मैत्रीण. 

"कुणाच्या रक्ताचे?" मी. 

"मागच्याच आठवड्याची गोष्ट आहे साहेब, तुम्ही बसले ना तिथेच हब मॉलसमोर एक अपघात झाला होता.
दोन पोरं गाडीवर चालली होती. त्यांना ट्रकने उडवलं. एक जवळच पडला, आणि एक जरा गाडीसोबत फरफटत गेला."

"एकदम गर्दी जमली होती. लोक नुसते पाहत होते सर. मी ह्या भागात आलो कि इथेच येउन थांबत असतो, तर मी आलो तर मोठा घोळका जमला होता. ट्रकवाला पळुन गेला होता. आणि लोक एकमेकांना कसा अपघात झाला ते सांगत होते. मी जाऊन पाहिलं तर पोरं तशीच पडलेली. कोणी तरी समोरून पाणी आणलं त्यांच्यासाठी, पण दवाखान्यात कोणी नेत नव्हतं."

"फार रक्त सांडलं होतं. पोरं कोवळी होती सर. माझा मुलगा पण त्याच वयाचा असेल. थोडा कमी जास्त."

"मी फार विचार नाय केला. त्यांना गाडीत टाकलं आणि अजुन एका माणसाला बसवलं सोबत अन घेऊन गेलो दवाखान्यात."

"त्यांना दाखल तर करून घेतलं पण नावगाव काही माहित नव्हतं. त्याचं सामान काही असेल तर आम्हाला माहित नव्हतं. तिथे माझं नाव नंबर वगैरे लिहून घेतलं आणि पोलिसांना पण कळवलं."

"खूप वेळ गेला. मी गेलो घरी शेवटी."

"त्यांचा मोबाईल कोणाला तरी सापडला होता. तो पोलिसात जमा झाला. कशीतरी ओळख पटली आणि त्यांचे घरचे दवाखान्यात पोचले. त्यांनी मला धन्यवाद द्यायला बोलवुन घेतलं. साधी पण चांगली माणसं होती सर. त्यांच्या वडिलांनी माझे हात पकडुन आभार मानले, आणि त्यांना एकदम रडु फुटलं."

"खोटं नाय बोलणार सर. पण असं कोणी नेउन सोडलं तर लोक देतात थोडी बक्षीस. मला पण होती थोडी अपेक्षा. आणि आपल्या गाडीचं सीट कव्हर एकदम साधंय न सर. ते रक्त वाळुन डाग पडले. लेदरचं असतं तर पुसता आलं असतं. इथे एकदम अवघड आहे. ते कव्हरच बदलावं लागणार. मला सध्या जरा जड जाइल ते. मी एरवी काही मागितलं नसतं, पण हे नुकसान झाल्यामुळे जरा मागावं वाटलं."

"पण तिथे गेल्यावर पाहूनच कळत होतं, त्या लोकांना उपचार जड चालले होते. एक मुलगा फारच जखमी झाला होता. मला मागावंच वाटलं नाय. बरं नसतं दिसलं ते. आणि त्या वडिलांनी जे माझे हात पकडून बोलले ना, कि तुमच्या मुळेच माझी पोरं जगली, त्याचंच फार समाधान वाटलं."

"माझी गाडी पाहून ते स्वतः म्हटले सर, कि तुमची नुकसान भरपाई देतो म्हणून. पण काही दिवस द्या, सध्या सगळे पैसे उपचारात चाललेत म्हणून. मी म्हटलं राहू द्या साहेब. तुमच्या पोरांचा जीव वाचला त्याच्यात समाधान आहे मला. मी बघेल माझ्या सीटचं."

"ते म्हणाले मला, पोरं बरी झाली कि भेटायला घेऊन येतो त्यांना. तुमचे त्यांना पण आभार मानायला सांगतो."

"तर असंय साहेब. ते साफ करायचं आहे मला, पण थोडा वेळ लागेल. म्हणून थोडे कस्टमर वैतागतात. पण इलाज नाय. काही दिवस हे असंच चालणार. त्या वडिलांना भेटल्यापासून मला त्या डागांचं पण काही वाटेना. म्हणजे मी कोणाचा तरी जीव वाचवल्याची खुण आहे ना सर ती. ती हटवावी लागणारच आहे, पण सध्या मला मेडलसारखी वाटतेय ती."

आम्ही निःशब्द झालो होतो. त्या डागांचं आता आम्हालाही काही वाटत नव्हतं. उलट अश्या चांगल्या माणसाची भेट झाल्याबद्दल छान वाटलं. 

रस्त्यांवर रोज कितीतरी अपघात होतात. वेळेवर उपचार मिळाले नाहीत म्हणून खूप जणांचे जीव जातात. आपण अनेकदा असे अपघात जाता येत बघतो. कधी लोक जमलेलेच आहेत बघतील तेच काय ते असं म्हणुन निघून जातो. 

मला अशा वेळी थोडी अपराधी भावना येते. पण ती विसरली सुद्धा जाते. त्या गाडीत बसून मला ते सोडून दिलेले अपघात आठवले. आणि थोडं वाईट वाटलं. ती माणसं वाचली असतील का असा विचार आला. 

प्रत्येक ठिकाणी आपण मदत नाही करू शकत. काही नालायक लोक दुर्जन ठिकाणी अपघाताचे सोंग करून लोकांना लुटमार करतात. कधी पोलिस परेशान करतील अशी भीती असते. अशा कारणांमुळे गरजू लोकांना मदत करण्यास लोक घाबरतात. 

पण जेव्हा शक्य असेल तेव्हा आपली गाडी खराब झाली तरी चालेल, आपला थोडा वेळ गेला तरी चालेल पण आपण हे जीव वाचवण्याचा प्रयत्न करूया अशा विचाराने मदत करायला हवी. 

असं करणारा एक माणुस आम्हाला भेटला आणि त्याचं आम्हाला कौतुक वाटलं. 

शेवटी मी त्याला मीटर च्या वर १०० रुपये दिले. 

तो म्हणाला "नको साहेब, तुम्ही कशाला पैसे देताय. मी करेल ते काम माझं माझं."

मी म्हटलं त्याला "अहो तुम्ही उपकार किंवा मदत काहीच समजु नका याला. मी काही फार मोठी रक्कम देत नाहीये. तुम्ही जे चांगलं काम केलात त्याबद्दल आमची दाद समजा, कौतुकाने दिलेलं बक्षीस समजा."

त्यादिवशी पहिल्यांदा मला त्या साबणाच्या जाहिरातीतली ओळ सार्थ वाटली. "दाग अच्छे है". 

फेसबुकवरील या दुर्दैवी अपघाताच्या वृत्तांतापासून प्रेरित.

Sunday, August 31, 2014

रॅंपेज

"साहेब.. ते माझा रूट बदलायचं बघा की.. किती दिवसांपासून मागे लागलोय तुमच्या. माझी झोप होईना झाली नीट. आता मुलीचं लग्न ठरलंय. लय कामं लागणार माझ्यामागं आता. काहीच सुधरत नाय सध्या.. करा की एवढं काम."

निरकर त्यांच्या कदमसाहेबांना विनवत होता. कदम वैतागले होते.

"बघू म्हटलं नाय का रे तुला.. कशाला माझ्यामागे भुणभुण लावतोय. आता याद्या निघतिल काही दिवसात तेव्हा बघू ना."

"अहो साहेब याद्या आलरेडी ठरल्यात म्हणून कानावर आलं माझ्या. ज्याला हवं ते करून घेतलय सगळ्यांनी. मग माझं पण काम करा ना त्यात."

"कोणी सांगितलं तुला?.. अजुन मलासुद्धा माहीत नाही यादीत कोण आहे कोण नाही.. कुठल्यातरी बाजारगप्पा  ऐकून माझं डोकं नको खाऊ. चल निघ आता. कामं आहेत खूप."

निरकर हिरमोड होऊन निघाला. निरकर एसटीचा ड्राइवर होता. गेले बरेच दिवस त्याला दूरच्या रुटवर नेमलेला होता. आणि अशीच बरेच दिवस त्याची लांब लांब पल्ल्याच्या मार्गावरच नेमणूक होत होती.
म्हणून तो कंटाळलेला होता. अशा सततच्या प्रवासाने त्याला पाठदुखी सुरू झाली होती. महिन्यातला अर्ध्याहून अधिक वेळ त्याचा मुक्काम बाहेरगावी एसटीच्या गलिच्छ स्थानकांमधे असे.

आता मुलं मोठी झाली होती. बापाला ऐकेनाशी झाली होती. आणि ती मोठी कधी झाली ह्याचाही त्याला पत्ता लागला नव्हता. बायको सोशिक आणि शांत होती. पण इतक्या वर्षाच्या धकाधकीच्या संसारात बहुतांश वेळ नवरा दूरच असल्यामुळे ती आता अलिप्त झाली होती.

निरकरला आता थोडा आराम हवा होता. जवळचा कुठला तरी रूट. जेणेकरून त्याला रोज घरी तरी येता येईल. थोडावेळ घरी घालवता येईल. आता मुलीचं लग्न ठरलंय. त्याची कामं उरकता येतील. पण हे काही केल्या जुळून येत नव्हतं. कोणत्या न कोणत्या कारणामुळे त्याच्या रूटची बदली सारखी अडत होती.

लग्नाची कामे तशीच पुढे सरकत होती. मुलाकडच्या लोकांनी थेट हुंडा मागितला नव्हता. पण लग्न कसे झाले पाहिजे, मानपान कसे झाले पाहिजेत हे मात्र बजावून सांगितले होते.

अशी थकवणारी नोकरी सांभाळून हि कामे करताना निरकरचा जीव जिकिरीस आला होता. लग्नात बरीच उसनवारसुद्धा करावी लागली होती. कसंबसं लग्न पार पडलं. पाहुणे गेले. सुटीचे मोजकेच दिवस राहिले होते.
निरकर दुपारचा घरी आराम करत होता. समोर धाकटा मुलगा रवि कम्प्युटरवर गेम खेळत बसला होता. कार बंदुका मारामाऱ्या असा त्याचा टाईमपास चालू होता.

त्याचे बारावीला दोन पेपर राहिले होते. आता पुढच्या खेपेस ते द्यायचे होते म्हणून तो निवांत बसला होता. निरकर विचार करत होता आपलं आयुष्य हे असं चाललय. पोरांना शिकवून काही अपेक्षा ठेवावी म्हटली तर आपले चिरंजीव हे असे. खूप हट्ट करून त्याने हा कम्प्युटर घ्यायला लावला होता. वापरलेलाच घेतला असला तरी निरकरला तो जडच गेला होता. आणि गेम खेळण्यापलीकडे त्याचा काही वापर दिसत नव्हता. विचार करता करता त्याला संताप आला. काही तरी बोलायला म्हणून त्याने हाक मारली.

"ए रव्या"

मुलगा उत्तर देणार तेवढ्यात फोन वाजला. रवीने उठून फोन घेतला. निरकर फोन संपेपर्यंत म्हणून गप बसला. आणि परत विचार करायला लागला. अभ्यासात गती नव्हती पोराला पण तसा वाईट नव्हता. घरात असला कि हसवायचा सगळ्यांना. ताईच्या लग्नात खूप मेहनत केली होती त्याने. निरकरच्या गैरहजेरीत कितीतरी कामे मार्गी लावली होती. वय फार नसलं तरी समज होती. आता ताई गेल्यापासून जरा शांत शांतच होता. आत्ता नको बोलायला. निरकरचा राग निवळत होता. पण अभ्यासाचं काय? जाऊ देत. १२वि होऊ देत. आणखी शिकतो म्हटला तर बघू. नाहीतर देऊ कुठेतरी चिटकवून नोकरीला. असं रडतपडत आपण तरी किती शिकवणार? डोक्यातले विचार शांत होताना निरकरचं मुलाच्या बोलण्याकडे लक्ष गेलं. 

"अरे काही नाही यार. बोर होत होतं. गेम टाकलाय नवा. व्हाईस सिटी. भारीये एकदम. मिशनचं टेन्शन नाय. टॉमी नावाचा हिरो आहे. फॉरेनचा भाई असतो. तो व्हाईस सिटीत येतो आणि छोट्यामोठ्या सुपाऱ्या घेतो. अमक्याची गाडी फोड. बँक लुट असले भारी मिशन असतात. आणि टाईमपास करायला तर एकदम बेष्ट. शहरात फिरायचं मस्त.  गाड्या फिरवायच्या वाटेल त्या. आणि लोकांना उगाच मारायचं. आणि आपलं डोकं सटकलेलं असेल ना तर रॅंपेज घ्यायचं. एका मिनिटात ३० लोकांना मारायचं. पोलिस मिलिटरी सगळ्यांना मारायचं. कत्तल नुसती. सगळा राग निघून जातो त्या लोकांवर."

निरकर ऐकत होता. फोन संपल्यावर रवीने स्वतःच विचारलं.

"काय म्हणत होते पप्पा?"

"अरे एवढा कम्प्युटर घेतला घरात. जर बापाला पण शिकव कि."

"मागे दाखवलं होतं ना. गाणे कसे लावायचे. पिक्चर कसा बघायचा ते."

"ते झालं रे. आता हा गेम कसा खेळायचा शिकव कि."

आज  दिवसाढवळ्या पिउन आले कि काय अशा नजरेने रवीने पप्पांकडे पाहिलं. पण त्यांचं डोकं सटकायला मिनिटभर लागणार नाही हे लक्षात आलं आणि तो मुकाट्याने त्याच्या पप्पांना गेम शिकवायला लागला.

निरकर सगळं शिकत होता. गेम कसा लावायचा. रस्त्यावर कोणाची पण गाडी कशी हिसकावून घ्यायची. गेममधल्या शहरात बंदूक कुठून घ्यायची. मिशन कुठून सुरु होतं. निरकर हळूहळू खेळायला लागला आणि त्याला नवाच चाळा लागला.

त्याला त्या गेममध्ये रॅंपेज विशेष आवडलं होतं. कुठलंही एक हत्यार घ्यायचं, आणि लोकांना मारत सुटायचं. कधीतर नुसती हाणामारी करायची. तर कधी एखादी गाडी घेऊन रस्त्यात सगळ्यांना चिरडून टाकायचं.

हे कदमसाहेब, हा तो हरामखोर कंडक्टर, हि जावयाची खडूस आत्या, हा घरमालक असा सगळ्या जगावरचा राग निरकर त्या गेममध्ये काढायला लागला.

निरकरची बदली झाली. आधीपेक्षा अंतर कमी होतं खरं. पण रस्ता अतिशय खराब. त्याची पाठदुखी काही कमी होईना. पण आता घरी काही वेळ तरी मिळत होता. पण लवकरच तो दूर होता तोच बरा होता असं घरच्यांना वाटायला लागलं .

त्याचं पिणं वाढलं होतं. आणि गेम खेळणंसुद्धा. कार्ट्याने बापाला काय नवीन खूळ लावून दिलं म्हणून निरकरची बायको वैतागायची आणि रविवर भडकायची. नवरातर तिच्याकडे  काही लक्ष देत नव्हता. कधी नव्हे ते जास्त वेळासाठी घरी येऊ लागलेला नवरा असा विचित्र नादी लागलेला पाहून तिचा हिरमोड झाला. काही भानगड वगैरे करत नाही एवढंच नशीब समजून ती गप्प राहायची.

रविपण हैराण झाला होता. आता माझ्यापेक्षा जास्त माझे पप्पाच गेम खेळतात असं तो मित्रांना सांगायचा. त्याच्या मम्मीसारखंच कुठून बुद्धी झाली आणि पप्पांना गेम शिकवला असं त्याला वाटत होतं.

आता निरकर कोपऱ्यावरच्या प्लेस्टेशनमध्ये बॉक्सिंगवाला गेमपण खेळायला लागला. देशी दारूचा अड्डा आणि ते प्लेस्टेशन अशा दोन्ही ठिकाणी त्याची उधारी झाली.

तो पूर्ण जीव लावून बॉक्सिंग खेळायचा. जोरजोराने शिव्या देत गेममधल्या स्पर्धकाला ठोसे मारायचा. हे कोण कुठले काका येउन खेळत बसतात यामुळे तिथली लहान पोरं वैतागली होती. त्यांचं येणं कमी झालं तेव्हा त्याला प्लेस्टेशनचा दरवाजा बंद झाला.

शेवटी रवीने त्याला तसाच एक गेम घरीच कम्प्युटरवर टाकून दिला. निरकर खुश झाला. पोरगा काहीतरी कामाला आला.

हे गेम शिकल्यापासून त्यांचं बोलणंच जवळपास बंद झालं होतं. आधी निरकर दूर असल्यामुळे आणि त्याच्या तापट स्वभावामुळे मुलं त्याला घाबरून दूर पळायची. पण तो आधी त्यांच्यावर ओरडायचा तरी. आता ताईपण लग्न करून गेली. आणि निरकरचा सगळा राग, सगळी निराशा गेममधेच निघायला लागली. ते रागवण्यापुरतं बोलणंपण बंद झालं.

रवीचा निकाल लागला. एक पेपर निघाला पण एक पुन्हा राहिला. निरकर काहीच बोलला नाही. त्या दिवशी मात्र त्याने गेम खेळून रॅंपेजमध्ये शेकडो रस्त्यावरचे लोक, पोलिस, मिलिटरीवाले मारून टाकले.

आता पोरांना धाक होता तो पण नाही. करंट्याने आणखी एक वर्ष वाया घातले आणि बाप असा कम्प्युटरला चिकटलेला हे बघून मात्र बायको प्रचंड संतापली आणि तिचं निरकरशी जोरदार भांडण झालं.

काही दिवस कोणाचंच चित्त थाऱ्यावर नव्हतं. तशातच निरकरने ड्युटीवर असताना एका गावाकडे टपरीवर बस  चढवली. गाववाल्यांनी जमून त्याला मारहाण केली. पुण्यातल्या एका दवाखान्यात त्याला दाखल केलं. एसटीने त्याला सस्पेंड करून टाकलं. चौकशीची टांगती तलवार त्याच्या डोक्यावर लटकावली.

एखाद दोन छोट्यामोठ्या घटना वगळता निरकरच्या कारकिर्दीत हा पहिलाच अपघात होता. पण हल्ली त्याचं पिणं वाढलंय हे सगळ्यांनाच माहित होतं. त्याने पिउन गाडी चालवली असावी असा संशय होता. आणि त्याचं वागणं पण अशात खूप बदललं होतं. अगदी घुम्यासारखा राहत होता तो. डोक्यावर काहीतरी परिणाम झाला असावा असा सगळ्यांचा समज झाला होता.

पैशाची अडचण होतच होती. बायकोने हि संधी साधून कम्प्युटर विकून टाकला. रवीनेसुद्धा थोडासाही विरोध केला नाही. उलट स्वतःच गिऱ्हाईक शोधून आणला. आता तर पप्पा सस्पेंड झालेत. घरी आले कि कम्प्युटर सोडणार नाहीत हि भीती त्यालासुद्धा होती.

कम्प्युटर विकल्याचं निरकरला कळलं आणि नवरा बायकोमध्ये पुन्हा खडाजंगी झाली. पण आता काही इलाज नव्हता. घरी येउन निरकर त्रस्त झाला.

कोणीतरी घरी येउन निरकरला सुचवलं कि कदमसाहेबांना जरा बाहेर जेवायला ने. चिकन खाऊ घाल. थोडी दारू पाज. आणि विनंती कर पुन्हा कामावर घ्या म्हणून.

निरकरला खर्च नको वाटत होता. पण बायकोच्या आग्रहामुळे त्याने कदमसाहेबांना बोलावलं आणि जवळच्या बारमध्ये घेऊन गेला. ती जागा पाहूनच साहेबांनी नाक मुरडलं. पण निरकरच्या विनंतीमुळे आत येउन तरी बसले. त्या बारमध्ये निरकरची आधीचीच उधारी होती. आता तो सस्पेंड झालाय हे त्या मालकालासुद्धा कळलं होतं. आधीची उधारी तर जाऊच दे हा आजचं बिलसुद्धा उधारी करून बुडवणार असं समजून मालकाने हुज्जत घालायला सुरु केली. आधीची उधारी दे आणि मगच आज ऑर्डर घेईन असं तो म्हणायला लागला. यावरून निरकरची आणि त्याची हमरातुमरी झाली. या तमाशामुळे कदम साहेब भडकले आणि काही न खातापिताच निघून गेले.

दुसऱ्या दिवशी निरकर कदमांची माफी मागायला गेला. त्यांनी त्याचा अपमान करून हाकलून लावलं. कालचा तमाशा ते विसरायला तयार नव्हते. चार चौघांसमोर त्यांनी निरकरचा मोठा अपमान केला.

निरकर बाहेर पडला. आणि कोपऱ्यात जाऊन बसला. त्या अपमानामुळे त्याला प्रचंड राग आला होता. पण त्याला काही बोलता आलं नव्हतं. नोकरीचा प्रश्न होता. पण तरी असा अपमान करावा? हा आत्ताचा अपघात सोडला तर त्याच्या कारकिर्दीत ठपका लावावा असं काहीच नव्हतं. देतील त्या रुटवर मुकाट्याने त्याने गाडी चालवली होती. घराबाहेर राहून घर चालवलं होतं. आणि हे सगळं करून मिळालं काय? मुलगी लग्न करून गेली. मुलगा बिनकामाचा. बायकोने बोलणं टाकलं होतं. आणि एक छोटा अपघात झाला. त्या हरामखोर गाववाल्यांनी इतका मारला. ते कमी कि काय म्हणून या लोकांनी सस्पेंड केलं. कधी कोणाला मखलाशी करायला गेलो नाही. पण कधी नाही ते काल त्या भडव्या कदमला दारू पाजायला गेलो तर बारवाल्याने काशी केली. त्याचं भांडण तर माझ्याशी होतं. त्यात या कदमला भडकायला काय झालं? त्याचा राग धरून या माजोरड्याने  आक्ख्या डीपार्टमेंटसमोर इज्जत काढली होती.

निरकर संतापाने लालेलाल झाला होता. त्याचा श्वास एकदम जोरजोराने सुरु झाला होता. समोर एक बस थांबली. ड्रायव्हर खाली उतरून ऑफिसमध्ये एन्ट्री करायला गेला. निरकर अचानक उठला आणि समोरच्या बसमध्ये चढला. ड्रायव्हरने बहुतेक पटकन जाऊन यायचं म्हणून बस सुरूच ठेवली होती.

इतकी वर्षे गांड घासली इथे. एक छोटा अपघात झाला म्हणून सस्पेंड करतात साले. चार चौघात लाज काढतात. थांबा दाखवतो आज ह्यांना. निरकर बेभान झाला होता. त्याने जोरात गाडी वळवली. काही लोक गाडीत चढायला येतच होते ते घाबरून बाजूला झाले आणि थोडक्यात बचावले. निरकरने गेटजवळ एका बसला कट मारून बस स्थानकातून बाहेर काढली. आणि राँग साईडमध्ये घुसवली.

भरपूर प्रवासी बस पकडायला घाईघाईत रस्ता पार करून चालले होते. रिक्षावाले कोपऱ्यावर थांबले होते. गाड्या विरुद्ध दिशेने येत होत्या. सिग्नलसाठी हळूहळू थांबत होत्या. कोणालाहि एसटीची एक बस इतक्या वेगात या बाजूने येईल अशी अपेक्षा नव्हती.

निरकर सगळ्यांना चिरडत उडवत निघाला. बस पकडायची का हरामखोरांनो पकडून दाखवा हि बस. रोजची किटकिट किटकिट साली. इथे थांबवा. तिथे थांबवा. धक्के बसतायत हळू चालवा. पकडा बस भडव्यांनो.

आता लोकांनी आरडाओरडा सुरु केला होता. सगळे लोक त्याला हातवारे करून थांबायला सांगत होते. पण त्याला आता कशाचंच भान नव्हतं. एक ट्राफिक पोलिस दांडा घेऊन हिम्मतीने अडवा आला त्याला चिरडून निरकरने बस तशीच पुढे नेली.

मेन रोडवर गाडी आली आणि गाड्यांना ठोकर देत निघाली. कार जीप कितीही चांगल्या असल्या तरी बससमोर त्यांचा काय टिकाव लागणार?

लोक नुसते ओरडत होते. थांबवा. वाचवा. रोको. गाड्यांच्या धडकीमुळे आणि राँग साईडमध्ये घुसल्यामुळे निरकरची बस थोडी मंदावत होती. तेवढ्यात एक धडक बसलेल्या कारचा ड्रायव्हर ओरडला "अबे पागल हो गया क्या भोसडीके?" आणि निरकर पुन्हा पेटला.

पूर्ण जोर लावून त्याने पुन्हा बस पुढे नेली. जवळच्या पोलिस चौकीतले पोलिस रस्त्यावर आले होते. त्यांनी गाड्या मध्ये घातल्या. गाडीवर गोळ्या झाडल्या पण काही उपयोग झाला नाही. एका पोलिस वॅनने बसला जोरात धडक दिली. आणि गाडी थोडी जागीच थांबली.  त्याचा फायदा घेऊन एक मुलगा जीवावर उदार होऊन बसमध्ये घुसला.

निरकरशी त्याची झटापट झाली. मारामारीत शेवटी निरकर त्याच्यापुढे कमजोर ठरला. आणि शेवटी ते काही मिनिटांचेच भयंकर मृत्युचे तांडव थांबले.

निरकरला मारत त्या मुलाने बाहेर काढले. निरकरने बसच्या मागे पाहिले. किती गाड्या उडवल्या. किती माणसे चिरडली काही हिशोब नव्हता. समोरचे दृश्य अगदी व्हाईस सिटी गेममधल्यासारखे दिसत होते. पोलिसांनी निरकरला मारत मारत आत घेतले.

दिवसभर टीव्हीवर तीच न्यूज झळकत होती. निरकरच्या घरी हे कळलं तेव्हा ते अगदी हवालदिल झाले. रवि पोलिस चौकीत पप्पांना भेटायला गेला तेव्हा ते एवढंच म्हणाले.

"रव्या, लय भारी रॅंपेज केलं आज. बस घेऊन धिंगाणा घातला फुल रस्त्यावर."

Friday, April 25, 2014

ती आणि तो : भाग ५

(भाग १) (भाग २) (भाग ३) (भाग ४)
सकाळी सकाळी दार वाजलं. त्याने उघडलं, तर आई बाबा दारात उभे होते. ते आनंदात होते. 

"काय रे प्रमोशन झालं तर पार्ट्या करतोस, पण आम्हाला सांगत सुद्धा नाहीस?" बाबा आत येता येता म्हणाले. 

"तुम्हाला कसं  कळालं?"

"अरे तुझ्या पार्टीचे फोटो तुझ्या मित्रांनी टाकले फेसबुक वर. बाबांनी मला दाखवले. आम्ही किती फोन केले तुला. पण तू उचलले नाहीस."

"अगं, कालच बातमी कळली. लगेच मित्रांनी पार्टी द्यायला लावली. नंतर घरी येउन झोपलो होतो. आज तुम्हाला सांगणार होतो."

"तोपर्यंत आम्हाला थोडी राहवणार होतं. तसाही तू आजकाल आमच्याशी नीट काही बोलत नाहीस."

मागच्या खेपेस त्यांनी लग्न मोडायला सांगितलं तेव्हापासून तो त्यांच्याशी मोकळेपणाने बोलतच नव्हता. 

"ते जाऊ दे. आम्हाला लगेच यायचं होतं. आम्ही पहाटेच निघून आलो. आणि हे काय? प्रमोशनचा, आम्ही आल्याचा काहीतरी आनंद दिसतोय का तुझ्या चेहऱ्यावर?"

"असं काही नाही ग आई. बसा तुम्ही जरा. मी चहा टाकतो."

"मला कळतंय ना सगळं. ते लग्न मोडल्यापासून तू हा असा आहेस. अरे किती दुःख करशील? आपण तरी काय करणार होतो. जनरीतच पाळली फक्त आपण. तिची पण चूक नाही आणि आपली पण नाही."

"आई तो विषय नको बरं."

"बरं तो नको. पण दुसऱ्या मुलीतरी बघशील कि नाही? तुझं लग्न झाल्याशिवाय काही तुझं चित्त थाऱ्यावर येणार नाही. मी येताना फोटो घेऊनच आले आहे. तू बघ सावकाश. पसंत कर. मग आपण पुढचं बघू."

"मी बघणार नाही. मी तिच्याशीच लग्न करणार आहे." याच क्षणी त्याचा निर्णय झाला होता. 

"हा मूर्खपणा आहे. झालंय ना आपलं बोलणं यावर?"

"एक स्त्री असून तू दुसऱ्या स्त्रीबद्दल अशी कशी वागतेस आई? तिची काय चूक आहे यामध्ये?"

"काही चूक नसेल. पण ती मला सून म्हणून चालणार नाही."

"माझं प्रेम आहे तिच्यावर. मी तिला नाही विसरणार."

"विसरावं लागेल."

"मला एक सांग आई, सॉरी, पण समजा तुझ्यावर आज बलात्कार झाला."

"वाट्टेल ते बडबडू नकोस. मोठा झालास तू, पण असं काही बोलायला लागलास तर थोबाडून काढेन तुला."

"वाट्टेल ते नाही. तुला काय वाटतं बलात्कार फक्त तरुण मुलींवर होतात? चार वर्षांच्या चिमुरडीवर पण होतात, आणि सत्तर वर्षांच्या थेरडीवर सुद्धा. आज तुमच्या लग्नाला सत्ताविसेक वर्ष झाली असतील, तुला मी एवढा मोठा मुलगा आहे. उद्या तुझ्या वर समजा बलात्कार झाला, तर मी आणि बाबांनी काय करावं?"

आईच्या पायाखालची जमीनच सरकली. बाबा सुद्धा धर्मसंकटात पडले होते. 

"बाबांनी तुझ्याशी नातं तोडावं का? त्याचं आणि तुझं तरी लग्नाचं नातं आहे. तू तर माझी आई आहेस. बलात्कार झाला म्हणून मी तुला आई म्हणून नाकारावं का? आपलं प्रेम संपेल?"

आई बाबा दोघेही या सडेतोड प्रश्नामुळे निरुत्तर झाले होते. 

"मग सांग आई. तिच्यावर बलात्कार झाला, म्हणून मी तिला माझं प्रेम देऊ नये?"

आई आता पश्चातापाचे अश्रू गाळत होती. त्याला तिचं उत्तर मिळालं होतं. त्याने बाबांकडे पाहिलं. 

"मी असं काही झालं तरी तुझ्या आईला सोडणार नाही. तूपण तुझं प्रेम सोडू नकोस."

त्यांचं पाठबळ घेऊन तो तिच्या घरी निघाला. थोड्याचवेळात ती ऑफिसला निघेल, म्हणून घाई करत तो तिच्या घरी पोचला. आणि दारातच थांबला. तिची मावशी घरी आलेली होती. आणि समजावणीच्या सुरात तिला सांगत होती. 

"हे बघ आता आपली बाजू अशी आहे. आपल्याला थोडं जुळवून घ्यावाच लागेल. जे पर्याय समोर आहेत त्यातूनच निवड करावी लागेल ना?"

"पण करूच का मी निवड? नाही केलं लग्न तरी काय बिघडणार आहे? आपली बाजू अशी आहे म्हणे. काय तर माझ्यावर बलात्कार झाला. माझ्या इच्छेविरुद्ध सेक्स झाला. आता हे जे स्थळ तू सांगत आहेस. तो माणूस घटस्फोटीत आहे. त्याने काय सेक्स केलाच नसेल? त्याचं प्रकरण होतं म्हणून त्याची बायको त्याला सोडून गेली. आता हा माणूस ह्या लायकीचा. पण त्याच्या घरी तो मला उपकार केल्यासारखं ठेवेल. कारण माझ्यावर बलात्कार झाला ना. का जाऊ मी अशा घरी?" ती संतापून बोलत होती. 

"जाऊ दे. हवं ते कर. मदत करायला गेले तर ह्या असल्या भाषेत मला ऐकवतेय. मी जाते. ज्याचं करायला जावं भलं…" मावशी पुटपुटत  बाहेर निघाली. 

"हेच तर. तुम्हाला असे स्थळ आणून वाटतंय कि तुम्ही माझं भलं करताय. अरे अशा घरी जाऊन कुजण्यापेक्षा मी एकटीच राहीलेलं काय वाईट मला सांग ना?"

तिने बाहेर निघालेल्या मावशीला ऐकवलं. आणि मग त्यांचं दारात उभ्या असलेल्या त्याच्याकडे लक्ष गेलं. 
मावशी त्याच्याकडे फणकाऱ्यात पाहून निघून गेली. ती मावशी जाईपर्यंत थांबली. आणि मग त्याच्यावर बरसली. 

"कशाला आला आहेस आता? तू सोडल्यानंतर माझे काय हाल झाले ते पाहायला आलास का?"

"नाही. माफी मागायला आलोय. तुला पुन्हा मागणी घालायला आलोय."

"कशाला? सहानुभूती वाटतेय का. कि तू नाही केलंस लग्न तर कोण करेल माझ्याशी? नको मला तुझी सहानुभूती. आणि उपकार तर बिलकुल नको."

"नाही गं. तुझ्यावर उपकार करावेत म्हणून नाही आलो मी. आणि सहानुभूती पण नाही. काही असेल तर तो माझा गिल्ट, आणि माझं तुझ्यावरच प्रेम."

तिला काय बोलावं ते समजलं नाही. पण तिला त्याला आणखी रागवायचं होतं. 

"शांत हो तू. काका, काकू, तुम्ही पण बसा. मला तुमची पण माफी मागायची आहे." 

"मी जे केलं, त्यानंतर मी कधीच शांतपणे झोपू शकलो नाही. माझ्या चुकीचा सल माझ्या मनात होता. तुला मी तुझ्या कठीण परिस्थितीमध्ये एकटीच सोडून दिलं. आपण नेहमी सोबत राहू, अशी आपण एकमेकांना कमीटमेंट दिली होती. त्याला जागलो नाही."

"तुझ्यावर बलात्कार झाला. तुला असं स्वीकारलं तर आईबाबा नाराज होतील. नातेवाईक नाक मुरडतील हे तर माहित होतंच. पण माझं मला काय वाटतंय हेच मला कळत नव्हतं."

"मी खूप विचार केला. कि तुझ्यावर बलात्कार झाला तर तुझी काही चूक नसूनपण तुला का शिक्षा व्हावी? मी तुला का सोडावं? तुझी अब्रू गेली असा सगळ्यांनी आणि मी का विचार करावा? त्या हरामखोराला याचे परिणाम भोगायला हवेत, पण ते तुला भोगायला लागतायत."

ती गुढघ्यात मान घालून रडतरडत सगळं ऐकत होती. तिचे आईबाबा पण ऐकत होते. या विषयावर तेसुद्धा तिच्याशी इतकं थेट बोलत नव्हते. कधी बोललेच तर, फार वाईट झालं, पण आता इलाज नाही, भोगावं लागेल. अशा स्वरूपाचं. तिची काहीच चूक नाही, आणि तिच्या सन्मानाला धक्का पोचलेला नाही हे त्यांनीसुद्धा कधी तिला सांगितलेलं नव्हतं. त्यांना स्वतःची पण लाज वाटत होती. बाकी सगळ्यांनी नाक मुरडली तेव्हा ते ताठ मानेने का नाही वावरले? आमच्या मुलीची काही चूक नाही, आणि आम्ही तिच्या पाठीशी आहोत ह्याची जाणीव त्यांनी तिला आणि सर्वांनाच करून द्यायला हवी होती. 

तो बोलतच गेला. 

"त्या लोकांनी तुला उपभोग्य वस्तू म्हणून पाहिलं. आणि तुझा वापर करून सोडून दिलं. पण नंतर मी तुला सोडलं, तेव्हा कृती मध्ये नाही पण विचारांमध्ये मी पण त्यांचीच पातळी गाठली होती. मला हे लक्षात आलं तेव्हा माझी मलाच शरम वाटली."

त्याच्या डोळ्यातून पण पाणी यायला लागलं होतं. तो तिच्या जवळ जाउन बोलायला लागला. 

"तू वस्तू नाहीस. माणूस आहेस. माझ्या अगदी जवळची. मी चुकलो. खूप खूप चुकलो. मला माफ कर. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. एक माणूस म्हणून. एक मित्र म्हणून. माझ्याशी लग्न करशील?"

ती काही न बोलता रडतरडतच त्याच्या मिठीत शिरली. तिच्या आईबाबांसमोर. आजवर पहिल्यांदाच. पण त्यांनाही काही वाटलं नाही. त्यांनीसुद्धा एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवला होता.

ती आणि तो : भाग ४

(भाग १) (भाग २) (भाग ३)
त्याने तिला नंतर बऱ्याचदा फोन केले, मेसेज केले, पण तिने एकदाही उत्तर दिलं नाही. आणि तिने फोन उचलला असता तरीही बोलायचं काय, हे त्यालाही माहित नव्हतं. त्याला फक्त बोलावं वाटत होतं तिच्याशी. त्याने काही निर्णय घेतलाच नव्हता. त्याचा संभ्रम पाहून तिनेच चिडून त्याला मोकळं करून टाकलं होतं. 
त्याला मोकळं व्हायचं होतं कि नव्हतं हेहि त्याला माहित नव्हतं. 

तिच्या उत्तर न देण्यामुळे त्याचे फोन मेसेज कमी होत होत बंदच झाले. तो पूर्ण सैरभैर झाला होता. जशी आधीची बातमी सगळीकडे पसरली होती, तसंच त्यांचं लग्न मोडल्याची बातमी पण सगळीकडे पसरली होती. त्याच्या ऑफिसमध्ये आता त्याला देवदास समजायला लागले होते. आणि काही मुलींचा त्याच्यावरचा राग सुद्धा लपून राहत नव्हता. 

कोण पसरवतात असल्या गोष्टी? तो विचार करत होता. कोणाच्या घरी लग्नाचे मुलगे मुली आहेत, लोकांची लफडी, लग्न जमणं, मोडणं असल्या गोष्टी आपोआप सगळीकडे पसरतात. लोकांना उद्योग नाहीत का दुसरे? त्याच्या लक्षात आलं कि तोसुद्धा बऱ्याचदा अशा गप्पांमध्ये असायचाच. पण आता त्या गॉसिपचा विषय तो झाला होता. म्हणून त्रास होत होता. 

त्या बलात्कार करणाऱ्या लोकांनी ती तो, असं सगळ्यांचंच आयुष्य बिघडवलं होतं. त्याने मनातल्या मनात त्यांना खूप शिव्या दिल्या. त्यांचा पत्ता लागला असता, तर त्याने त्यांचा जीव घेतला असता, इतका राग त्याच्या मनात हॉस्पिटलमध्ये हे सगळं समजल्यापासून होता. 

इकडे ती पण हल्ली फार चिडचिडी झाली होती. तिला लोकांच्या नजरांचा, सहानुभूतीचा आधीच वीट आला होता. पण आईबाबा, तो सोबत होते म्हणून ती शांत राहायचा प्रयत्न करत होती. पण लग्न मोडल्यानंतर या सगळ्यात भरच पडली. आई बाबा हताश झाले होते. त्यांना आता कुठेही येणंजाणं नको वाटत होतं. आणि तिचा राग सगळीकडेच बाहेर पडत होता. 

करणारा गुन्हा करून मोकळा झाला होता. पण ती मात्र त्या दिवसापासून शिक्षा भोगत होती. तिची सहनशक्ती आता संपत चालली होती. पुन्हा एकदा तिच्या मनात आत्महत्येचे विचार घोळायला लागले होते. 

त्याचं कामात लक्षतर लागत नव्हतं. पण तरी त्याने जास्तीत जास्त वेळ कशात तरी गुंतून राहायचा प्रयत्न चालवला होता. कारण रिकामा बसला कि तिचा विचार काही मनातून जात नव्हता. आपण केलं ते बरोबर आहे का, हि अपराधी भावना त्याचं मन पोखरत होती. या प्रश्नावर उत्तर काही केल्या मिळत नव्हतं. 

त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. एकमेकांच्या अवघड प्रसंगी दोघांनी चांगली सोबत केली होती. मग आताच का? 

त्याचे आई बाबा म्हणत होते ते खरंच होतं. तिच्याकडे पहायचा सगळ्यांचाच दृष्टीकोन पूर्वग्रहदुषित होता. ती घरात आली असती तर सध्या जसं तिच्या घरी सगळ्यांनी येणं जाण कमी केलं होतं तसंच त्याच्या नातेवाईकांनी संबंधितांनी त्यांच्या घरावर अघोषित अस्पृश्यता लादली असती. 

पण तिची काय चूक होती या सगळ्यात? काहीच नाही. पण तरिहि... जे होतं ते असं होतं. मग त्याच्यात हिम्मत नव्हती का सगळ्यांच्या विरोधात उभं रहायची?

त्याने एक दोनदा त्याच्या मित्रांशी बोलायचा प्रयत्न केला. पण तेही काही समाधानकारक सांगू शकले नाहीत. 

"बघ यार, तुझ्यावर आहे. तुझे आई बाबा नाराज होतील. नातेवाईक चिडतील. मग तू काय करशील?"

थेट तसं न बोलता ते जे चाललंय ते चालू दे हेच सांगत होते. पण त्याची घालमेल थांबत नव्हती. 

दिवस नुसतेच चालले होते. तिच्या आई बाबांनी आता तिच्या लग्नाचं मनावर घेतलं. निदान त्यानेतरी सध्याची परिस्थिती बदलेल अशी त्यांना आशा होती. पण काही चांगलं स्थळ सांगून येईच ना! त्यांनी सगळ्या नातेवाईकांना सांगून ठेवलं. पण त्यांची प्रतिक्रिया पाहूनच त्यांची किती मदत होणार आहे हे लक्षात यायचं. 

त्यांचा हा खटाटोप पाहून ती आणखी चिडत होती. मला लग्नच नको, असं म्हणून ती वाद घालायची. 

आणि जे काही एकदोन ठिकाणाहून स्थळ येत होते, त्यात वयस्कर, लग्न न जमलेले असे कोणालाही पसंत पडत नव्हते. त्यामुळे आईबाबांना आता यातून मार्ग कसा निघणार हेच दिसत नव्हतं. 

काही दिवसांनी त्याचं ऑफिसमध्ये प्रमोशन झालं. एरवी तो आनंदाने नाचला असता. पण तो त्या मूडमधेच नव्हता. त्याला आधी अशी प्रत्येक छोटी गोष्टसुद्धा  कधी एकदा  तिला सांगतो असं व्हायचं. 

आणि मग ती कौतुकाने "वाह रे मेरे शेर" असं काही म्हणायची, तेव्हा कुठे त्याला त्या गोष्टीचं सार्थक वाटायचं. 

आतापण त्याच्या मनात आलं कि तिला फोन करून सांगावं. पण फोनकडे बघून त्याने नुसताच उसासा सोडला. एक मित्र म्हणून सांगायला तरी काय हरकत होती? पण तिचं बरोबर होतं. असा हात सोडून देणाऱ्याला मित्र म्हणून तरी कसं स्वीकारणार?

आपलं इतकं छान नातं तुटलं म्हणून तो आणखी दुःखी झाला. त्या बलात्कारी लोकांचा त्याला अजून राग आला. पण हे नातं तर त्यांनी तोडलं नव्हतं. ते त्याच्याचमुळे तुटलं होतं. त्या बलात्काराचा त्यांच्या नात्यावर परिणाम त्यानेच होऊ दिला होता. 

त्याचे ऑफिसातले मित्र त्याच्या अवतीभवती अभिनंदन करायला जमले. आणि त्याची विचारांची लिंक तुटली. ते त्याला ऑफिसनंतर जबरदस्ती पार्टी करायला घेऊन गेले. तो अजिबात मूडमध्ये नव्हता. पण त्याने उसनं अवसान आणून वेळ मारून नेली. 

घरी तो रात्री पुन्हा विचार करत बसला. त्याने नेमकं का नातं तोडलं होतं? तिच्यावर बलात्कार झाला. पण त्याला का प्रोब्लेम होता नेमका? तिची काही चूक नव्हती हे त्याला माहीतच होतं. मग काय?

बलात्कार. जबरदस्तीने केलेला सेक्स. हा प्रोब्लेम होता? सेक्स तर आधी त्याने पण केला होता. मग त्याला या मुद्द्यावर नाही म्हणायचा काय अधिकार होता? 

पण तिच्यावर बलात्कार झाला होता. तिची काही चुकही नव्हती. त्याच्या डोक्याचा भुगा होत होता विचार करून. 

त्या रात्री तिचा अपघात झाला असता... तिने हात पाय गमावले असते, चेहऱ्यावर व्रण राहिले असते तरी त्याने क्षणभरहि  विचार न करता तिची सोबत केली असती. कदाचित तिनेच विरोध केला असता. त्याच्यावर तिचं ओझं होऊ नये म्हणुन. ती खूप स्वाभिमानी होती. पण मग आता तिने असं नेमकं काय गमावलं होतं, कि त्यामुळे तो तिला स्वीकारू शकत नव्हता? 

अब्रू? पण समाजात लफडी करणाऱ्याला अब्रू आहे. पैसे खाणाऱ्याला अब्रू आहे. वेश्येकडे जाणाऱ्याला अब्रू आहे. बेताल वागणाऱ्या स्त्रीपुरुषांना अब्रू आहे. मग तिलाच का नाही? अब्रू तर त्या बलात्कार करणाऱ्याची जायला हवी होती. पण त्याचा काही पत्ताच नाही. विचार करता करता त्याला झोप लागली.

भाग ५

ती आणि तो : भाग ३

(भाग १) (भाग २)
काही दिवस असेच गेले. तिने आता ऑफिसला जायला सुरुवात केली होती. जाताना येताना, ऑफिसमध्ये सगळ्यांच्या बदललेल्या नजरा तिच्या लक्षात येत होत्या. काहीजण सहानुभूतीने वागत होते. काही जण तुच्छता दाखवत होते. त्यात काही स्त्रियापण होत्या. अगदी मोजके काहीजण काही झालं नाही असं दाखवून तिच्याशी आधीसारखं वागायचा प्रयत्न करत होते. 

ती तो, तिचे घरचे यापैकी कोणीही बाहेरच्यांना खरं काहीही सांगितलेलं नसलं तरी सगळ्यांनाच सर्व काही कळलेलं होतं. कसं काय कोणास ठाऊक. 

तिलाच काय, तिच्या बाबांना आणि त्याला ऑफिसमध्ये, तिच्या आईला सोसायटीमध्ये असाच अनुभव येत होता. सगळ्यांचीच वागणूक बदललेली होती. काहीजण त्यांना उघडपणे टाळत होते. 

एक दिवस तिच्या बॉस, आणि एच.आर. मधला एकजण, यांनी तिला मिटिंग रूम मध्ये बोलवून थोडा वेळ चर्चा केली. त्यांनी तिला सांगितलं कि, तुझ्यासोबत काय झालं याची आम्हाला कल्पना आहे. पण आम्ही तुझ्यासोबत आहोत. तुझी नोकरी पूर्णपणे सुरक्षित आहे. आपली कंपनी पुढारलेल्या विचारांची आहे. तू बिनदिक्कत इथे काम कर, आणि काही अडचण असेल तर आम्हाला येउन सांग. 

तिला मनात वाटत होतं, नोकरी सुरक्षित आहे म्हणजे काय? अशा मुलींना नोकरीवरून काढण्याचा पर्याय असतो कि काय कंपनीकडे? उपकार थोडीच करत आहेत हे माझ्यावर? आणि असे पुढारलेले विचार असतील तर ते असे स्वतःचीच पाठ थोपटून दाखवायचे कशाला? पण ती हे उघडपणे बोलली नाही. उलट नंतर तिला त्यांनी पाठींबा दिल्याचं बरंच वाटलं. कारण ऑफिस मधले काही लोक तिच्याशी नीट वागत नव्हते. ती त्यांच्या टीममधून निघून जावी, असंच त्यांचं वर्तन होतं. पण ती अशा दबावाला बळी पडणार नव्हती. आणि त्यांच्या पाठींब्याने तिचा धीर वाढला होता. 

नाईलाजाने त्यांनी हळूहळू याची सवय करून घेतली. हा नशिबाचाच भाग अशी त्यांनी स्वतःची समजूत काढली. तिने खूप धीर आणि हिम्मत दाखवली होती. ते तिला एका मानसोपचारतज्ञाकडे न्यायचे. त्याने सुद्धा तिचं कौतुक केलं. खूप कमी मुली यातून इतक्या लवकर बाहेर पडतात, आणि नव्याने जगायला सुरु करतात. खूपजणी आत्महत्या करतात. पण तुमची मुलगी खूप धीराची आहे, असं सांगून त्याने तिची पाठ थोपटली. 

खरं सांगायचं तर आत्महत्येचा विचार तिच्या मनात सुद्धा येउन गेला होता. पण आईबाबा आणि तो, त्यांच्याकडे बघून तिने तो दूर केला होता. 

सावकाश गाडी रुळावर येत होती. आणि एक दिवस तिच्या आईबाबांनी लग्नाचा विषय काढला. त्यांना आता लवकर सगळं उरकलेलं बरं असं वाटत होतं. त्याने काहीतरी थातूरमातुर उत्तरं दिली. हे तिच्या लक्षात आलं आणि तिने त्याला वरच्या खोलीत नेलं आणि विचारलं. "काय चाललाय तुझ्या मनात?"

"काही नाही."

"खोटं बोलू नकोस. समजतं मला. आई बाबांनी आत्ता विषय काढला, तर नीट काही बोलला का नाहीस?"

"अगं तसं काही नाही."

"मग कसं?"

"अरे म्हणजे घाई काय आहे? आपण विचार करूयात ना."

"विचार कसला? आपण दोन्ही आई बाबांना सांगितलेलं आहे. आणि ठरलं होतं न आपलं. अजून काय विचार करायचाय?"

तो शांत राहिला. 

"अरे आई बाबांना आता लवकर सगळं मार्गी लागावं असं वाटतंय. काही प्रोब्लेम आहे का? काय झालंय?"

"आईबाबा म्हणत होते कि पुन्हा विचार कर म्हणून."

ती आता चिडली होती. तिला मनोमन याची अपेक्षा होतीच. 

"त्यांना मी सून म्हणून नकोय का? मग तुझा काय विचार आहे?"

"माहित नाही. मला वेळ लागेल विचार करायला."

"माहित नाही? आणि वेळ लागेल काय वेळ लागेल. तुलापण उष्टावलेली मुलगी बायको म्हणून चालणार नाही वाटतं."

"असं नको बोलूस यार."

"असंच आहे ते. असं काही आहे तर उघड उघड सांगत का नाहीस?"

"अवघड आहे हे सगळं. आई बाबा एक म्हणतायत. मला माझं काही कळत नाहीये."

"या सगळ्यात माझ्यापेक्षा अवघड आहे का तुला काही?"

तो पुन्हा शांत राहिला. 

"माझ्याशी लग्न केलंस तर तुला बायको म्हणून लाज वाटेल का माझी?"

"असं अपमानास्पद नको बोलूस ना."

"अपमान तू करतोयस माझा."

"आपण मित्र म्हणून तर आहोतच ना, एकमेकांच्या सोबत."

ती आता खूप संतापली होती. "तुझ्या सारखा मुलगा मला मित्र आणि काहीही म्हणून नकोय आयुष्यात."

त्यांचा आवाज ऐकून आईबाबापण वर आले होते. 

"निघ इथून. आणि परत येऊ नकोस कधी."

"अगं ऐक तर. समजून घे ना जरा. मला विचार तरी करू दे."

"काही विचार करू नकोस. माझा विचार झाला आहे, तू नको आहेस मला. माझ्यावर बलात्कार करणाऱ्या त्या हरामखोरांपेक्षा तूच जास्त दुखावलं आहेस मला. बाबा याला जायला सांगा इथून. आमचं लग्न होणार नाही."

त्यांनी बोलून दाखवलेलं नसलं तरी हि भीती कधीची त्यांच्या मनात होतीच. तो मान खाली घालून निघून गेला.

(भाग ४)

ती आणि तो : भाग २

(भाग १)

तिला शुद्ध आली तेव्हा त्यांनी तिला जवळ घेतलं. ती रडायची थांबत नव्हती. तिला पुन्हा झोपवलं. आणि दुसऱ्या दिवशी घरी घेऊन गेले. 

काही जवळचे लोक रात्रीच हॉस्पिटलमध्ये येउन गेले. पण त्यांना आणि बाकी सगळ्यांनाच असं  सांगितलं कि तिचा एक अपघात झाला. आणि तिला शुद्ध नव्हती म्हणून लवकर समजलं नाही. 

तिच्या अवस्थेकडे पाहून लोकांना शंका तर येत होती. पण कोणी उघडपणे बोलून दाखवलं नाही. पण जेव्हा घरी पोलिस येउन गेले तेव्हा त्यांच्या शंकांवर शिक्कामोर्तबच झालं. 

झालं असं होतं कि ती तिच्या एका मैत्रिणीसाठी भेटवस्तू घ्यायला ऑफिसमधून घरी जाताजाता एका मॉलमध्ये गेली होती. तिथून निघाली तेव्हा पार्किंगमधेच कोणीतरी तिला मागून मारलं आणि गाडीत घालून कुठेतरी नेलं. तिच्या अर्धवट शुद्धीत तिने प्रतिकार करायचा बराच निष्फळ प्रयत्न केला. ते दोनजण होते एवढंच तिला आठवत होतं. त्या पुढचं तिला काहीच सांगता येत नव्हतं. हे एवढं सांगतानासुद्धा ती हमसून हमसून रडायला लागली होती. 

या वर्णनावरून पोलिसांना तपासात काहीच मदत झाली नाही पण तरी आम्ही शोध घेऊ आणि काही तपास लागला कि कळवतो असं आश्वासन त्यांनी दिलं. 

ती महिनाभर कुठेहि बाहेर गेली नाही. तिचा अपघात झालाय, मुका मार लागलाय आणि डॉक्टरांनी आराम करायला सांगितलाय असं त्यांनी ऑफिसमध्ये आणि सगळीकडेच सांगितलं. पण तिला घरी भेटायला येणाऱ्यांचा यावर विश्वास बसत नाही हे लगेच कळायचं. 

तो रोज ऑफिसनंतर तिला भेटायला जायचा. गप्पा मारायचा. तिला रडू आलं कि समजावून सांगायचा. पण कितीही समजावलं तरी कोणाचीच पुरती समजूत निघत नव्हती. 

त्याचे आईबाबा तिला भेटायला म्हणून गावाकडून आले होते. ते तिच्या घरी गेले तेव्हा तिच्या आईबाबांना काय बोलावं तेच समजत नव्हतं. अगदी अवघडल्यासारखे सगळे शांत बसले होते. ती त्याच्या आईला बिलगली आणि रडायला लागली. त्यांनी तिला धीर दिला. सगळं ठीक होईल असं सांगितलं. थोडा वेळ बसून ते निघाले. 

त्याच्या घरी पोचले तेव्हा त्याचे आई बाबा एकमेकांना काहीतरी खाणाखुणा करत होते. काहीतरी बोलायला ते संकोचत होते. 

शेवटी त्यानेच विचारलं "काय झालंय?"

आईने धीर केला, आणि विषयाला सुरुवात केली "मग आता काय विचार आहे तुझा?"

"कशाबद्दल?"

"अरे कशाबद्दल काय? लग्नाबद्दल."

"आई हि काय वेळ आहे का हा विषय काढण्याची. तिची तिच्या घरच्यांची अवस्था तू बघून आलीस ना?"

"अरे, तेच. तिच्याशी लग्न करायचं का यावर काय विचार आहे तुझा. तुम्ही सांगितलं नाही म्हणून काय आम्हाला काय झालंय समजत नाही का? आता अशा मुलीला आपण सून म्हणून कसं घरात घेणार?"

"अशी मुलगी म्हणजे? तिने काय केलंय."

"ते तू आम्हाला शिकवू नकोस. लोक काय बोलतील आपल्या कुटुंबाबद्दल?"

"मी असा विचार नाही केला अजून."

"मग कर. करावाच लागेल विचार. तुला स्वतःला तरी चालेल का अशी बायको? हे जे झालंय ते विसरू शकणार आहेस का तू?"

तो काहीच बोलला नाही. 

"बघ बाबा, नीट विचार कर. आणि तुझं काहीका ठरेना, ती आम्हाला आमच्या घरात चालणार नाही एवढं आत्ताच सांगून ठेवते. थोडी चांगली वेळ बघ, आणि त्यांच्या घरी जाऊन सांग, हे यापुढे काही जाणार नाही म्हणून."

त्याला प्रश्नात पाडून ते निघून गेले. तसं त्यांनी काही नवीन विचारलं नव्हतं. हा प्रश्न त्याच्या जवळच्या मित्रांनी सुद्धा आडूनआडून विचारून झालेलाच होता. आईने थेट मुद्द्याला हात घातला इतकंच. आणि त्याच्या स्वतःच्या मनात काय होतं, हे त्याला काहीच कळत नव्हतं.

भाग ३

ती आणि तो : भाग १

रात्रीचे १० वाजून गेले होते. तो एक फिल्म बघत बसला होता. आता थोड्यावेळात तिला एक कॉल करायचा, थोडा वेळ गोड गप्पा मारायच्या आणि झोपायचं असा त्याचा बेत होता. पण तिच्या आईचाच कॉल आला आणि तो दचकला. आईंचा कॉल आणि तोसुद्धा यावेळी. तसं त्या दोघांबद्दल दोघांच्याही घरी माहित होतं. घरचं वातावरणपण मोकळं होतं. दोघांच्या आईवडिलांनी त्यांच्या नात्याला मंजुरी देऊन टाकली होती. आता त्या दोघांनी तयारी दाखवल्यावर पुढचा कार्यक्रम ठरवायचा होता. 

आता तिची आई साखरपुड्याची घाई करायला सांगेल कि काय या शंकेने त्याने फोन उचलला. 

"अरे तुम्ही दोघं सोबत आहात का? हि अजून घरी नाही आली. फोन करून सांगत तरी जा रे. काळजी वाटते."

"नाही काकू. मी तर घरी आहे माझ्या. ती ऑफिसमध्ये असतानाच आमचं बोलणं झालं. कुठे जायचं बोलली तर नव्हती. तिला फोन करून बघतो कुठे आहे."

"अरे तिचा फोन कधीचा बंद लागतोय. म्हणून तर तुला केला मी."

"ठीके काकू. काळजी करू नका. मी तिच्या टीममधल्या लोकांना फोन करतो. त्यांना माहित असेल ती ऑफिसनंतर कुठे गेली असेल तर."

त्याने लगेच त्याच्याकडे तिच्या ऑफिसमधले जेवढे नंबर होते त्या सगळ्यांना कॉल करून पाहिला. तिच्या जवळच्या मैत्रिणी, ग्रुपमधले सगळे झाले. कोणालाच माहित नव्हतं. एव्हाना ११ वाजून गेले होते. आता त्यालापण काळजी वाटायला लागली होती. तो तडक तिच्या घरी गेला. ती अजून पोचलेली नव्हतिच. तिचे आईबाबा दोघे प्रचंड टेन्शनमध्ये होते. सांगून गेली असती तर त्यांना काही काळजी वाटली नसती. पण तिने काही सांगितलं सुद्धा नव्हतं, आणि कोणाला तिच्याबद्दल माहित सुद्धा नव्हतं. आतापर्यंत त्यांचापण शहरातल्या सगळ्या नातेवाईकांना फोन करून झाला होता. 

तो आणि तिच्या बाबांनी पोलिसात जायचं ठरवलं. तिची आई रडायलाच लागली, आणि मीपण येते म्हणून हट्ट धरून बसली. कसंबसं त्यांनी तिला शांत केलं. ती घरी आली तर, काही फोन आला तर कोणी तरी घरी असायला हवं असं तिला समजावून सांगितल. तिला सोबतीला म्हणून शेजारच्या वहिनींना झोपेतून उठवून आणलं. आणि ते निघाले. 

पोलिसांकडे ती हरवल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांचे सर्व प्रकारचे वाकडेतिकडे तिरकस प्रश्न विचारून झाले. तो चिडला होता, पण बाबांनी त्याला शांत केलं. काही कळलं कि सांगतो हे पोलिसांचं आश्वासन ऐकून ते निघाले. पोलिसांशी अजून बोलून उपयोग नव्हता. 

त्याला अचानक सुचलं, आणि त्यांनी जवळपासच्या हॉस्पिटल मध्ये शोध घेतला. रात्रीच्यावेळी कसलीही माहिती लवकर मिळत नव्हती. त्यांनी पोलिसांकडे परत चौकशी केली. पण एखाद्या मुलीच्या अपघाताची कसलीही बातमी त्यांच्याकडे पोचली नव्हती. 

जाताना ते तिचं ऑफिस ते घर, त्याचं घर असं सगळंच फिरून आले. पण उपयोग शुन्य. तो त्यांच्यासोबत त्यांच्याच घरी गेला. रात्रभर कोणालाही झोप आली नाही. सकाळी शेजारच्या काकू धीर देऊन घरी गेल्या. 

तो आणि बाबा चहा नाश्ता जबरदस्ती पोटात ढकलून बाहेर पडले. दोघांनी ऑफिसमध्ये सुट्टी टाकली होती. त्यांनी पुन्हा एकदा जवळपासचे हॉस्पिटल पालथे घालायला सुरुवात केली. तिचा कुठेच ठावठिकाणा नव्हता. घरी बसून आई आणखी त्यांच्या,तिच्या सगळ्या ओळखीच्या लोकांची यादी करून फोन करत होत्या. 


शेवटी अकरा-बाराच्या सुमारास पोलिसांचाच फोन आला. एक मुलगी शहराच्या बाहेरच्या भागात बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. तिला तिकडच्याच एका हॉस्पिटलमध्ये नेलेलं होतं. तिचं वर्णन त्यांनी दिलेल्यासारखंच होतं. ती मुलगी पूर्ण शुद्धीवर आली नव्हती. त्यामुळे ओळख पटवायला त्यांनी तिकडे बोलावलं होतं. मनोमन प्रार्थना करत ते तिकडे निघाले. 

कालपासून ज्या ज्या लोकांना फोन केले होते, त्या सगळ्यांचे फोन चालुच होते. त्यांना उत्तर देता देता ते कंटाळले होते. घरी आईंची पण तीच परिस्थिती होती. 

तिकडे पोचले तेव्हा रूमच्या बाहेरच डॉक्टर आणि पोलिस भेटले. त्यांनी तिला पाहताक्षणीच ओळखलं. अंगभर जखमा दिसत होत्या. त्यांना नुकतीच मलम पट्टी केलेली दिसत होती. तिला तसं पाहूनच ते व्यथित झाले. हि आमचीच मुलगी असं त्यांनी पोलिसांना सांगितलं. 

डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, कि ती अशा जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. लोकांनी तिला इथे दाखल केलं. आणि तिला अगदी थोडा वेळ शुद्ध येउन गेली. पण ती काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिच्यावर प्राथमिक उपचार आणि चाचण्या करून झाल्या होत्या. तिच्यावर बलात्कार झाल्याचं स्पष्टच होतं. त्यांनी तिला झोपेचं औषध देऊन झोपवलं होतं. तिला जाग आल्यावर सर्व काही ठीक वाटलं तर ते तिला घरी जाऊ देणार होते. 

पोलिसांना आतापर्यंत तिचा जबाब नोंदवता आला नव्हता. पण डॉक्टरांनी त्यांचे निष्कर्ष त्यांना सांगितले होते. आणि तिचे रिपोर्ट्स आले कि त्याची प्रत पोलिसांना पण पाठवली जाणार होती. तिला जाग यायला बराच वेळ असल्याने पोलिसांनी तिचा जबाब नोंदवायला घरी यायची तयारी दाखवली. आणि ते गेले. 

त्यांनी आईला फोनवर ती सापडल्याचं तेवढं सांगितलं. आणि हॉस्पिटलचा पत्ता देऊन तिचे कपडे घेऊन यायला सांगितलं. त्या ताबडतोब निघाल्या.

आता हळू हळू त्यांना काय झालंय याची जाणीव व्हायला लागली. आई पोचल्या तेव्हा हि बातमी ऐकून त्या कोसळल्याच. बाबांनी त्यांना सावरलं खरं. पण आतून ते पण खचले होते. तो तर इथे आल्यापासून एक शब्द सुद्धा बोलला नव्हता. 

भाग २