Showing posts with label कोकण सफर. Show all posts
Showing posts with label कोकण सफर. Show all posts

Sunday, August 2, 2015

कोकण सफर : १० : गणपतीपुळे आणि परत



गणपतीपुळे हे गणपतीचे अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे. समुद्रकिनारी वसलेले हे सुंदर गणपतीचे मंदिर आणि गाव याबद्दल सर्वांनी ऐकेलेले असते. बऱ्याच जणांनी तिथे नक्किच भेटसुद्धा दिलेली असेल त्यामुळे त्याबद्दल वेगळे सांगत नाही.

प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्यामुळे गणपतीपुळ्याला खूप गर्दी असते आणि हे पक्के व्यापारीकरण झालेले गाव आहे. सगळ्या गोष्टी मग ते जेवण असो कि रूमचे भाडे सर्व बाकी कोकणापेक्षा तुलनेने महाग. आम्हाला महागड्या हॉटेलमध्ये जायचे नव्हते म्हणून घरगुती रूम कॉटेज शोधताना बरेच फिरावे लागले होते. कशीबशी एक रूम आम्हाला मिळाली.

एका ठिकाणी जेवणाला बरीच गर्दी दिसत होती म्हणून तिथे गेलो. भूक लागलेली असताना रात्रीच्या जेवणाला अर्धा पाउण तास प्रतीक्षा करावी लागली आणि तेवढे करून जेवण अगदी नेहमीसारखेच. भाव मात्र नेहमीसारखे नव्हते.

रात्री आम्ही थोडावेळ बीचवर जाऊन गप्पा मारत बसलो होतो. बरीच गर्दी होती तेव्हा पण. छान वाटलं होतं.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर तयार झालो. आम्ही गर्दीमुळे लवकर मंदिरात जायचं ठरवलं होतं. त्यामुळे त्यानंतर बीचवर पाण्यात उतरायचा आणि मग परत अंघोळी करून आवरायचा आम्हाला कंटाळा आला होता. अक्षयला तर तसाही पाण्यात विशेष रस नव्हता तेव्हा. गणपतीपुळे तसा धोकादायक बीच आहे.





आम्ही सोबत कुर्ते घेतले होते पण सहलीत कुठे वापरलेच नव्हते. मग मंदिरात पण जायचय, बीचवर पाण्यात नाही जाणार, आणि सहल पण संपलीच आता तर कुठे वापरणार, म्हणून आणलेच आहेत तर घालुयात म्हणून आम्ही कुर्ते घातले.

मंदिरात काही वाटले नाही, पण आम्ही तिघेच्या तिघे कुर्ते घालून बीचवर हिंडायला लागलो तेव्हा सगळे आमच्याकडेच बघत होते, आणि आम्ही हसत होतो.
















बॅटरी अगदी थोडी चार्ज झाली होती. तिथे आम्ही ठरवलं आता काय शेवटचाच दिवस आहे, काढायचे तेवढे फोटो काढून हौस फिटवून घेऊ.




आणि मग आम्ही भरपूर फोटो काढले. उभे, बसलेले, मयुरचे राजकारण्यांसारखे, सर्व प्रकारचे. "सरकार"ची त्याला प्रचंड क्रेझ होती, त्यामुळे ह्या फोटोंमुळेच ह्या सहलीनंतर त्याचे एक टोपणनाव सरकार असे पडले.





















त्यानंतर आम्ही तिथल्या एका कोकण ग्रामजीवन म्युझियममध्ये गेलो. इथे सिद्धगिरी (कोल्हापूर) सारखे एक आभासी कोकणी शैलीचे गाव वसवलेले आहे. आणि गावकऱ्यांची शिल्पे आहेत. पारंपारिक कोकणी गावातले बलुतेदार, त्यांची रोजची कामे करतानाची शिल्पे, यातून कोकणी संस्कृती दर्शविली आहे.

माझे आडनाव खोत आहे. आता माझे कुटुंब तसे देशस्थच आहे. आमच्या कित्येक पिढ्या देशातच वाढल्यात. आमच्या कुटुंबाचा आजोबांनी सांगितलेला इतिहास वेगळ्या पोस्टमधेच लिहावा लागेल. पण खोत हि पदवी मुळची कोकणातली आहे. त्यामुळे ह्या सहलीत अक्षय "देश"पांडे मला कोकणस्थ असल्यावरून, आणि मी माझ्या मुळ ठिकाणी आलोय अशा मुद्द्यावरून चिडवत होता.

त्यात ह्या काल्पनिक गावात खोताचे घर होते. आणि खोताचे अक्खे कुटुंब दाखवले होते. इथली गाईड खोतान्बद्दल माहिती सांगत होती तेव्हा साहजिक माझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य आलं होतं. ते पाहून अक्षय पेटला आणि चिडवायला लागला. मग मी पण हे पहा आमचा इतिहास. लोकांनी जतन करून ठेवलाय. तुमचं आहे का कुठलं असं संग्रहालय देशात? देशपांड्याबद्दल कोणी खास माहिती सांगतात का? म्हणून चिडवलं.

त्याला डिवचायला मी गाईडला वन्समोर करून व्हिडीओ रेकॉर्ड केला. अजून पण अक्षय त्या सहलीची आणि कोकणाची, त्या म्युझियमची आठवण काढून मला चिडवतो, आणि आम्हाला हसायला एक निमित्त मिळतं.




गणपतीपुळ्याला आलो तेव्हा आमचा पास संपत आला होता. त्या पासवर आम्हाला घरी जाण्यापुरता एक दिवस शिल्लक होता. पण अक्षयने धांदरटपणाने आमचे तिघांचे पास हरवून टाकले. आम्ही नीट ठेवायला म्हणून एकाकडे ठेवत होतो. पण दुर्दैव असं कि तो हरवला, आणि सुदैव असं कि तो शेवटच्या दिवशी हरवला.

त्यामुळे परतीचा प्रवास आम्हाला तिकीट काढून करावा लागला. मयुरकडे पासची झेरोक्स प्रत होती पण तिचा काही उपयोग झाला नाही.

तिथून मी ठाण्याला माझ्या काही दिवस काकाकडे गेलो. मयुर अक्षय तिथून घरी परत गेले.

परत आल्यावर आणखी एक किस्सा झाला. मध्ये एकदा मेमरी कार्ड भरल्यामुळे आम्ही एका इंटरनेट काफेमध्ये (अति) दर देऊन फोटो कॉपी केले आणि एक सीडी बनवली. मी तिथे कॅमेरा घेऊन बसलो होतो, आणि तो चार्ज झाल्याशिवाय कनेक्ट होणार नव्हता. म्हणून मी तिथेच बसलो, आणि अक्षय मयुरकडे ५० ची नोट देऊन सीडी आणायला पाठवलं . (त्या सहलीत मी कॅशीअर होतो)

त्यांनी फक्त एक सीडी आणली. आम्ही ती भरली आणि मी ती माझ्या बॅगमध्ये ठेवली. ठाण्याला गेल्यावर मी बॅग उघडली तेव्हा तिचा चुराडा झाला होता. आम्ही तिला कव्हर घेऊन त्यात ठेवायला विसरलो होतो. :D

मी लगेच ह्या दोघांना फोन लावला, आणि फोनवर आमची वादावादी झाली.

"तुला नीट ठेवता येत नाही का? माझ्याकडे द्यायची असती. मी निट ठेवली असती"

"तुझी आणि माझी बॅग वेगळी आहे का? सारख्याच आहेत? कशी ठेवली असती?"

"तुम्हाला सीडी सोबत कव्हर आणायला काय झालं होतं? सगळं सांगावं लागतं का?"

असं आम्ही एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न केला. माझा मूड (सगळ्यांचाच) गेला होता थोडा. नंतर औरंगाबादला आम्ही भेटलो तेव्हाहि वाद घातला.

पण कोणावरहि ढकललं तरी शेवटी व्हायचं ते झालं होतं. आमच्या अर्ध्या सहलीचे फोटो गेले होते. मार्लेश्वरच्या पुढचेच फोटो शिल्लक होते. आणि ते अगदी शेवटच्या भागातले . नशीब तेवढे तरी राहिले.

त्यामुळे ह्या लेख मालिकेतले बरेचसे फोटो, त्या ठिकाणचे असले तरी आमच्या सहलीतले नाहीत. नेटवरून घेतलेले किंवा पुन्हा त्या ठिकाणी काढलेले आहेत.

ते फोटो आणि ते क्षण चित्र स्वरुपात उपलब्ध नाहीत, याची खंत जरूर आहे. पण ह्या सहलीत आम्ही खूप धमाल केली, मजा केली. मस्त अनुभव घेतले. हि आमची पहिली इतकी मोठी सहल होती. ते फोटो दुसऱ्यांना दाखवायला झाले असते, पण त्याची फिल्म आमच्या मनात अगदी ताजी आहे. म्हणूनच मी इतक्या वर्षानंतरसुद्धा ह्या सहलीबद्दल इतकं सविस्तर लिहू शकलो.

हे लिहिताना मी ते क्षण पुन्हा जगलो. आम्ही नेहमीच ते आठवत असतो. हे वाचताना माझ्या मित्रांच्या डोळ्यासमोरूनसुद्धा फ्लॅशबॅक सरकला असेल. हि लेखमालिका आम्हाला ह्या सहलीला जाऊ देणाऱ्या आमच्या आई बाबांना, माझ्या सगळ्या मित्रांना, विशेष करून या सहलीचे सोबती अक्षय आणि मयुर यांना, आणि प्रवासाची आवड असणाऱ्या सर्वांना समर्पित. :)

Sunday, July 26, 2015

कोकण सफर : ९ : रत्नागिरी

रत्नागिरी हा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे. कोकणच्या बाहेर आंबेवाले हापूस आंब्याचे खोके घेऊन बसतात. आणि हा रत्नागिरी, हा देवगड, हा अमुक गावचा असली नावे घेत राहतात. फक्त त्यांच्याकडे पाहून आपल्याला तर काही कळत नाही. समोरचा आपल्याला बनवतोय असंच वाटत राहतं. जाणकारांना वास आणि आणखी पाहून गाव कळत असावं, पण आपल्याला तर नाय बुवा. असो.

रत्नागिरीची हापूसच्या पलीकडेहि ओळख आहे. इथे पाहण्यासारखे खूप काही आहे. आम्ही सर्वप्रथम गेलो रत्नदुर्गला. भारतात अनेक किल्ले असले तरी महाराष्ट्रात शिवरायांच्या इतिहासात किल्ल्यांना विशेष महत्व आहे. तर त्या दृष्टीने हा किल्ला तितका प्रसिद्ध नाही. पण तरी किल्ले पहायला आम्हाला आवडतं.


रत्नागिरीला आम्ही मुक्काम करणार नव्हतो त्यामुळे सगळे सामान घेऊन फिरत होतो. किल्ला काहीसा गावाबाहेर आहे. तिकडे वर्दळसुद्धा अगदी तुरळक. हा किल्ला काही चढायला अवघड नाही. बराच वरपर्यंत रस्ताच दिसत होता. उन भयानक होतं. आम्ही रस्त्यात दोन तीन घरी सामान वर जाऊन येईपर्यंत ठेवता का म्हणुन विचारलं. एका काकूंनी तयारी दाखवली. आम्ही त्यांच्या घरात सामान काढून ठेवलं. आणि पुन्हा किल्ला चढायला लागलो.

वर पोहोचलो. आता जरा हवेची झुळूक सुरु झाली होती. वर फेरफटका मारला. खाली समुद्र, त्यात होड्या, जहाज वगैरे दिसत होते. किल्ल्यावर बघण्यासारखे विशेष काही नसले तरी हा समुद्राचा नजारा छान आहे.

वर एक मंदिर आहे तिथे दर्शन घेतले. काही वेळ अजून टाईमपास केला. मार्लेश्वरला कॅमेराची बॅटरी जी संपली होती ती चार्ज करायला अजून मिळाली नव्हती. त्यामुळे इथे मोबाईलनेच काही फोटो काढले. तेव्हाचे मोबाईल कॅमेरा अगदीच कामचलाऊ होते. ते या फोटोंवरून लक्षात येत असेलच.



मग खाली निघालो. खाली जाताना त्या घरून सामान पुन्हा घेतलं. त्या काकुंचे आभार मानून पुन्हा गावात आलो.


मग आम्ही टिळकांचे घर पहिले. त्या घरात टिळकांचा पुतळा, त्यांच्याबद्दलची माहिती, त्यांचे राजकारणाव्यतिरिक्त इतर छंद, अभ्यासाचे विषय, त्यांनी लिहिलेले ग्रंथ यांची नव्याने ओळख झाली. आपल्याला किती कमी माहिती आहे याची जाणीव झाली. इतके वादळी आयुष्य, राजकीय कारकीर्द असूनही त्यांचा इतर विषयातला रस, अभ्यास आणि व्यासंग पाहून आदर शतपटीने वाढला.

मंडालेच्या तुरुंगात लिहिलेले गीता रहस्य तर इतिहासाच्या पुस्तकातल्या धड्यामुळे सर्वांना माहित असते. पण वेदांमधील उल्लेखानुसार आर्यांचे मुळ स्थान आर्क्टिक खंडात आहे असे प्रतिपादन करणारा "दि आर्क्टिक होम इन दि वेदाज" असा ग्रंथ त्यांनी लिहिला हे कळल्यावर मला त्यात रस आला. रामायण, महाभारत, आर्यकालीन इतिहास हे माझे आवडते विषय आहेत. त्यामुळे मी तो ग्रंथ वाचायचा ठरवला. हि सहल संपल्यावर मी लक्षात ठेवुन तो ग्रंथ नेटवरून मिळवला. पण काहीश्या जड भाषेमुळे तो पूर्ण वाचून झाला नाही.

 त्यानंतर आम्ही सावरकर यांनी कल्पिलेल्या सर्व जातीच्या लोकांसाठी खुल्या असलेल्या पतित पावन मंदिरात गेलो. सावरकर हे फक्त कट्टर हिंदू होते, एवढाच सर्वांनी समज करून घेतलेला आहे. पण त्यापलीकडे त्यांच्या कार्याची माहिती लोकांना नसते.

अंदमानात जाईपर्यंतचे त्यांचे आयुष्य प्रसिद्ध आणि सर्वांना माहित आहे. पण तिथे खडतर आयुष्य काढल्यानंतर त्यांची काही अटींवर सुटका करण्यात आली. नजरकैद, आणि सक्रिय राजकारणापासून दूर राहणे, अशा काही अटी होत्या. त्यामुळे त्यांनी धर्म आणि सामाजिक सुधारणेवर लक्ष केंद्रित केले. काही कडवट अनुभवांमुळे ते कट्टर हिंदू होते खरे. पण आंधळे अनुयायी नाही.

हिंदू धर्माचा, संकल्पनेचा, शब्दाचा त्यांनी सखोल अभ्यास करून आपली मते मांडली. हिंदू धर्मातल्या कित्येक परंपरांवर टीका केली, विसंगती दाखवून दिल्या. तेव्हा दलित अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळत नसे म्हणून आंदोलने व्हायची. त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासून जिथे सर्वांना प्रवेश असेल असे मंदिर योजिले.

हि बाजू लोकप्रिय होण्यासारखी खचितच नाही, आणि तेव्हाच्या राजकारणातल्या अनेक पैलूंमुळे त्यांचे हे कार्य दुर्लक्षित राहिले.

आम्ही तिथे गेलो तेव्हा दुसरे कोणीही नव्हते. वर एका हॉलमध्ये एक छोटेखानी संग्रहालय आहे. आणि तिकीट काढल्यास एक सावरकरांविषयी एक मुद्रित कार्यक्रमसुद्धा पाहायला मिळतो. तिथल्या काकांनी आम्ही फक्त तीनच जण असूनही तो कार्यक्रम दाखवला. लगे रहो मुन्नाभाई मध्ये, मुन्नाभाई गांधीजींबद्दल वाचायला वाचनालयात जातो, आणि तिथला ग्रंथपाल भावूक होतो, तत्सम प्रसंग होता तो. पुढे हा चित्रपट आला तेव्हा मला याचीच आठवण आली होती.

तर असे रत्नागिरीत येउन आम्ही या दोन महापुरुषांच्या कार्यामुळे भारावून गेलो. त्यानंतर आम्ही गणपतीपुळ्याला निघालो.

Sunday, July 19, 2015

कोकण सफर : ८ : काही मंदिरे

ह्या एका दिवसात आम्ही तीन गावांना भेटी दिल्या.

सर्व प्रथम आम्ही गेलो आडिवरे या गावी. इथे या भागातले प्रसिद्ध महाकाली मंदिर आहे. कोकण आणि गोव्यातली बरीच मंदिरे कौलारू असतात. एरवी मंदिराचे साधारण प्रवेश, गाभारा, कोरीव भिंती, कळस असे जे स्वरूप असते त्यापेक्षा इथे बरीच वेगळी मंदिरे पाहायला मिळतात.

छायाचित्राचा स्त्रोत
कोकणात जशी कौलारू घरे असतात, तशीच. शाळेत भूगोलात कौलारू घरांचा उपयोग शिकवला जातो. पावसाचे पाणी सहज वाहून जाऊन त्याचा निचरा व्हावा यासाठी कौलारू घरे बांधली जातात. असे पाठांतर आपण केलेले असते, घटक चाचणी, सहामाही असा पुन्हा पुन्हा तो प्रश्न विचारलेला मला आठवतो. त्यात त्याची बांधणी पण असावी. मला कौलारू घर अथवा मंदिर काहीही पाहिले तरी तो भूगोलाचा धडा आणि ते पाठांतर याची पुन्हा उजळणी होते.

एसटी मंदिराच्या अगदी समोर थांबली. विचारत जावे लागले नाही. अगदी पटकन आणि सहज दर्शन झाले. मंदिर सुंदर होते. मंदिरात एक वेगळ्याच प्रकारची विहीर होती. विहीर वेगळ्या प्रकारची म्हणण्यापेक्षा तिथला पाणी काढण्याचा रहाट खूपच वेगळा होता. आता नीटसा आठवत नाही. पण खूप वेगळा होता. त्याने पाणी काढणे अगदी सोपे होते. तिथे काही बायका पाणी काढत होत्या, तर आम्हीपण थोडं पाणी काढुन पाहिलं होतं.

छायाचित्राचा स्त्रोत
दर्शन करून आम्ही लगेच पुढची बस पकडून कशेळीला गेलो. इथे एक सूर्य मंदिर आहे. सूर्य आपल्याकडे महत्वाचा देव असला तरी त्याची मंदिरे भारतात खूप कमी आहेत. कोणार्कचे सूर्य मंदिर तिथल्या रथामुळे जगप्रसिद्ध आहे. हे मंदिर इतके भव्य नाही. थोडेबहुत आडिवरे सारखेच होते. पण आम्ही दुपारी पोहोचलो होतो, आणि त्यामुळे काही गर्दी नव्हती. मंदिरात फक्त आम्हीच होतो. अगदी शांत आणि निवांतपणे देव भेटल्यासारखा वाटला.

तिथून आम्ही गेलो पावसला. पावसला स्वामी स्वरूपानंद यांचा मठ आहे. गीता हा ग्रंथ असा आहे, कि त्यात बहुमोल आणि चिरकालीन टिकणारी तत्वे सांगितली आहेत. ज्यांच्या बळावर आपण आयुष्य जगू शकतो, ज्यांचा आधार घेऊ शकतो अशी हि तत्वे आहेत. त्यामुळे अनेक महान लोकांचा (भारतीय आणि परकीय दोन्ही ) गीतेचा अभ्यास असलेला दिसतो.

काही प्रतिभावंत लोकांचा अभ्यास फक्त स्वतःपुरता राहत नाही. त्यांना गीतेवर भाष्य करणे अथवा आपल्या भाषेत ती पुन्हा लिहून काढणे याचा मोह आवरत नाही. त्यामुळेच ज्ञानेश्वर यांनी सामान्यांना कळण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली. विनोबांनी गीताई लिहिली. टिळकांनी गीतारहस्य लिहिले. तसेच या स्वामींनी आपल्या भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली. त्यांचे आणखीही लेखन आहे. आम्ही या आधी लहानपणी तिथे गेलो होतो तेव्हा हि ज्ञानेश्वरी आम्ही आणली होती.

या मठाबाहेर अगदी स्वस्त दरात (तेव्हा ३ रुपये फक्त, आता अशात ६ रुपयांना आहे असं ऐकलं) कोकम शरबत मिळत होतं. हे मी पिलेलं आतापर्यंतचं सर्वोत्तम कोकम शरबत. अशी सर्वोत्तम चव मिळते तेव्हा मी सहसा एकावर थांबत नाहीच. आणखी एक दोन शरबत रिचवून आम्ही पावसहून निघालो.

पुढे आम्ही एका ठिकाणी (बहुतेक तरी देवरुख) मुक्काम करून नंतर मार्लेश्वरला गेलो. हि जरा वाकडी वाट असली तरी गेलो. एक तर आम्ही पास काढलेला होता त्यामुळे वाकडी तिकडी, उलट सुलट कशीही असली तरी आम्हाला फरक पडत नव्हता. आणि दुसरे म्हणजे आम्ही सहलीचा प्लान करत होतो तेव्हा अक्षयने मार्लेश्वरची खूप स्तुती केली होती. तो तिथे आधी जाऊन आला होता, आणि तिथे जायलाच पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं. त्याची पुन्हा जायची प्रबळ इच्छा होती, आणि आम्हाला पण पहिल्यांदा जायची इच्छा होती.

मग चांगलं ठिकाण असेल तर तिथे जायला जी वाट असेल तिकडून तुम्हाला जावंच लागतं. मार्लेश्वर हे शिवाचे मंदिर आहे. हे एवढे वर्णन पुरेसे नाही. मार्लेश्वर हे उंच डोंगरात गुहेतले शिवाचे मंदिर आहे. तिथून जवळच पुढे मोठे धबधबे आहेत. खाली वाहती नदी आहे. अत्यंत सुंदर निसर्गात वसलेलं मंदिर. अक्षय मागे आला होता तेव्हा त्याने इथे जिवंत सापसुद्धा पाहिले होते. पण आम्हाला यावेळी ते दिसले नाहीत.

मंदिरातून बाहेर आल्यावर आम्ही पुढे जाऊन धबधबा पाहायला गेलो. तो तेव्हा पूर्ण जोरात वाहत नसला तरी तो पावसाळ्यात किती भव्य असेल याची कल्पना येत होती. इथे मंदिर धबधबा आणि परत असे यायला जायला खूप चालावे आणि चढावे उतरावे लागते. आम्ही उन्हात फिरून त्रस्त झालो होतो.

पावसाळ्यात पुन्हा यायला हवे असे आम्हाला वाटले. पण ती जागा खरोखर सुंदर आहे, आणि तिथे जाणे वर्थ होते, व्यर्थ नाही.





परत जातांना आम्ही फोटोग्राफी सुरु केली. काही ग्रुप काही सोलो असे फोटो काढले. मी एक फोटोग्राफीचा कोर्स केला असल्यामुळे मी फोटोग्राफर असल्यासारखं मिरवायचो. मित्र माझी उडवायचे, पण फोटो चांगले आले कि कौतुक पण करायचे. मयुरलासुद्धा फोटो काढण्याची हौस होती. जास्त करून मीच फोटो काढायचो पण, मधेच तो कॅमेरा घेऊन तिरप्या तार्प्या पोजमध्ये बसून फोटो काढायचा, आणि पहा कसला भारी फोटो काढलाय अशा अविर्भावात कॅमेरा परत द्यायचा.

पण त्याला फोटो काढून घेण्याची जास्त हौस होती. अक्षयची ती हौस तेव्हा इतकी प्रबळ नव्हती, पण आताशा खूपच वाढली आहे. त्या सहलीत मात्र मयुर फोटो काढून घेण्यामध्ये सर्वात पुढे होता. तो साध्या, फिल्मी अशा पोज तर द्यायचाच. पण त्याला सरकार चित्रपट प्रचंड आवडला होता, आणि त्यामुळे नेते, भाई लोक यांच्यासारखे, बुवा महाराज यांच्या सारखे सुद्धा फोटो काढून घ्यायचा.

कधी कधी मजा म्हणुन उगाच और एक, और एक करून फोटो काढायला लावायचा. मला फोटो काढायला काही अडचण नसली तरी दिवसभर फिरायचे तर बॅटरी जपून पुरवावी अशा विचाराने चिडचिड व्हायची. तशी मस्ती नेहमीच चालू असली तरी या ठिकाणी बॅटरी कमी झाली असल्यामुळे आमचं भांडण झालं होतं. शेवटी कॅमेरा बंद पडला, आणि तो आणि पुढचा दिवस चार्ज करता आला नाही. :D

वाकड्या वाटेने पुन्हा मागे येउन आम्ही रत्नागिरीला गेलो. 

Sunday, July 12, 2015

कोकण सफर : ७ : विजयदुर्ग आणि राजापुर

विजयदुर्ग हा कोकणातला एक प्रसिद्ध किल्ला आहे. त्याचे पूर्वाश्रमीचे नाव घेरिया होते. हा शिवरायांनी आदिलशाहकडून जिंकून घेतला आणि मग त्याचे विजयदुर्ग असे नामांतर केले. हा किल्ला शिवरायांच्याहि बऱ्याच आधीपासून अस्तित्वात आहे. शिलाहार राजांनी तो बाराव्या शतकात बांधला असे वाचायला मिळाले.

आधी चहुबाजूंनी पाण्याने वेढलेला हा जलदुर्ग होता. पण आता एका बाजुला भर टाकुन तो जमिनीशी जोडला गेला आहे. त्यामुळेच आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा अगदी किल्ल्याच्या दारासमोरच उतरलो. आणि तो असा जमिनीवर पाहुन आम्हाला आश्चर्य वाटले. तो सिंधुदुर्गासारखाच बेटावर असेल आणि होडीने जावे लागेल अशी आमची कल्पना होती.

खूपच रणरणतं उन होतं त्या दिवशी. आम्ही समोरच्या हॉटेलमध्ये पाणी शरबत वगैरे घेतलं. किल्ला पाहून आल्यावर तिथेच जेवू असं सांगितलं आणि आमचं जड सामान त्याच हॉटेलमध्ये ठेवुन आम्ही किल्ला पाहायला गेलो.

तो सुटीचा दिवस नव्हता, एवढं उन होतं आणि किल्ल्यावर सामसुम होती. इथे आम्हाला कोणी गाईडसुद्धा दिसला नाही. किल्ल्यावर फक्त आम्हीच फिरत होतो. आणि तसाही एक जलदुर्ग नुकताच पाहिला असल्यामुळे रचनेबद्दल थोडीफार कल्पना होतीच. गाईडकडून किल्ल्याचा इतिहास तेवढा नव्याने समजला असता.

छायाचित्राचा स्त्रोत
आम्ही किल्ल्यावर फेरफटका मारला. अगदी निवांत फिरलो. एका बुरुजावर उभे राहून समुद्र न्याहाळला. छान वारं सूटलं होतं म्हणुन एवढ्या उन्हात पण जर थंडावा मिळाला. समोर तळपत्या सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात चमचम करत होते. खूपच सुंदर आणि दिलखेचक दृश्य होतं ते.

किल्ला फिरून बाहेर गेलो. ठरलेल्या हॉटेलमध्ये जेवलो. कोकणात पर्यटन हा मोठा उद्योग आहे आणि तो दिवसेंदिवस फोफावतोय. आजकाल कोकणातल्या कुठल्याही (पर्यटनासाठी लोकप्रिय असलेल्या) गावात जवळपास सगळ्या घरात खानावळी आणि कॉटेज असतात.

कोकणात मांसाहारी अथवा मत्स्याहारी लोकांची चंगळ असते. अशा लोकांना चिकन अथवा माश्याची एखादी छान डिश मिळाली कि ते खुश होतात. ती कोकणात मिळतेच. पण आम्ही तिघे मुख्यत्वे शाकाहारी लोक. मी कधी कधी चिकन किंवा फिश चवीला घेतो, पण आवड नाही. आणि इतक्या गरमीत तर नाहीच नाही. तर शाकाहारी लोकांची मात्र पंचाईत होते.

घरगुती जेवण या शीर्षकाखाली सगळी कडे तेच (तेच!!!) जेवण मिळतं. तुम्ही फक्त व्हेज कि चिकन कि फिश थाळी एवढंच सांगा. व्हेज म्हटलं कि बटाटा, पत्ताकोबी या पैकी एक भाजी, एक पातळ मटकी वगैरेची उसळ आणि सपक वरण भात हा ठरलेला मेनू. काहीच बदल नाही. त्यातली सोलकढी फक्त काय ती आम्हाला आवडायची.

जेवण करून आम्ही पुढे निघालो राजापूरला. राजापुर ला आम्हाला फक्त मुक्कामाला जायचे होते. आणि तिथुन सकाळी पुढच्या प्रवासाला.

आम्हाला बसच्या प्रवासात अगदी मागच्या बाजूला थोड्या पुढेमागे जागा मिळाल्या. त्या बसमध्ये बरेच लोक तो प्रवास रोज करणारे होते. आम्ही त्यांच्याशी गप्पा मारायला लागलो. ते एकाच गावात राहणारे, कामानिमित्त रोज सोबत प्रवास करणारे लोक होते. एकमेकांचे मित्रच होते. त्यांच्या आपसातसुद्धा गप्पा आणि हसणे खिदळणे चालू होते. आम्ही त्यांच्यात लगेच मिसळलो.

त्यांनी आमची सगळी हकीकत ऐकली, प्रवास कुठून कसा केला, आता कुठे जाणार ते ऐकलं. मग आमचं कसं चुकलं हे ऐकवलं. (हे अपेक्षितच होतं, पण ते टीकेच्या सुरात नाही तर सहज गप्पांच्या ओघात हे महत्वाचं :D ) तुम्ही इकडून तिकडे मग इकडे मग तिकडे असं करायला पाहिजे होतं असं सांगायला लागले. ह्यावरून त्यांचे आपसात मतभेद झाले. छ्याः, तिकडे काय आहे बघण्यासारखं, अरे तो रस्ता किती खराब आहे, असे त्यांचे दावे प्रतिदावे चालले होते. पण आमचा प्लान चुकला होता ह्यावर त्यांचं एकमत होतं. :)

एक दोघांनी आम्हाला त्यांच्या घरीच राहायला बोलावलं. पण सावंतवाडीमधल्या त्या क्रिकेट कोचच्या आपुलकीचा चांगला अनुभव असल्यामुळे आम्ही तो धोका पत्करला नाही. आणि त्यांनी हि फार आग्रह केला नाही. आम्ही बसस्थानका जवळच एका हॉटेलात मुक्काम केला. मला वाटतं त्याच रात्री का दुसऱ्या दिवशी पहाते बेनझीर भुट्टो यांची हत्या झाली होती. हॉटेलचा चालक त्या ब्रेकिंग न्यूज टीव्हीवर पाहत बसला होता.

आमची मग हॉटेलच्या लॉबीमध्ये भारत पाकिस्तान राजकारणावर बरीच चर्चा झाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आवरून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. 

Tuesday, July 7, 2015

कोकण सफर : ६ : कुणकेश्वर

कुणकेश्वरला आम्ही रात्री पोहोचलो. अगदी गुडुप अंधार झालेला होता. आम्ही राहायला जागा शोधत फिरू लागलो.

एका घरी काही खोल्या भाड्याने देण्याची व्यवस्था केली होती, तिथे आम्ही चाललो होतो. समुद्राचा आवाज येत होता आणि वारं सुद्धा खुप छान सुटलेलं होतं.

तिथे सुदैवाने आम्हाला जागा मिळाली. काही जणांनी तिथे आधी जागा आरक्षित केलेली होती, पण ऐन वेळेवर त्यांनी बेत रद्द केला, आणि तो आमच्या पथ्यावर पडला. त्यांनी एक मोठी आणि एक छोटी खोली घेतली होती. त्या मालकांच्या सुदैवाने त्यांना दोन्ही खोल्यांसाठी भाडेकरू मिळाले. आम्हाला त्यातली छोटी खोली मिळाली.

ती खोली काही खास नव्हती. पण आम्ही तिथे ज्या वातावरणात पोहोचलो होतो ते इतकं छान होतं कि आम्हाला खोलीबद्दल काहीच वाटलं नाही.

कधी कधी असंच होतं. एखादी गोष्ट वेगळ्याच कारणासाठी आवडते. काही खाण्याच्या प्रसिद्ध जागी बसायलाही जागा नसते. तरी तिथे लोक जातात. काही ठिकाणी खाद्यपदार्थांचा दर्जा अगदी सुमार असतो, पण ती जागा खूप निवांत असते, तिथे गप्पा छान होतात म्हणून लोक जातात.

हातपाय धुवून आम्ही बाहेर पडलो. कुणकेश्वर मंदिरात गेलो. हे मंदिरसुद्धा खूप छान आहे. समुद्रकिनाऱ्याला अगदी लागून उंच असं मंदिर बांधलेलं आहे. तिथून किनाऱ्यावर उतरायला मोठ्ठा जिना आहे.

दंतकथा अशी आहे कि एका वादळात अडकलेल्या जहाजावरून एक व्यापारी बचावून या किनाऱ्यावर पोहोचला. आणि त्याने इथे हे मंदिर बांधलं.

आम्ही मंदिरात गेलो. मंदिरात फार गर्दी नव्हती. प्रसन्न आणि मनासारखं दर्शन झालं.

मंदिरात गेलो कि अक्षय त्याला येतील तेवढे सगळे मंत्र आणि स्तोत्र म्हणतो आणि त्याला बाकीच्यांच्या तुलनेत नेहमी जास्त वेळ लागतो. इथे मात्र आम्ही सगळेच प्रसन्न वातावरणामुळे, मंदिराच्या सौंदर्यामुळे, तिथल्या शांततेमुळे भारावून गेलो होतो. अशा ठिकाणी जी देवाशी जवळीक जाणवते, भक्ती दाटते, ती रांगेत लागून, मंदिरात ओळख काढून किंवा पैसे मोजून पास काढून रांगेला बगल देत जे दर्शन उरकलं जातं त्यात कधीच होत नाही.

चराचरात ईश्वर आहे असे मानणाऱ्या आणि शिकवणाऱ्या आपल्या समाजात देवाचे वेगळे मंदिर बांधण्याचा उद्देश देवाजवळ जाता यावे, त्याचा सहवास जाणवावा म्हणूनच असावा. पण आताच्या कर्मकांडांच्या पद्धतीत सगळं काही उरक्ल्याची, फक्त पार पडल्याची भावना होते, देव भेटल्याची नाही.

इथे आम्हीसुद्धा जास्त वेळ बसलो होतो. पण अक्षय त्याच्या नेहमीच्या वेळेपेक्षासुद्धा खूप जास्त वेळ बसला होता. आम्हाला वाटलं मंत्र एकदा नाही तीनदा म्हणेल. पण अक्षय खूपच वेळ बसून होता. त्याची तंद्री लागली होती. आम्हाला आता आपला मित्र संन्यास घेतो कि काय अशी भीती वाटायला लागली. पण तसं काही झालं नाही, काही वेळाने अक्षय परत माणसात आला.

आम्ही बराच वेळ बाहेर कठड्यावर बसलो.

एक काका भेटले. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या. पण त्या काकांना तरुण श्रोते मिळाल्यामुळे जास्त हुरूप चढला. माझा अध्यात्माचा सुद्धा अभ्यास आहे, आणि आपण इथे मंदिरात या वातावरणात बसलेलो आहोत तर मी तुम्हाला त्याबद्दल थोडं सांगतो असं म्हणून चांगलंच प्रवचन दिलं. आता त्यातलं काहीही आठवत नाही. फक्त असं गाफील पकडून प्रवचन दिल्यामुळे त्या काकांची आठवण राहिली आहे.

आम्ही गावात फेरफटका मारून एका ठिकाणी जेवलो. तिथे अतिशय मोठा ग्रुप आलेला होता. त्यांचा धिंगाणा, मौजमजा चालू होती. थोडावेळ दुरून त्यांची मजा बघितली आणि आम्ही परत रूमवर जाऊन झोपलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर किनाऱ्यावर जायचा विचार होता पण आम्हाला जाग आली नाही. आम्ही उठलो तेव्हा मयुर गायब होता. तो काही वेळातच आला. त्याला जाग आली होती, आणि आम्ही उठलो नाही म्हणून तो एकटाच जाऊन फिरून आला होता. आणि असलं भारी वातावरण होतं यार, खूप मस्त वाटत होतं म्हणून आम्हाला जळवत होता.

या पूर्ण सहलीत कुणकेश्वरला आम्ही जे वातावरण आणि शांतता अनुभवली त्यामुळे या गावाची आणि मंदिराची एक वेगळ्याच प्रकारची रम्य आठवण आहे. काही दिवसांनी एकदा अक्षयला एका वक्तृत्व कलेच्या तासामध्ये आवडत्या जागेबद्दल बोलायला सांगितलं, तेव्हा तो याच जागेबद्दल बोलला.

आम्ही आवरून पुन्हा मंदिरात दर्शन घेतलं. आणि किनाऱ्यावर बराच वेळ घालवला. मग नाश्ता करून आम्ही त्या सुंदर गावातून निघालो.

Friday, June 12, 2015

कोकण सफर : ५ : सिंधुदुर्ग आणि स्नोर्केलिंग

मालवण ला आम्हाला मुख्य आकर्षण होतं ते सिंधुदुर्गाचं. शिवरायांनी बांधलेल्या या प्रसिद्ध जलदुर्गाचं.

मालवण ला पोहोचलो कि लगेच आम्ही चौकशी करत सिंधुदुर्गा साठी जिथून होड्या सुटतात त्या धक्क्यावर आलो. तिकीट काढून होडीत बसलो. सिंधुदुर्ग मालवण जवळ समुद्रात एका बेटावर बांधलेला आहे. तिथे होडीनेच जावे लागते.

तिकडे जाताना दुरूनच तो दुर्ग दिसायला लागतो. तिथे पोहोचल्यावरच त्याची रचना किती विचारपूर्वक केली आहे हे जाणवायला लागते. याआधी मी जंजिरा पाहिलेला असल्यामुळे किल्ल्याची काही वैशिष्ट्ये लक्षात येत होती. जसे कि, हे किल्ले बेटावर असल्यामुळे चहूबाजूंनी गलबते होड्या येऊ शकतात, त्यामुळे दरवाजा छुप्या पद्धतीने बांधलेला आहे. दुरून लवकर लक्षात येत नाही, माहितगार लोकच तिथे त्वरित जाऊ शकतील. तसेच शत्रू आलेच तर त्यांच्यावर दगड, गरम तेल यांनी हल्ले करण्यासाठी सोय करून ठेवलेली आहे.

इथे सुद्धा आम्ही माहिती दाखवण्यासाठी गाईड केला. जवळच एका दुकानात ५ रुपये देऊन आमच्या बॅग तिथे काढून ठेवल्या.

ह्या किल्ल्यावर काही एकमेव अशा गोष्टी आहेत. किल्ल्याच्या प्रवेशा जवळच शिवरायांच्या हाताचे आणि पायाचे ठसे आहेत.

शिवरायांचे मंदिर आहे. शिवरायांना आणि जिजाऊ यांना अनेक जण देव मानत असले तरी त्यांचे प्रत्यक्ष मंदिर इथेच आहे. शिवरायांनी प्रतिष्ठापना केलेल्या देवांची मंदिरे आहेत.

आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे समुद्राच्या खाऱ्या पाण्याने वेढलेल्या बेटावर गोड पाण्याचा स्त्रोत आहे, हेच पाहून महाराजांनी हा किल्ला बांधला होता.

मालवण हून या किल्ल्यावर येण्यासाठी एक पायी येण्याजोगा रस्ता सुद्धा होता. पाण्यातून च असला तरी तो उथळ भागात असल्यामुळे चालत येण्या जोगा होता. काही गावातले जाणते लोक तो वापरत होते. पण जपान मध्ये आणि दक्षिण भागात सुनामीच्या लाटा जेव्हा आल्या होत्या, तेव्हा त्याचा परिणाम इथपर्यंत झाला आणि ती वाट पाण्यात गेली. निसर्गाच्या रौद्र रूपाचा परिणाम किती दूरवर होतो.

किल्ल्यावर फिरून आम्ही परत होडीने मालवणला पोहोचलो. धक्क्यावर आम्हाला लोक स्नोर्केलिंग साठी विचारात होते. आम्हाला याबद्दल पूर्ण कल्पना नव्हती.

त्यांनी आम्हाला माहिती दिली कि स्कुबा डायव्हिंग मध्ये जसे संपुर्ण संच घेऊन प्रशिक्षित लोक समुद्रात खोलवर जाउन येतात, प्रवाळे, मासे बघतात. पण त्याला प्रशिक्षण लागते ते महागडे असते, संच लागतो तो हि महागडा असतो.

तसे स्नोर्केलिंग हे फार खोल न जाता वरच्या वर पोहत थोडी डुबकी मारत करायचे असते. आणि इथे तिथले गार्ड आपल्या सोबत येउन आपली मदत करतात. आणि संरक्षक जाकीट घालून जायचे असल्यामुळे पोहणे यायची हि गरज नाही.

आम्ही लगेच तयारी दाखवली. पण अक्षयला पाण्याची भीती असल्यामुळे तो तेव्हा यायला तयार झाला नाही. आम्ही त्याला तयार करण्याचा प्रयत्न केला पण तो काही बधला नाही.

मी आणि मयुर दोघेच अक्षयकडे सामान ठेवून गेलो. एका होडीत बसून आम्ही पुन्हा सिंधुदुर्गाच्या दिशेने गेलो. सिंधुदुर्गा जवळच पाणी कमी खोल आहे आणि तिथे बऱ्यापैकी उथळ पाण्यात बघण्यासारखी सुंदर प्रवाळेसुद्धा आहेत. त्यामुळे तिथे स्नोर्केलिंगची चांगली सोय झाली आहे, अनेक स्थानिक मुलांना रोजगारसुद्धा मिळाला आहे.

मी तिथे पहिल्यांदाच स्नोर्केलिंग केलं आणि नंतर काही वर्षांनी जकार्ता ला. आणि दोन्ही वेळेसचा अनुभव अगदी सुंदर होता.

पाण्यात गेल्यावर वेगळ्याच जगात गेल्यासारखं वाटतं. तिथला झिरपणारा प्रकाश, त्यात दिसणारे रंग. परमेश्वराने या दृष्टी आडच्या सृष्टीत रंग अजूनच मनसोक्त उधळले आहेत.

ते लोक आम्हाला माहिती सुद्धा सांगत होते. त्यांच्या अंदाजे ते प्रवाळ ३०० वर्ष आधीचे असावेत. म्हणजे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या काळातले.

मी स्नोर्केलिंग करून खूपच खुश झालो होतो. ते करून आल्यावर मला खूप प्रसन्न वाटलं.

धक्क्यावर पोचल्यावर आम्हाला सार्वजनिक स्नानगृहात अंघोळ करणं भाग होतं आता नेमकं आठवत नाही, पण तिथे नंबर लागण्यात, पाणी आणि साबण मिळण्यात खूप वेळ लागला होता आणि तिथल्या चालकाशी भांडण झालं होतं असं आठवतंय.

अंघोळ झाल्यावर आम्ही गावात जाउन एक प्रसिद्ध खानावळ शोधत होतो, पण तिथे खूप गर्दी होती, आणि वाट बघावी लागणार होती. आम्हाला तेवढी वाट बघवणार नव्हती म्हणुन आम्ही एका अगदी छोट्या खानावळीत गेलो. तिथे फक्त आम्हीच होतो, आम्ही गेल्यावर तिथल्या आजोबांनी स्वयंपाक केला आणि वाढलं. इतकी भूक लागलेली असल्यामुळे आम्ही ते साधंच पण गरमागरम जेवण आनंदाने घेतलं.

मालवणहून आम्ही पुढे निघालो कुणकेश्वरला.

Friday, June 5, 2015

कोकण सफर : ४ : सावंतवाडी आणि आंबोली

कोल्हापुरहून आम्ही रात्रीच्या गाडीने सावंतवाडीला गेलो. सावंतवाडीला अगदी पहाटेच पोचलो. सावंतवाडीला हॉटेल शोधायला मात्र आम्हाला थोडी अडचण आली.

अक्षय सामान घेऊन बसस्थानकावर थांबला. मी आणि मयुर हॉटेल शोधायला बाहेर पडलो. पहाटेच पोहोचल्यामुळे सगळी दुकाने बंद होती. रस्त्यावरसुद्धा सामसुम होती. ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर जवळ असल्यामुळे सगळी हॉटेल्स पूर्ण भरलेली होती. कुठेच जागा नव्हती.

मला एका म्हाताऱ्या काकांनी त्यांचा कोकणी हेल काढून टोमणा/सल्ला पण दिला.
"हा सीझन असा ते माहित नाय का तुला? सावंतवाडीस या टायमाला यायचे म्हणजे बुकिंग करायला नको?"

मी आणि मयुर एका चौकातून वेगवेगळे होऊन हॉटेल शोधत होतो. थोड्या वेळातच मला मयुरची हाक ऐकू आली. मयुरसोबत एक म्हातारा कृश माणूस दिसत होता. मी तिकडे गेलो. मयुर म्हणाला हे काका आता आपल्याला नेतील एका हॉटेलवर.

मयुरला अशी कुठल्याही ठिकाणी तिथल्या लोकांशी गप्पा मारत सलगी करायची सवय आहे. ह्या सवयीने त्याचे लोकांशी फार लवकर चांगले संबंध तयार होतात. तो अशा गप्पा मारून बरीच माहिती गोळा करतो. त्याचा आम्हाला आमच्या सहलींमध्ये फायदासुद्धा होतो. आणि आता ह्या सवयीचा त्याला त्याच्या कामातसुद्धा फायदाच होतोय. पण फायद्याबरोबर कधी कधी विचित्र लोक भेटले तर डोक्याला तापसुद्धा होतो, आणि कधी मजेदार किस्से होतात. तसा ह्या माणसाने सावंतवाडीत आमच्या डोक्याला चांगलाच ताप करून ठेवला होता.

पहाटे पहाटे बाकी सगळी सामसूम असताना रस्त्यावर भेटलेल्या माणसाकडून फार काय अपेक्षा करणार?

मला तो माणूस पिलेला वाटत होता. आम्ही त्याच्याबरोबर गेलो. तो त्याच्याबद्दल सांगायला लागला. म्हणे मी क्रिकेट कोच आहे. शाळेतल्या मुलांना शिकवतो. खासगी कोचिंगसुद्धा करतो. गरीब मुलांना मदत करतो.

त्याने आम्हाला एका हॉटेलवर नेलं. बाहेरून ते काही खास वाटतच नव्हतं. पण कोकणात बऱ्याच लोकांनी आपल्या घरात एक दोन खोल्या बांधून घरगुती निवारा सुरु केलेला आहे. आम्हाला वाटलं तसाच हा असेल. आणि काटकसर हे आमचं या ट्रीपचं धोरणच होतं त्यामुळे आमच्या काही अपेक्षा नव्हत्या.

त्याने "अप्पा…" अशी हाक मारून एका म्हाताऱ्याला उठवलं. त्याने आम्हाला सांगितलं होतं कि हे त्याच्या मित्राचं हॉटेल आहे. पण त्या आप्पांनी याला काही भाव दिला नाही. हा माणूस भाडेकरू घेऊन आल्याचं त्याला काही कौतुक नव्हतं. आम्ही भाडं भरलं आणि रूममध्ये गेलो.

इतक्या दळभद्री हॉटेलमध्ये आम्ही त्याआधी आणि त्यानंतरसुद्धा गेलो नाही. सगळ्या भिंतीना ओल लागली होती. पंख्याला काही वेग नव्हता. गाद्यासुद्धा कुबट वासाच्या. एका गाडीला बहुतेक बेडशिटसुद्धा दिलेलं नव्हतं. पण काही इलाज नव्हता. बाकी कुठे जागाच नव्हती. अडला हरी गाढवाचे पाय धरी.

तो माणुस आमच्या मागेमागे रूमवर आला होता. आम्हाला रूम आवडली नव्हती हे बघून लगेच म्हणाला चला मग माझ्या घरी चला. मीपण माझ्या घरी खोल्या बांधलेल्या आहेत . मी तुम्हाला आधीच म्हणणार होतो. पण तिथे माझ्या कोचिंगची मुलं राहतात. म्हटलं तुम्ही शहरातली माणसं तुम्हाला असं शेरिंग मध्ये चालणार नाही. म्हणून इथे घेऊन आलो.

आम्ही आता हा त्याच्या घरी घेऊन जाइल या भीतीने हॉटेलमधेच ठीक आहे म्हणून सांगितलं. तो माणूस मी संध्याकाळी चक्कर मारतो (कशाला???) म्हणून निघून गेला.

आम्ही आवरायला म्हणुन रूमच्या बाहेर असलेल्या संडास बाथरूमकडे गेलो. अतिशय गलिच्छ होतं. आम्ही शेवटी त्या सकाळी आणि दुसऱ्या सकाळी जवळच बसस्थानकावर असलेल्या सुलभमधेच पैसे देऊन प्रातःविधी उरकले.

सावंतवाडीला तिथली लाकडी खेळणी आणि जवळचा एक किल्ला बघायचा आमचा बेत होता. पण असं कळलं कि तो किल्ला चढायला फार अवघड होता आणि बघायला काही विशेष नव्हतं. आणि तिकडे जायचं तर सकाळी खूपच लवकर जायला हवं होतं.

कोणीतरी आम्हाला आंबोलीला जाण्याबद्दल सुचवलं. आणि आम्ही सावंतवाडीला येउन चुकलो, कोल्हापूरहून सावंतवाडीला येताना आधी आंबोली लागतं, तर आधी आंबोलीलाच जायला हवं होतं असंही सांगितलं. आंबोली आमच्या आधीच्या प्लानमध्ये नव्हतं. पण आंबोलीबद्दल माहिती ऐकून आम्ही तिकडे गेलो.

छायाचित्राचा स्त्रोत
आंबोली हे माळशेजसारखं मोठ्ठ्या घाटावर असलेलं गाव आहे. घनदाट झाडी, डोंगरदऱ्या असलेलं हे गाव महाबळेश्वर आणि माळशेज सारखंच प्रेक्षणीय आहे. आम्हाला हे गाव खूप आवडलं.

इथे बसमधून उतरताच पन्हाळ्यासारखे रिक्षावाले आमच्याजवळ आले. आम्ही एक रिक्षा आंबोलीमधली ठिकाणे पाहण्यासाठी ठरवली. त्यानेच आम्हाला दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी नेउन आणलं आणि माहितीसुद्धा दिली.

छायाचित्राचा स्त्रोत
आंबोलीत आम्ही तिथे एक कायम वाहणारा धबधबा पाहिला. हिरण्यकेशीच्या उगमस्थानी असलेलं महादेव मंदिर आणि आणखी काही मंदिरे पाहिली. एक इको पॉइन्ट पाहिला. तिथे एका स्थानिक शिल्पकाराने लाकडी खेळणी आणि शोभेच्या वस्तु विक्रीस ठेवल्या होत्या. अक्षयने तिथे थोडी खरेदी केली.

हि खरेदी सहलीच्या सुरुवातीच्या भागात केल्यामुळे आम्हाला पूर्ण सहलीत ती घेऊन फिरावं लागलं. त्यातल्या एक दोन वस्तू इतक्या विचित्र आकाराच्या होत्या कि त्यांच्या टोकदारपणामुळे पिशवी फाटत होती, मोठ्या आकारामुळे आमच्या बॅगमध्ये ठेवता येत नव्हती. आम्हाला ती तशीच हातात घेऊन फिरावं लागलं. एक दोनदा आम्ही हि पोस्टाने घरी पाठवून देता आली असती तर किती छान झालं असतं असासुद्धा विचार केला.

असो. तेव्हा आम्हाला सगळ्यांना नंतर कटकट वाटल्या त्या गोष्टींना शेवटी अक्षयच्या घरी शोकेसमध्ये जागा मिळाली आणि त्या तिथून सगळीकडे बाळगत घेऊन येण्याचं सार्थक झालं.

आंबोली पावसाळ्यात आणखी छान असणार याचा अंदाज येतच होता. आमचा प्लान नसतानासुद्धा आमचं इथे येणं झालं ते कोणा अज्ञात माणसाच्या सल्ल्यामुळे.

रिक्षावाल्याने आम्हाला सनसेट पॉइन्टसुद्धा दाखवला. पण तोपर्यंत आम्हाला थांबता येणार नव्हतं. आम्ही परत एसटी पकडून सावंतवाडीला गेलो. हि थोडी उलटीच पण छान चक्कर झाली होती. आंबोली तेव्हापेक्षा आता खूपच लोकप्रिय ठिकाण झालेलं आहे.

सावंतवाडीला संध्याकाळी आम्ही लाकडी खेळण्यांची दुकाने पहायला जाणार होतो. पण तेवढ्यात तो माणूस टपकला. आणि चला मी घेऊन जातो म्हणून आमच्यासोबत लटकला. मला त्याला टाळावं वाटत होतं कारण तो पैसे मागणार याची मला खात्री होती. पण तो ओळखीच्या दुकानात नेउन सवलत मिळवून देईल अशा आशेवर आम्ही गेलो. त्याने एका ओळखीच्या ठिकाणी नेलं खरं, पण ते अगदीच छोटं आणि घरगुती दुकान होतं. त्यामुळे तिथे खूपच कमी मोजकी खेळणी होती. त्यात वैविध्यसुद्धा नव्हतं.

आम्ही तिथे काही न घेता पुढे एका मोठ्या दुकानात गेलो. तो माणूस बाहेरच थांबला. आम्ही तो कटावा म्हणून भरपूर वेळ त्या दुकानात घालवला. पण तो काही कटला नाही. त्या दुकानात मात्र खूप प्रकारची छान खेळणी आणि वस्तू उपलब्ध होत्या. पण थोड्या महागसुद्धा होत्या. तिथून आम्ही काही वस्तु घेतल्या.

बाहेर तो माणुस आम्हाला जेवायलासुद्धा त्याच्या ओळखीच्या जागी न्यायच्या तयारीत होता. आम्ही शेवटी त्याला कटवायचं ठरवलं आणि त्याने पैसे मागितले. आम्ही काही ३०-४० रुपयेच दिले असावेत. तेवढ्यात त्याचा पिच्छा सुटला हे नशीब. ३०-४० रुपयांसाठी सकाळी आणि संध्याकाळी इतका वेळ गावात नव्या लोकांना चिटकणारा असा हा अजब क्रिकेट कोच होता. जाता-जातासुद्धा तो आम्हाला जेवण्यासाठी हॉटेल सांगून गेलाच.

त्याने आम्हाला राहण्यासाठी नेलेलं हॉटेल, लाकडी खेळण्यासाठी नेलेलं दुकान याचा इतका छान अनुभव असल्यामुळे आम्ही हटकुन त्याने सांगितलेलं हॉटेल सोडून दुसऱ्याच ठिकाणी जाउन जेवलो.

रूमवर परत येउन कशीबशी त्या भयानक हॉटेलमध्ये रात्र काढली आणि सकाळी (बसस्थानकावर) आवरून मालवणला निघालो.

Sunday, May 24, 2015

कोकण सफर : ३ : मार्गे कोल्हापूर : शाहु पॅलेस, पन्हाळा, ज्योतिबा

कोल्हापुरात आम्ही बरीच प्रेक्षणीय ठिकाणे पहिली.

शाहु पॅलेस


छायाचित्राचा स्त्रोत
कोल्हापूरच्या भोसले राजघराण्याचा हा भव्य राजवाडा. ह्या घराण्यातल्या अनेक राजपुरुषांची, राजस्त्रियांची व्यक्तीचित्रे, छायाचित्रे इथे पाहायला मिळाली. इथल्या राजवंशात शिकार हा खानदानी शौक होता. वेगवेगळ्या राजांनी मारलेल्या कितीतरी जनावरांच्या कातडीत पेंढा भरून तिथे प्रदर्शनात ठेवले होते. गेंड्याचे पाय वापरून बनवलेले टेबल असे काही फर्निचरचे नमुनेसुद्धा पहिले. छायाचित्रात आणि अशा पेंढा भरून ठेवलेल्या जनावरांची संख्या इतकी प्रचंड होती. आणि त्यात वाघांचे प्रमाण लक्षणीय होते. भारतात वाघांची संख्या कमी का झाली असावी याचे एक कारण तर तिथे दिसत होते. छत्रपति आणि त्यांच्या घराण्याबद्दल नितांत आदर असला तरी तेव्हा अभिमानास्पद असणाऱ्या ह्या शिकारीच्या छंदापायी मारल्या गेलेल्या जनावरांची संख्या पाहून थोडे दुःख झाले.

एका दालनात भोसले घराण्याची वंशावळी लावलेली होती. ती पाहून काही लोक आपले ज्ञान पाजळत होते. शिवाजींचे मोठे भाऊ संभाजी राजेसुद्धा पराक्रमी होते. पण ते तरुणपणीच युद्धात मारले गेले. पण त्यांच्याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नसते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थच शिवरायांनी आणि जिजाऊ यांनी शिवरायांच्या मुलाचे नाव संभाजी ठेवले असेही मी वाचले होते. आमच्यासमोर वंशावळीचा जो भाग होता त्यात शिवरायांच्या पिढीपर्यंतचीच माहिती होती. पुढच्या पिढीची माहिती दुसऱ्या भागात होती. त्यामुळे त्या पिढीतल्या संभाजींचे नाव वाचून एकाला ते संभाजी म्हणजेच शिवपुत्र संभाजी असा गैरसमज झाला. त्याने दुसऱ्याला विचारले,

"अरे!!! संभाजी राजे शिवाजी महाराजांचे भाऊ होते कि काय?"

दुसऱ्यानेही ठोकून दिले. "हो मग. लहाने भाऊ होते महाराजांचे. महाराज गेल्यावर त्यांना गादीवर बशिवलं."

हे ऐकताच मी आणि अक्षयने एकमेकांकडे पाहिले. काही काही लोकांची आणि आपली फ्रिक्वेन्सी अशी जुळते, कि दोघांना लगेच कळते कि तुम्ही कोणत्या गोष्टीबद्दल विचार करत आहात. अक्षय त्या लोकांपैकी एक आहे. एकमेकांकडे पाहताच आम्हाला हसू आले.

पन्हाळा
कोल्हापूरजवळच पन्हाळा हा शिवरायांचा प्रसिद्ध किल्ला आहे. इथेच ते वेढ्यात अडकले होते. आणि इथून विशाळगडापर्यंत त्यांनी एका रात्रीत मजल मारली होती. त्यांना पुढे सुखरूप पोहोचू  देण्यासाठी बाजीप्रभूंनी घोडखिंड (आता पावनखिंड) आपल्या पराक्रमाने अडवून धरली होती, आणि आपले बलिदान दिले होते.

छायाचित्राचा स्त्रोत

बाजीप्रभूंचा एक युद्धाच्या आवेशात असलेला पूर्णाकृती पुतळा या पन्हाळ्यावर उभारलेला आहे. अशा ऐतिहासिक ठिकाणी आपलं मन इतिहासात जातं. तिथे कर्तृत्व गाजवलेल्या थोर व्यक्तींबद्दल आदर दाटून येतो. इतक्या पराक्रमी माणसाचा पुतळा पाहून आपोपाप नतमस्तक व्हायला होतं.





हा किल्ला आम्ही आतापर्यंत पाहिलेल्या किल्ल्यांपेक्षा वेगळा होता. बराच मोठा. आणि त्या किल्ल्यावर अगदी मोठं गावच होतं. आम्ही उतरल्यावर आम्हाला किल्ल्यावर आलो आहोत असं वाटतच नव्हतं. तिथे रिक्षावाले पुढे येउन पूर्ण किल्ला फिरवून आणतो, आणि माहिती पण सांगतो असं म्हणत पुढे आले. आम्ही एक रिक्षा ठरवली . आणि त्याच्यासोबत फिरून आलो. आणि ते बरंच झालं. पायी फिरायला खरंच खूप वेळ लागला असता, आणि गावात दडलेल्या जागांमध्ये महत्वाच्या कोणत्या तेही लक्षात आलं नसतं. जमेल तेव्हा तिथल्या गाईडची मदत घेऊन ती जागा चांगल्या प्रकारे पहावी.

ज्योतिबा
ज्योतीबाला आम्ही संध्याकाळी पोहोचलो. दर्शन झालं. तिथे आम्ही सुदैवाने योग्य दिवशी पोहोचलो होतो. कारण दुसऱ्या दिवशीपासून तिथे कसलीतरी यात्रा सुरु होणार होती. गर्दी लोटण्याआधीच आमचं तिथे जाऊन दर्शन झालं हि ज्योतीबाचीच कृपा म्हणायची.

तिथली गमतीशीर आठवण म्हणजे, दर्शन करून येताना सूर्य मावळला होता. आणि आम्ही तिथे स्थानकावर जाऊन कोल्हापूरच्या बसची वाट पाहत होतो. तिथे आणखी एक मुलांचा घोळकासुद्धा थांबलेला होता. अचानक कुठून तरी जोरात गाणं वाजायला लागलं. ते स्थानक उघड्यावर आणि अगदी साधं होतं, त्यामुळे आम्ही बघत होतो कि गाणं वाजतंय कुठे? मग आमचं लक्ष त्या घोळक्यातल्या एका मुलाकडे गेलं. त्याच्या मोबाईल वर ते गाणं वाजत होतं.

पण मोबाइलच्या तुलनेत आवाज एकदम जोरात होता. "त्या काळी" गाजलेला चायना फोन आम्ही सर्वप्रथम तिथे पाहिला. त्या फोनवर सात स्पीकर होते. आम्ही सहज म्हणून तो फोन हातात घेऊन पाहिला. त्या वेळेसच्या फोनच्या मानाने तो बराच मोठा होता. आणि स्वस्तसुद्धा होता.

ती मुलं आमच्याच बसमध्ये चढली आणि बसमध्ये पण गाणे चालू होते. पूर्ण बसमध्ये आवाज घुमत होता. बसचीच म्युझिक सिस्टम असावी असं वाटत होतं. आमच्याप्रमाणेच बाकीच्या लोकांचं पण लक्ष त्या मोबाईलकडे जात होतं आणि सगळेच तो हाताळून बघत होते. इथे पहिल्यांदा पाहिलेला हा फोन लवकरच सगळीकडे लोकप्रिय झाला. आणि काही दिवस सगळीकडे दिसत होता.

स्नो पार्कची फसलेली चक्कर 
या सहलीला निघण्याआधी मी वर्तमानपत्रात कोल्हापूरमध्ये एक स्नो पार्क चालू झाल्याची बातमी वाचली होती. असंच एक स्नो पार्क हैदराबादलासुद्धा आहे. कोल्हापूरला केंट क्लब या नावाने बहुतेक ते चालु झालेलं होतं. मला तिथे जायची उत्सुकता होती.

पण याबद्दल तेव्हा कोल्हापुरात फारशी कोणाला माहिती नव्हती. मुश्किलीने ते ज्योतिबाच्या डोंगराजवळच कुठेतरी असल्याची माहिती मिळाली. आम्हाला थोडं चुकल्यासारखं वाटलं. आधी माहित असतं तर स्नो पार्क आणि ज्योतिबा दोन्ही एकाच दिवशी केलं असतं. आता एकाच दिशेने दोनदा चक्कर होणार होती.

मला आठवतंय त्याप्रमाणे एका हायवे वरून आत ज्योतिबाच्या दिशेने रस्ता जातो. ह्या रस्त्यावर काही किलोमीटर पुढे एक फाटा आहे. इथून उजवीकडे ज्योतिबा आणि सरळ तो स्नो पार्क होता. आम्हाला एसटीच्या बसने ह्या फाट्यापर्यंतच येता आलं.

पण इथे येउन आमची फजिती झाली. ज्योतिबाची जत्रा सुरु झालेली होती. आणि एसटीने भरपूर जादा गाड्या ज्योतीबाच्याच दिशेने सोडल्या होत्या. या फाट्यावरून पार्कच्या दिशेने कोणतीच गाडी जात नव्हती. आम्हाला एखादी खाजगी गाडीसुद्धा मिळाली नाही.

आम्ही तिथे तासभर तरी उभे असु. शेवटी कंटाळून आम्ही परत जायचं ठरवलं. पण पुन्हा पंचाईत. जत्रेमुळे ज्योतिबाकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या सगळ्या गाड्या आधीच भरून येत होत्या. त्यामुळे बसवाले आम्ही उभे होतो त्या फाट्यावर थांबण्याची तसदीच घेत नव्हते.

आम्हाला बस पकडायला आता हायवेपर्यंत जावं लागणार होतं. तिथून दुसरीकडून कोल्हापूरकडे येणाऱ्या गाड्या मिळण्याची शक्यता होती. आम्ही पायपीट सुरु केली. आणि चालता चालता त्याच दिशेने जाणाऱ्या गाड्यांना खाणाखुणा करून थांबवण्याचे प्रयत्नसुद्धा चालू होते. पण कोणी थांबत नव्हते.

मागुन एक बुलडोझर आला. सगळ्यांना लिफ्ट मागत होतो म्हणून आम्ही गंमत म्हणून त्याला पण लिफ्ट मागितली. आणि आश्चर्य म्हणजे त्याने आम्हाला चढा गाडीत म्हणून सांगीतलं. बुलडोझर असल्यामुळे एकदम हळूहळूच चालत होता. त्याने तो थांबवला नाही. पण आम्ही एक एक करून तसेच चालत्या बुलडोझरवर चढलो.

मयुरची चढताना चांगलीच मजा आली होती. मी त्याचा व्हिडीओ पण काढला होता. त्याच बुलडोझरवर आम्ही बरंच अंतर पुढे आलो. हायवेला येउन कोल्हापूरची गाडी पकडली. अगदी अनपेक्षितरित्या आम्हाला स्नो पार्क ऐवजी बुलडोझरवर राईड मिळाली होती. :D 

Monday, May 18, 2015

कोकण सफर : २ : मार्गे कोल्हापूर : महालक्ष्मी आणि मिसळ

औरंगाबाद - कोल्हापूर अशी रात्रीची सोयीस्कर गाडी न मिळाल्यामुळे आम्ही पुण्याची गाडी पकडली होती. पुण्याला आम्ही मध्यरात्री कधीतरी पोहोचलो. औरंगाबादच्या गाड्या पुण्यात शिवाजीनगर स्थानकात येतात. आणि कोल्हापूरच्या गाड्या स्वारगेट स्थानकातून सुटतात. मध्यरात्री विचित्र वेळी पुण्यात पोहोचल्यामुळे रिक्षावाले स्वारगेटला जाण्याचे अव्वाच्या सव्वा भाडे सांगत होते. त्यामुळे आम्ही एका कंडक्टरला विनंती करून एसटीच्याच एका बसमध्ये स्वारगेटला गेलो.

तिथे मध्यरात्रीसुद्धा भयानक गर्दी होती. आमचे आरक्षण तर नव्हतेच. जागा पकडण्यासाठी अक्षरशः चेंगराचेंगरी, मारामारी होत होती. कोल्हापूरची पहिली गाडी आली तेव्हा मी पुढे जायचे ठरवले. सामान अक्षयकडे ठेवुन मी गर्दीत घुसलो. एका जागी बसलो आणि दुसरी जागा रुमालाने पकडली. पण तिथे आणखी एकाने रुमाल फेकला. त्याच्याशी वाद चालू असताना गाडी भरलीसुद्धा. खालून अक्षय/मयुरला आणखी एक गाडी लवकरच असल्याचे समजले म्हणून मी माझा रुमाल घेऊन उतरलो. 

पण पुढची गाडी यायला बराच वेळ लागला. आमचा तिथे टाईमपास चालू होता. बस यायला काही मिनिटे असतानाच नेमका मयुर मी आत्ता येतो म्हणून शौचास गेला. :D आणि नेमकी दोन मिनिटात गाडी आली. त्या गाडीतही प्रचंड गर्दी झाली. पण हा येतो कि नाही म्हणून आम्ही जागा पकडलीच नाही. आणि काही फायदासुद्धा झाला नसता. आत्ता येतो म्हणून गेलेला तो बस गेल्यावर काही वेळाने आला. माझी त्याच्यावर चिडचिड झाली. आत्ताच जायचं आवश्यक होतं का म्हणून? तो म्हणाला जोराची होती यार, कोल्हापूरपर्यंत थांबता आलं नसतं. नेचर्स कॉल शेवटी. काय करणार?

आणखी काही वेळाने एक गाडी आली. त्यात आम्हाला एकच सीट मिळाले. बरेच लोक खालीच बसले. आम्ही अजून वेळ न घालवता याच गाडीने पुढे जायचे ठरवले. दोनजण दारापाशी असलेल्या पायरीवर बसलो. आणि मिळालेल्या एकुलत्या जागेवर पाळीपाळीने बसलो. पायरीवरसुद्धा जागा बदलत एकमेकांना टेकून झोपण्याचे प्रयत्न केले. 

कसेतरी आम्ही सकाळी लवकर कोल्हापूरला पोहोचलो. महालक्ष्मी मंदिराजवळच आम्ही एक कॉट बेसिस हॉटेल शोधले. हे हॉटेल पहिल्या मजल्यावर होते. त्यात दोन बाजूला मोठे हॉल होते आणि त्यात २-३ ओळीमध्ये बिछाने मांडले होते. एक बाजू बरीचशी भरली होती. त्यांनी आम्हाला आधी दुसऱ्या रिकाम्या हॉलमध्ये जागा दिली. आम्ही त्यामुळे खुश होतो. सामान ठेवून आम्ही लगेच बाथरूम वगैरे गोष्टी बघत होतो. तेवढ्यात एक मोठे कुटुंब तिथे आले. त्यांनी तो अक्खा हॉल भाड्याने घेतला आणि आम्हाला दुसऱ्या भरलेल्या हॉलमध्ये जाणे भाग पडले.

आम्ही तिकडे गेलो. सगळ्यांना एक दिवाण मिळालेला होता. कोपऱ्यात कपाटे होती. ५-१० रुपये भाडे असावे. महत्वाचे सामान कुलूप लावून ठेवण्यासाठी. जेवढे महत्वाचे सामान बसेल ते त्यात ठेवले, बाकी दिवाणाजवळच. आजूबाजूच्या काही लोकांशी गप्पा मारल्याचं सुद्धा आठवतंय. एक दोनजण नोकरीसाठी आले होते. त्यांची मुलाखत होती. काहीजण फिरतीवरच काम असणारे होते. बऱ्याचदा तिथे येउन राहणारे. गप्पा मारता मारता एकेकाने बाथरूममध्ये नंबर लावून आवरून घेतले. 

छायाचित्राचा स्त्रोत


आवरून लगेच आम्ही महालक्ष्मी मंदिरात गेलो. महाराष्ट्रातल्या साडेतीन महत्वाच्या शक्तीपीठांपैकी हे एक आहे. सकाळी सकाळी अगदी प्रसन्न वातावरणात दर्शन झाले. 







आम्ही बाहेर आलो. कोल्हापूरच्या मिसळ पावचे बरेच कौतुक ऐकलेले होते. कुठली मिसळ चांगली अशी चौकशी करत आम्ही एका मिसळ पावच्या गाडीवर पोचलो. ती गाडी पाहुन तिथली मिसळ कोल्हापूरच्या प्रसिद्ध मिसळीपैकी असेल असं वाटत नव्हतं. 

छायाचित्राचा स्त्रोत
पण आम्हाला भूक लागलेली होती, आणि त्या माणसाकडे आम्हीच पहिले गिऱ्हाईक होतो. मिसळ अगदी गरमागरम दिसत होती. आम्ही तिथेच खायचं ठरवलं. तिथे अमिताभ बच्चनचा मिसळ खातानाचा फोटोसुद्धा लावलेला होता. एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे मिसळ पाव सांगितला तरी त्या माणसाकडे पाव नसून ब्रेड ठेवलेला होता. ब्रेडच्या अगदी ताज्या आणि नरम लाद्या होत्या. आणि तो आम्हाला त्यातून ब्रेडचे तुकडे कापून देत होता. 

ती मिसळ अप्रतिम होती. आम्हाला सर्वांना मनापासून आवडली. अगदी भारी दुकान नसलं तरी चव तर लय भारी होती. आणि तो माणूससुद्धा एकदम पद्धतशीर शांतपणे त्याचं काम करत होता. त्या गाडीवरची स्वच्छता खरंच चांगली होती. 

चांगली चव आणि स्वच्छता पुरवायला फार काही लागत नाही हेच त्याने दाखवून दिले. ज्याने कोणी आम्हाला त्या गाडीवर पाठवले त्याला धन्यवाद. त्या भागात तरी ती चांगलीच प्रसिद्ध असावी. आम्ही कोल्हापूरला असेपर्यंत आम्ही दुसरी मिसळ शोधायच्या भानगडीत पडलो नाही. हीच मिसळ छान होती, आणि आम्हाला अगदी सोयीस्कर होती. 

भरपेट न्याहरी करून आम्ही कोल्हापूर दर्शनाला निघालो.

Monday, May 11, 2015

कोकण सफर : १ : तयारी आणि सुरुवात

माझ्या मित्रांसोबतची माझी सर्वात मोठी आणि अविस्मरणीय ट्रीप म्हणजे आमची कोकणातली सफ़र. ट्रीप सर्वात मोठी असली तरी ग्रुप सर्वात छोटा. मी, मयुर आणि अक्षय आम्ही तिघेच.

कॉलेज मध्ये असताना आम्ही गेलेल्या या ट्रीपची आठवण काही वर्षे होऊन गेली तरी ताजी आहे. म्हणुन याबद्दल लिहायची खूप दिवसांपासून इच्छा होती. शेवटी आता लिहायला घेतलंय.

मी आणि माझ्या जवळपास सर्वच मित्रांना फिरण्याची खूप आवड आहे. असाच माझा एक शाळेपासूनचा मित्र चेतन. आम्ही १२वि मध्ये असताना एसटीचा काही दिवसांचा पास काढून स्वस्तात मस्त फिरायचा आम्ही विचार केला होता.

पण दुर्दैव असं कि त्याने आणि मी सोबत बनवलेल्या प्लानमध्ये बऱ्याचदा त्याला स्वतःला कधी येता आलं नाही. बारावीनंतर तो पुण्याच्या कॉलेजला गेला आणि मी आमच्याच शहरात म्हणजे औरंगाबादला. मग आमच्या परीक्षा आणि सुट्या नेहमी पुढे मागे व्हायच्या आणि त्याची काहीतरी गडबड व्हायची. आम्ही कॉलेजमधून बाहेर पडून नोकरीला लागल्यावर कुठे त्याला आमच्यासोबत फिरता यायला लागलं आणि त्याचं एक छोटंसं दुःख संपलं. थोडक्यात या ट्रीपमध्ये यायची इच्छा असून त्याला येता आलं नाही.

मयुरसुद्धा माझा शाळेचा मित्र. ११वि आणि १२ वि वेगळी झाल्यावर एमआयटीमध्ये आम्ही इन्जीनियरिंगला पुन्हा सोबत आलो. आणि अक्षय माझा फर्स्ट ईअरमधेच झालेला मित्र. काही दिवसातच आमचं मस्त जमलं. आमची बस-पासवाली कल्पना मी या दोघांसमोर मांडली. दोघांनाही हि ती आवडली आणि आमची योजना बनायला सुरुवात झाली. 



सर्वात आधी आम्ही आमच्या घरच्यांची परवानगी घेतली. आम्ही तिघे तेव्हा १६-१७ वर्षांचेच असू. त्यामुळे इतके दिवस बाहेर फिरण्याआधी संमती मिळवणं आवश्यकच होतं. आमच्या सर्वांच्याच आई-बाबांनासुद्धा अशी आवड असल्यामुळे आम्हाला अगदी सहज परवानगी मिळाली.

अशी परवानगी असली तरी आम्हाला काही अगदी उधळपट्टी करत फिरायचं नव्हतं. आपल्या फिरण्याचा खर्च मर्यादेबाहेर जाता कामा नये हे आमचं ठरलेलं होतं. त्यामुळे हि कल्पनाच मुळी एसटीचा पास काढून अगदी कमी खर्चात फिरायचं इथून सुरु झाली होती.

आम्ही एसटीचा १० दिवसांचा पास काढून फिरायचं ठरवलं. आणि १० दिवस फिरण्याजोगी, प्रेक्षणीय स्थळे अगदी जवळजवळ असणारी महाराष्ट्रातली जागा म्हणजे कोकण. कोकणात अशी ठिकाणे अगदी कमी अंतरावर आहेत. बाकी भागातसुद्धा प्रेक्षणीय स्थळे असली तरी अंतरे बरीच जास्त असल्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यातच बराच वेळ गेला असता. त्यामुळे कोकणात जायचं आम्ही पक्कं केलं.

कम्प्युटर आणि इंटरनेटमुळे काळ खरोखर इतक्या झपाट्याने बदललाय, कि अगदी काही वर्षापूर्वी "त्या काळी" अशा भाषेत मला सांगावं लागतंय. तर "त्या काळी" गुगल मॅप्स इतके प्रचलित नव्हते. घरी असलेल्या इंटरनेटचा वेगसुद्धा विशेष नव्हता.

आमच्या सहलीची आखणी आम्ही सिग्नलवर मिळतात तश्या एका महाराष्ट्रावरच्या पुस्तकातून केली. त्यात प्रत्येक जिल्ह्याबद्दल माहिती, तिथली ठिकाणे, मंदिरे, जिल्ह्याचा नकाशा, आणि शेवटी महाराष्ट्राचा एक मोठा नकाशा होता. ह्यातूनच आम्ही ठिकाणे निवडली आणि हे पुस्तक सोबत घेऊनच प्रवास केला.

काही दिवशी आम्ही एकाच दिवशी दोन तीन छोट्या गावात फिरणार होतो. मग अशावेळेस सामान घेऊनच फिरायचं तर पाठीवर घेऊन जाता येणारी आणि तरी १० दिवसाचे सामान मावेल अशी मोठी बॅग हवी होती. टीव्हीवर (डिस्कव्हरी) ट्रेकिंगला जाणारे किंवा मोठ्या प्रवासाला जाणारे लोक जशी बॅग घेऊन फिरताना दाखवतात तशी बॅग मी खास या सफरीसाठी घेतली. तिचा मला खूप छान उपयोग झाला. बरंच काही कोंबता येतं या बॅगमध्ये. ती अजूनही माझ्याकडे आहे.

उत्तर कोकण काही अंशी आम्ही घरच्यांसोबत किंवा शाळेच्या सहलीत पाहिलेला होता. म्हणून आम्ही दक्षिण कोकणावर जास्त भर दिला.

पासमुळे प्रवास खर्च तर कमी झालेलाच होता. आम्ही बाकी खर्चसुद्धा कमीत कमी करायचा ठरवला होता. जमेल तिथे रात्री प्रवास ठरवला, म्हणजे त्या रात्री राहायचा खर्च नाही. काही ठिकाणी सकाळी एसटी स्थानकावरच प्रातःविधी उरकले.

औरंगाबादपासून कोकण तसं बरंच लांब आहे. एकाच दमात खूप प्रवास न करता आम्ही टप्प्याटप्प्याने मार्गातली ठिकाणे बघत जायचा विचार केला. त्यामुळे दक्षिण कोकणात आम्ही कोल्हापूरमार्गे जायचं ठरवलं. तळकोकणात जाऊन मग एक एक ठिकाण बघत वर सरकायचा आमचा बेत होता.

औरंगाबादहून रात्री कोल्हापूरला जाणारी गाडी आम्हाला मिळाली नाही. म्हणून आम्ही पुण्याची गाडी पकडली. आमचे आईबाबा आम्हाला सोडायला आले होते. रात्री १० ची गाडी पकडली आणि आमचा पास पुढच्या तारखेला म्हणजे १२ वाजता सुरु होणार होता, म्हणून आम्हाला १०-१२ असं अंदाजे अर्ध्या अंतराचं तिकीट काढावं लागलं.

आमच्या या अविस्मरणीय सहलीचा प्रवास अशाप्रकारे सुरु झाला.