Saturday, February 28, 2026

राजस्थानची रोजनिशी : ५ : चित्तोडगड, उदयपूर सिटी पॅलेस

काल संध्याकाळी आम्ही जयपूरहून चित्तोडगडला ट्रेन ने आलो होतो. रात्री इथेच मुक्काम केला आणि आज चित्तोडगढ दर्शन करायचे होते. त्यानंतर इथूनच उदयपूरला जाऊन तिथे उरलेला दिवस जमेल ते पहायचे आणि पुढचे दोन दिवस उदयपूर मध्येच राहायचे होते. 


उदयपूरमध्ये उदयपूर शहरासोबतच थोडे बाहेर असलेले जवळपासची काही ठिकाणं आम्हाला बघायची होती. लांब लांब फिरायचे असल्यामुळे कॅब सोयीची पडेल असा विचार करून आम्ही चितोडगडहूनच तीन दिवस कॅब ठरवली.


मराठी पर्यटक


चित्तोडगडमध्ये रात्री आम्ही जिथे जेवण केले तिथल्या मालकाने मी मराठी आहे हे ओळखले, आणि पुण्याचे का म्हणुन जुजबी गप्पा मारल्या. त्यांचे काही नातलग पुण्यात राहतात म्हणाले. असेच माझ्या बायकोसोबत ती जयपूरमध्ये खरेदी करत असताना झाले. तिथल्या दुकानदाराने सुद्धा ते पुण्याहुन आलेत का अशी चौकशी केली. त्या लोकांना मुंबईची हिंदी आणि पुण्याची हिंदी वेगळी ओळखु येते म्हणे. खरं तर आम्ही पुण्याचे नाही, छ. संभाजीनगरचे. तरी मराठी तर सोडाच आमच्या हिंदीवरही पुण्याचा प्रभाव पडलाय हे कळल्यावर गंमत वाटली.  


आपल्या मराठी मंडळींमध्ये पर्यटनाची खरंच फार आवड आहे. याआधी काही महिने आम्ही उत्तराखंडला गेलो होतो तिथेही मराठी मंडळी प्रत्येक ठिकाणी आसपास असायची. इथे जयपूरला तर रोज केसरी, वीणा वर्ल्ड वगैरे सोबत मोठमोठे मराठी समुह दिसायचे. मला फार माहिती नाही, पण इतर राज्यात अशा मोठ्या प्रवास कंपन्या आहेत का कोणास ठाऊक. तिकडे ग्रुप टूर तेवढ्या प्रचलित नसाव्यात असं वाटतं. एवढे मोठे ग्रुप मराठीच दिसतात. मी एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या ट्रेकला गेलो होतो. तेव्हा तिथला नेपाळी गाईडसुद्धा म्हणाला होता कि आमच्याकडे भारतातले जे लोक येतात त्यापैकी मोठ्या संख्येने लोक महाराष्ट्रातलेच असतात.


इतर समूह म्हटलं तर गुजराती लोक असतात, त्यांच्यात कौटुंबिक एकोपा फार छान दिसतो. त्यांचे मोठे समुह त्यांच्याच कुटुंबीय आणि गोतावळ्याचे पाहण्यात आलेत. दाक्षिणात्य कुटुंबेसुद्धा दिसतात, पण संख्येने थोडे लहान. बाकी सुटीच्या दिवसात त्या त्या राज्यातले स्थानिक लोकही असतात. उत्तराखंडची काही शहरे, जयपुर वगैरे दिल्लीहुन फार पटकन पोहोचण्यासारखी असल्यामुळे तिथे दिल्लीतुन आलेले सुद्धा बरेच लोक असतात.


आमचा चित्तोडगडचा गाइड तर म्हणाला, ये आप लोग का सीजन चल रहा है अभी. हमे सालभर का अंदाजा होता है, मराठी लोग कब आएंगे, बंगाली कब आएंगे. आप लोग गर्मीयोमे या दिवाली के बाद आते हो, वो लोग दुर्गापूजा के बाद आते है. कदाचित असं सुद्धा असेल, मुलांच्या सुट्ट्या बघुन आम्ही प्रवास करतो तेव्हा तीच मराठी लोकांची सोयीस्कर वेळ असल्यामुळे तेव्हा मराठी लोक जास्त दिसत असतील. असो.


चित्तोडगड


चित्तोडगढ हा फक्त किल्ला नाही. एकाच वेळी तो भारताच्या इतिहासातला मानबिंदू आहे आणि त्याचवेळी आपल्या हृदयातली भळभळती जखमसुद्धा. याचे मुळ नाव "चित्रकूट दुर्ग" होते. हा किल्ला प्रचंड विस्तीर्ण आहे. हि अनेक पिढ्या मेवाड घराण्याच्या राजवंशाची राजधानी होती. इथे तब्बल २७ वेळा हल्ले झाले. त्यापैकी २४ वेळा ते परतवुन लावण्यात इथल्या लोकांना यश आले.



ज्या ३ वेळा त्यांना अपयश आले, त्यावेळेस इथल्या महिलांनी मोठ्या संख्येने "जौहर" केला. सावरकरांनी हा शब्द "जय हर" चा अपभ्रंश असावा असा अंदाज केला होता. मध्यपूर्वेतून आलेल्या इस्लामी आक्रमकांची बर्बरता, त्यांचे पराभूतांप्रतीचे क्रौर्य याच्या बऱ्याच कथा आहेत. आपल्या सैन्याचा पराभव अटळ दिसत असेल तर त्यानंतर आपल्या सन्मानास ठेच पोहोचु नये म्हणुन स्त्रिया चितेमध्ये स्वतःहुन उडी घेऊन आत्मबलिदान करत असत. त्यानंतर उरले सुरले योद्धे जीवावर उदार होऊन, मरणाची खात्री असूनही बलवत्तर शत्रुवर चालुन जात असत. केवळ आपल्या गेलेल्या स्वकीयांच्या सन्मानाप्रती आदरांजली म्हणुन. याला "साका" म्हणतात.



मी लहानपणी चौथी पाचवीत असताना आई बाबांसोबत इथे येऊन गेलो होतो. तेव्हाही आम्ही गाइड केला होता आणि इथली माहिती ऐकली होती.
तशी माझी स्मृती चांगलीच आहे, पण इथल्या गोष्टीने मनावर फार परिणाम केला होता.


इथे एक मोठा विजयस्तंभ आहे. राणा कुंभ यांच्या एका युद्धातल्या विजयाच्या स्मृतीसाठी बांधलेला विजयस्तंभ आहे. अतिशय सुंदर, पाहणाऱ्याच्या मनावर लगेच प्रभाव टाकणारा हा स्तंभ आहे.



तिथुन थोडंसंच पुढे गेलं कि लगेच मोडतोड केलेली शिल्पं, काही भग्न अवशेषसुद्धा दिसतात. हा असा विरोधाभास आहे. विजय आणि पराभव दोन्हीच्या खुणा अगदी आजूबाजूला. मी वेरूळला खुपदा गेलेलो आहे. असे भग्न अवशेष पाहुन मला नेहमीच वाईट वाटतं.















लहानपणीच्या इथे दिलेल्या भेटीमुळे राणी पद्मिनीची गोष्ट मला संजय भन्साळीचा चित्रपट येण्याच्या आधीपासुन माहित होती आणि ती पाहुन आश्चर्यही वाटलं नव्हतं. काही "पुरोगामी" मंडळींनी त्यावर विनाकारण टीका केली होती, स्त्रियांना फक्त वस्तु आणि सन्मानाची ट्रॉफी असल्यासारखं दाखवलं आहे असा आक्षेप नोंदवला होता. आपण आजच्या काळातले मापदंड काही शतके आधीच्या काळावर लावणे मला चुकीचे वाटते. आपल्या समाजात भले तेव्हा आणि आज सुधारणेस भरपुर वाव असेल, स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा असेल. पण स्त्रियांना आक्रमकांकडे जी वागणुक मिळत असे तिचा विचार करता, तेव्हाच्या मानी स्त्रियांना मरण श्रेयस्कर वाटलं असेल तर ते समजु शकतं. राणी पद्मिनीची गोष्ट आज सांगितली जाते तशीच घडली असेल का यावर वादविवाद आहेत, पण असे जौहर वेगवेगळ्या काळात झाले होते हे मात्र खरे.




इथे बाजूलाच समाधीश्वर नावाचे महादेवाचे मंदिर आहे. इथला महादेव थोडा वेगळा आहे. तीन मुखे असलेल्या दुर्मिळ रूपात पाहायला मिळतो. तिन्ही मुखांवर वेगळे हावभाव आहे. त्याची गोष्ट गाइडने सांगितली, पण नीटशी लक्षात राहिली नाही. जवळच एक गोमुख कुंड आहे, ज्यातुन सतत जलप्रवाह सुरु असतो, ते आम्ही लहानपणी बघितले होते. ते यावेळी पूर्ण पाण्यात बुडाले होते.





चित्तोडगड हे संत मीराबाईंचे सुद्धा सासरचे घर होते. त्या मेवाड च्या राजवंशातल्या पुत्रवधु होत्या. लग्न झाले असले तरी त्या कृष्णभक्तीत इतक्या लीन होत्या कि त्यांचे नवऱ्याकडे, संसाराकडे हवे तितके लक्ष नव्हते म्हणुन त्यांच्या सासरकडच्या मंडळींनी त्यांचा छळ केला, मारायचे प्रयत्न केले, पण कृष्णाने नेहमी त्यांना वाचवले असे सांगितले जाते. शेवटी त्या द्वारकेत गेल्या आणि तिकडेच कृष्णाच्या मूर्तीत विलीन झाल्या अशी एक कथा आहे. या चमत्कारी कथासुद्धा किती खऱ्या किती खोट्या यावर चर्चा होते. मीराबाईंचे सासरे राणा संगा (संग्रामसिंह) यांनी त्यांच्या विनंतीवरून बांधलेले श्याम मंदिर आजही येथे आपल्याला दिसते. येथे संत मीराबाई कृष्णाची आराधना करत असत असे सांगितले जाते. समोर त्यांच्या गुरु संत रविदासांच्या पदचिन्हांवर बांधलेली छत्रीसुद्धा आहे. आपल्याकडे इतिहास व्यवस्थित लिहुन ठेवण्याची पद्धत उशिरा आल्यामुळे त्यात अनेक वेगवेगळ्या कथा दंतकथांची भर पडते. 


अशीच एक दंतकथा अल्लाउद्दीन खिलजीने राणी पद्मावतीला बघण्याचा हट्ट धरल्यामुळे राणीला एका शीश महालामध्ये आणुन तिचे फक्त प्रतिबिंब क्षणभर दाखवुन तिला परत पाठवले गेले अशी आहे. आम्ही लहानपणी आलो होतो तेव्हाच्या गाइडने हि कथा सांगितली होती आणि ती जागाही दाखवली होती.  तेव्हा उन्हाळा होता आणि फार शुष्क वातावरण होते, मला घरी जाईपर्यंत उष्णतेचा प्रचंड त्रास झाला होता. तेव्हा किल्ला आणि परिसर अगदी कोरडा ठाक होता. यावेळी मात्र चांगला पाऊस पडून गेला होता आणि ती दाखवलेली जागा आज तळ्यात पाण्याने वेढलेली होती. पद्मावत चित्रपटाच्या वेळी झालेल्या वादंगापासुन या कथेवर बराच खल झाला आणि आता असं काही घडलं नाही असं सांगतात. तो गाइड म्हणाला वो तो हमारे बापजादे गाइड लोगोंकी गलती थी. उन्होंने टुरिस्ट लोगोंको बताने के लिये बढा चढा के कोई कहानी बना दी और वही फैल गयी. 


या गाइडला इथल्या इतिहासाचा फार अभिमान होता, आणि तेवढाच जयपूरच्या राजांवर राग होता. त्यांनी मुघलांशी हात मिळवला, मेवाडचे राजा महाराणा प्रतापांवर हल्ला केला, या आणि अशा अनेक बारीक सारीक गोष्टी त्याने सांगितल्या. तेवढं वगळता अतिशय अदबीने आओ सां, पधारो सां अशा पद्धतीने बोलत होता. इथे बरेच लोक अशाच अदबीने बोलतात, ते पाहुन आमच्या मुलांना गंमत वाटली होती. तीही अधुन मधुन खाओ सां, पिओ सां अशी बोलत होती. 


चित्तोडगडला जैन समाजाची अनेक तीर्थस्थळे आहेत. शहरात धर्मशाळा आहेत. अनेक शतकांपासुन इथे जैन मुनी, जैन व्यापारी यांचा वावर आहे. जैन व्यापारी आणि मेवाडच्या राजांमध्ये चांगले संबंध होते. भामाशाह नावाच्या व्यापाऱ्याने महाराणा प्रतापांना  बरीच मदत केली होती. त्यापैकी काही आम्ही बाहेरून बघितली. 


सावलिया सेठ


चित्तोडगडहुन आम्ही कॅबने उदयपुरकडे निघालो. वाटेत एक सावलिया सेठ नावाचे मंडफिया गावात एक प्रसिद्ध कृष्ण मंदिर आहे तिथे जायचे होते. इथल्या कृष्णाचे वैशिष्ट्य असे कि हा व्यापारी वर्गात या मंदिराविषयी विशेष श्रद्धा आहे. त्याला व्यापारात भागीदार म्हणुन ठेवले तर आपली भरभराट होते अशी मान्यता आहे. अनेक व्यवसायांमध्ये कृष्ण याप्रकारे मानलेला भागीदार आहे. त्याच्या वाट्याची म्हणुन काही रक्कम देवधर्मासाठी बाजूला ठेवली जाते. त्यामुळे याला "सेठोका सेठ" असेही म्हणतात. 


पण आम्ही तिथे येईपर्यंत तिथे पट बंद होण्याची वेळ झाली होती. मी पहिल्या भागात या बद्दल सांगितले आहे. इथल्या मंदिरांमध्ये आरती, भोजन, विश्राम अशा वेगवेगळ्या निमित्ताने पट म्हणजे देवासमोर पडदे लावुन दर्शन बंद करतात. त्याची वेळ गाठणे आव्हानात्मक असते. आमची वेळ चुकली. आज कॅब दिवसभर आमच्या ताब्यात होती, चित्तोडगड आणि उदयपूर मिळुन आमचे दिवसाला ३०० किमान किमी ठरलेले असतात तेही होणार नव्हते. त्यामुळे पहाटे लवकर इथे येऊन परत चित्तोडगड किल्ला बघायला गेलो असतो तरी चालले असते. पण हि झाली पश्चातबुद्धी. आम्ही कृष्णाला बाहेरूनच नमस्कार करून पुढे निघालो. पुन्हा जोराचा पाऊस झाला. वाटेत जेवण करून आम्ही उदयपूरला पोहोचलो. 


उदयपूर सिटी पॅलेस


उदयपूरलाही कमी अधिक जोराने पाऊस होताच. आता कुठली आऊटडोअर ठिकाणे पाहण्यात अर्थ नव्हता. आम्ही सिटी पॅलेसला गेलो. उदयपूरचा सिटी पॅलेस अतिशय भव्य आहे. इथे तिकिटे, पार्किंग फीस, तिथल्या तिथे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मॉल मध्ये असतात तशा गाड्या आहेत. सगळ्याच गोष्टी अतिशय महाग आहेत. पार्किंग ५०० रुपये, ती गाडी एका दिशेने जाण्यासाठी १०० रुपये, परत येताना वेगळे पैसे. इतकी भरगच्च गर्दी असुन एवढी लुट कशासाठी असा प्रश्न पडला. 



महाराणा प्रतापांचे वडील उदयसिंग यांनी चित्तोडगडावर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे स्वकीयांच्या सल्ल्यावरून हे शहर वसवले आणि राजधानी बनवली. त्यामुळे याचे नाव उदयपुर. नंतरच्या अनेक पिढ्यांनी महालाच्या रचनेत भर घालत घालत आज या स्थितीत आणलेला आहे. महाराणा प्रतापांना मात्र या शहरात फारसे वास्तव्य करता आले नाही. त्यांचे बरेचसे आयुष्य जंगल आणि अरावली पर्वतात गनिमी काव्याने लढण्यात गेले. 


इथे राजांची वंशावळ, त्यांच्या वापरातली हत्यारे, माणिक मोती अशा बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. 






महालात फिरताना आपण कुठून कुठे जात आहोत हे आपल्याला समजत नाही. एका खोलीतुन दुसऱ्या खोलीत जाण्याचे रस्ते, जिने सगळे अगदी अरुंद आणि चिंचोळे बांधले आहेत. महाल एवढा मोठा असताना इथे जागा कमी का याचे उत्तर म्हणजे कोणी महालात हल्ला करायला आले तर त्यांना एक एक करून यायला आणि मोठे हत्यार न उगारता यायला भाग पडावे यासाठी. 













राजस्थानी चित्रांमध्ये गोष्ट सांगण्याची एक शैली आहे. कॉमिक बुक मध्ये जसं प्रत्येक प्रतिमेत वेगळा प्रसंग किंवा प्रसंगांची मालिका असते तसं इथे नसतं. एखादी घटना आणि त्यातले क्रमानुसार घडलेले वेगवेगळे क्षण इथे एकाच चित्र प्रतिमेत दाखवलेले असतात. त्यामुळे ती घटना माहित नसेल तर थोडं समजायला अवघड जाऊ शकतं. नमुना म्हणुन मी एका चित्राचा फोटो काढला आहे, यात राजा एका वृक्षावर बसलेला आहे आणि अस्वलाची शिकार करतानाचा प्रसंग आहे. यात अस्वल आडोशातुन बाहेर निघाले, झाडाजवळ आले अन मग शिकारीनंतर मरून पडले अशा अस्वलाच्या हालचाली आहेत, पण प्रथमदर्शनी पाहताना वाटेल जंगलातील अनेक अस्वले दाखवली आहेत. तसे नसुन हा आत्ता सांगितलेला घटनाक्रम आहे. 



उदयपूरला सिटी ऑफ लेक्स म्हणजे तलावांचे शहर म्हटले जाते. हे तलाव मानव निर्मित आहेत. राजस्थान म्हणजे वाळवंट अशी प्रतिभा घेऊन समजा कोणी राजस्थानात पहिल्यांदा उदयपूरला आले तर त्यांना आश्चर्याचा धक्का बसेल. या तलावातही जलमहाल, जगत मंदिर पॅलेस असे महाल बांधले आहेत. तिथे अत्यंत महागडे हॉटेल आणि रेस्टॉरंट आहे. या सगळ्याचे दृश्य सिटी पॅलेस मधुन छान दिसते. 









राजस्थानी सांस्कृतिक कार्यक्रम





पॅलेस पाहिल्यावर आम्ही पॅलेससमोरच्याच गल्ल्लीत "विरासत" नावाचा एक अतिशय सुंदर राजस्थानी सांस्कृतिक कार्यक्रम पाहिला. पपेट शो तर आधी सांगितल्याप्रमाणे ठिकठिकाणी होते आणि चोखी धानीमध्ये लोककलांचे सादरीकरणही पाहिले होते. पण त्या सर्वांचा दर्जा आणि इथल्या दर्जामध्ये जमीन अस्मानाचा फरक होता. इथे सर्व उच्च प्रतीचे व्यावसायिक कलावंत, छान बसवलेले संगीत आणि नृत्य सादरीकरण पाहायला मिळाले. इथुन जवळच गणगौर घाटावर गेल्या अनेक वर्षांपासुन असा कार्यक्रम प्रसिद्ध आहे, तिथल्याच काही कलावंतांनी आपला वेगळा चमु घेऊन इथे सादरीकरण सुरु केले आहे. 













याच गल्लीच्या तोंडाशी जगदीश्वर नावाचे उंचावर बांधलेले मंदिर आहे. तिथे छान दर्शन झाले. थोडे राजस्थानी बोलीभाषेतले भजन ऐकायला मिळाले. 












आमचे हॉटेल बंजारा हेरिटेज इथुन जवळच होते. ऑनलाईन बुकिंग करताना आपल्याला काही गोष्टींचा अंदाज येत नाही. आमचे हॉटेल छान होते, जागा छान होती. पण इथल्या अत्यंत गजबजलेल्या भागात. सिटी पॅलेस जवळ रस्ते फार छोटे आहेत, चढ उताराचे आहेत आणि अनेक ठिकाणी वन वे आहे. पॅलेस नंतर वर सांगितलेली दोन ठिकाणे आम्ही पायीच फिरलो. कॅब वाला पॅलेसच्या पार्किंगमध्ये थांबलेला होता. त्याला नेमके आमच्या हॉटेलच्या गल्लीमध्ये गाडी आणता येणार नव्हती. 


सिटी पॅलेसच्या गल्लीमध्ये एक सशुल्क पार्किंग होती, मी त्याला तिथे बोलावुन घेतले. कुटुंबाला हॉटेलमध्ये चेक-इन करून रुममध्ये सोडले. कॅबवाला सशुल्क पार्किंगमध्ये पोहोचल्यावर तिथुन सामान एका रिक्षात टाकले आणि मग हॉटेलमध्ये आणले. 


त्याच हॉटेलमध्ये टेरेस रेस्टॉरंट होते. इथल्या गल्ल्यांमध्ये अशा अनेक छोट्या पण उंच बिल्डिंग आहेत आणि त्यावर रूफ टॉप रेस्टॉरंट आहेत. त्यांना लेकचा छान व्ह्यू आहे. त्यादिवशी पावसामुळे ढगाळ वातावरणामुळे नीट दिसत नव्हते. पण इतर दिवशी दिसत असेल. तिथे संध्याकाळची हवा, योग्य आवाजात संगीत आणि एकंदर वाईब मस्त होती. जेवणही छान होते. इथे यायचा कुटाणा होत असला तरी इथली सेवा, जेवण, एकूण मुक्काम आम्हाला आवडला. 



प्रसन्न वातावरणात आणखी एक दिवस संपला. 


क्रमशः।