काल फ्रेंडशिप डे साजरा झाला. सगळीकडून शुभेच्छा आणि मैत्रीविषयी मेसेजेसचा पाऊस पडला. माझ्याही मनात काही विचार घोळत होते. म्हटलं वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावा आणि लिहावं थोडं.
मैत्रीची बऱ्याच जणांनी व्याख्या केली आहे. ती प्रसंगानुरूप बदलत जाते. मला वाटतं बऱ्याचदा आपण मैत्रीचा अर्थ फार संकुचित असा लावतो. कुटुंबाबाहेर, नातेवाईकांच्या व्यतिरिक्त जे आपले चांगले संबंधित लोक असतात त्यांनाच आपण मित्रांमध्ये पकडतो.
पण तसं नसतं. मैत्री हि प्रत्येक नात्यात असू शकते, पण प्रत्येक नातं हे मैत्रीचं नसतं. विचित्र वाटतं ना?
मैत्री म्हणजे दोन व्यक्तींनी एकमेकांशी केलेली शेअरिंग. ह्याला सुयोग्य मराठी शब्द सुचत नाहीये. एकमेकांच्या आयुष्यात सहभागी करून घेऊन साथ देणं म्हणजे मैत्री. आणि अशी मैत्री कोणासोबतही होऊ शकते.
नात्याला नाव आई बाबांचं असू शकतं. पण शेअरिंग असेल, एकमेकांशी चर्चा करून समोरच्याच्या मताला किंमत देण्याची पद्धत असेल, तर ती त्या नात्यातली मैत्रीच आहे. हे नसलं तरी त्यात नातं तर असेलच पण मैत्री नसेल. बऱ्याच मुलांना बाबांचा फक्त धाक, भीतीयुक्त आदर असतो, त्यामुळे त्यांच्यात काहीच शेअरिंग नसतं. आणि हे असलं तर ते आईबाबा मित्रसुद्धा असतात.
आपले नातेवाईक खूप असतात, त्यात नातं सगळ्यांशीच असतं. तरीसुद्धा काही जवळची नाती लांबची वाटतात, काही दूरची जवळ वाटतात. कारण असतं त्यातली शेअरिंग आणि मैत्री.
आपल्या शाळेत कॉलेजात किमान साठ-सत्तरजण एका वर्गात असतात, पण मित्रांमध्ये गणना होते ती त्यातल्या काही मोजक्यांचीच. सगळ्यांशी सुरुवातीला संबंध सारख्याच पद्धतीने येतो, पण वाढत जाणाऱ्या शेअरिंगमुळे क्लासमेट ते मित्र हा प्रवास होतो.
हेच कॉलनी, ऑफिस, बस, लोकल अशा कुठल्याही ठिकाणी होतं. प्रत्येक ठिकाणी सहज मित्र जोडणारे मी काही लोक पाहिलेत. त्यांचा हेवा वाटतो आणि त्यांच्याकडून शिकावं वाटतं.
हे खूप महत्वाचं आहे. कारण माणूस अनाथ म्हणून वाढू शकतो, कुटुंबाला पारखा होऊ शकतो. पण तरी मित्र जोडून “आपली माणसं” मिळवू शकतो. म्हणूनच मित्रांना मित्र परिवार असंही म्हणतात.
नागरिकशास्त्रात शिकलोय आपण, माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. आपल्याला माणसांची गरज असते. आपण काहीही यश मिळवू, पण त्याचा आनंद साजरा करायला, किंवा दुःखात आधारासाठी माणसंच लागतात.
आपली गरज एवढाच हा स्वार्थी विचार नाही. तुमची किती आपली माणसं आहेत यासोबतच तुम्ही किती जणांचा आपला माणूस आहात हेही महत्वाचं आहे.
कुटुंब आणि नातेवाईक जन्मतानाच ठरतात. ती नाती त्यात मैत्री असो व नसो आयुष्यभर राहणार असतात आणि त्याला पर्याय नसतो. पण मैत्री (कुठल्याही नात्यात) हि मर्जीने, दोन व्यक्तींच्या सहभागाने केली जाते, म्हणून खास असते. करा विचार तुमच्या आयुष्यात किती नाती आहेत, आणि किती नात्यात मैत्री आहे? सुदैवाने मला माझ्या कुटुंबातसुद्धा खूप मित्र आहेत, आणि कुटुंबाबाहेरसुद्धा. संबंध कसाही येवो, नातं कुठल्याही नावाचं असो, संपर्क आणि शेअरिंग यानेच मैत्री होते आणि टिकते.
प्रत्येक नात्यातली मैत्री जपा, आणि मैत्रीचं प्रत्येक नातं जपा.
No comments:
Post a Comment