जयपुरमध्ये ऐतिहासिक स्थळे तर बरीच आहेत, पण जी गेल्या काही वर्षात बांधली गेली आणि अल्पावधीत लोकप्रिय झाली अशीसुद्धा काही ठिकाणे आहेत.. पत्रिका गेट, तोरण गेट, वर्ल्ड ट्रेड पार्क, मसाला चौक इ.
यापैकी वर्ल्ड ट्रेड पार्क तर आपल्याकडच्या कुठल्याही आयटी पार्क सारखं ग्लास फसाड असलेलं मोठं आर्थिक केंद्र आहे. तिथेच मॉल आणि फूडकोर्ट अशाही गोष्टी आहेत. अशा गोष्टी नसलेल्या भागातुन, किंवा निमशहरी आणि ग्रामीण भागातुन आलेल्या पर्यटकांसाठी तेसुद्धा एक जरूर जाऊन यावं असं आकर्षण असेल. आम्हाला फारसं नावीन्य न वाटल्यामुळे आम्ही ते टाळलं.
पत्रिका गेट
आजच्या दिवसाची सुरुवात आम्ही पत्रिका गेट पासुन केली. जयपुरच्या विमानतळापासुन अगदी जवळ एक जवाहर सर्कल आहे. जयपुर शहरात प्रवेश करताना एक पांढऱ्या शुभ्र रंगाचं द्वार आपलं स्वागत करतं. त्याचं नाव आहे तोरण द्वार. राजस्थानमध्ये अतिथी, विशेषतः बाहेरगावाहून आलेले जावई आधी दारावरील तोरणाला स्पर्श करून मग आत येतील अशी परंपरा होती. त्या परंपरेची आठवण ठेवत, विमानतळावर उतरलेले प्रवासी जयपूरला येताना या तोरणाला पार करून शहरात येतील, त्यांचं स्वागत हे द्वार करेल अशी ही कल्पना होती.
या द्वाराच्या मागच्या बाजूला एक गोलाकार आकाराची बाग आहे. ती बाग ओलांडुन दुसऱ्या बाजूला आहे पत्रिका गेट. हवामहल, सिटी पॅलेस अशा जयपूरच्या प्रसिद्ध वास्तूंची झलक दाखवणारं, तशाच लालसर पाषाणातुन बनवलेलं, आणि पारंपरिक राजस्थानी पद्धतीने रंगवलेलं, अतिशय सुंदर नक्षीकाम असलेलं हे द्वार, राजस्थानच्या संस्कृतीचं आणि कलेच्या वारशाचे प्रतीक आहे. राजस्थान पत्रिका नावाचं इथे एक प्रमुख वर्तमानपत्र आहे. त्यांचा माध्यम समुह आहे. त्यांनी ह्याचा खर्च प्रायोजित केल्यामुळे याचे नाव पत्रिका गेट ठेवले गेले.
हे दोन्ही द्वार गेल्या काही वर्षात बांधले गेले आणि फार लोकप्रिय झाले. इथे फोटो सुंदर येतात त्यामुळे "इंस्टाग्रामेबल" जागा म्हणुन इथे तरुणाईची वर्दळ असते. प्री वेडिंग शूटवाल्यांची गर्दी असते. शहरातून येताना आधी पत्रिका गेट लागतं. आम्ही पोचलो त्यादिवशी ऊन नव्हतं, थोडंसं ढगाळ आणि प्रसन्न वातावरण होतं. आम्हीही आमची फोटोची हौस भागवुन घेतली. तिथेच मुलांसाठी घोडे घेऊन फिरणारे लोक होते. त्यावर मुलांची घोड्यावरून चक्कर मारण्याची हौस फिटली.
तिथे निवांत वेळ घालवुन रमत गमत बागेतुन फिरत फिरत आम्ही दुसऱ्या बाजुला तोरण गेटला पोहोचलो. इथे पत्रिका गेटपेक्षा थोडी कमी जागा आहे. तेवढ्या जागेत प्री वेडिंग वाल्यांचं बरंच काही चालु होतं. इथुन आम्ही पटकन निघालो आणि मसाला चौकात गेलो.
मसाला चौक म्हणजे इथली एक खाऊ गल्ली आहे. सरकारने जागा घेऊन छान फूड कोर्ट बांधले आहे. चारही बाजूंना खाद्यपदार्थांची दुकाने आणि मध्यभागी बसायला जागा अशी व्यवस्था आहे. याचा उद्देश राजस्थानी खाद्यपदार्थ आणि विक्रेते यांना चांगली जागा मिळावी असा असला तरी इथे पावभाजी, डोसा उत्तप्पा यांचीही रेलचेल होती. आम्ही २-४ स्टॉलवरून पराठे, पावभाजी असे वेगवेगळे पदार्थ घेतले. चव ठीकठाक होती. मला वाटतं चविष्ट खाऊ गल्ली ही नैसर्गिक वेलीसारखी असते. ती आपोआप वाढत गेली, गजबजत गेली तर तिथे उत्तम चवदार पदार्थ मिळतात. स्वच्छता असेलच असं नाही. आणि अगदी पद्धतशीर आखुन रेखुन बागेत रोपटी लावावी तशी लावली तर तेवढी मजा येत नाही.
मसाला चौकात यायचं आणखी एक कारण म्हणजे त्याच्या समोरच अल्बर्ट हॉल संग्रहालय आहे. आम्हाला पुढे तिथे जायचंच होतं त्यामुळे दुपारच्या जेवणासाठी मसाला चौक सोयीस्कर जागा होती.
अल्बर्ट हॉल संग्रहालय
अल्बर्ट हॉल संग्रहालय हे जयपूरच्या राजाने इंग्लंडच्या राजकुमाराच्या सन्मानार्थ बांधले. हाच राजकुमार पुढे जाऊन इंग्लंडचा राजा बनला. त्याच्या जयपुर दौऱ्यावेळी इमारतीचे शिळापूजन झाले. याच दौऱ्यात जयपूरच्या सर्व इमारती रंगवल्या होत्या, ज्यावरून पिंक सिटी हे नाव कसे पडले त्यावर मी पहिल्या भागात लिहिले आहे. त्या राजकुमाराला खुश करण्याची केवढी लगबग होती हे यावरून लक्षात येते.
इंग्रजी आणि भारतीय स्थापत्यशैलीचा मिलाफ करून हे बांधले आहे. याच्या नावात हॉल आहे कारण सुरुवातीला याचे नाव फक्त अल्बर्ट हॉल होते. राजाच्या मनात टाऊन हॉल बांधायचे होते. काही वर्षातच एका इंग्रजी संग्रहकार आणि राजाच्या पुढाकाराने इथे एक भव्य प्रदर्शन भरवले गेले. या प्रदर्शनात भारत आणि जगभरातुन कलाकुसर, शिल्पकला याचे वेगवेगळे नमुने गोळा करून मांडले गेले होते. हे प्रदर्शन यशस्वी झाल्यावर येथे कायमस्वरूपी संग्रहालय झाले. त्यामुळे याचे नाव आहे अल्बर्ट हॉल संग्रहालय.
त्यातुन या प्रदर्शनात काही जणांना प्रशिक्षण देऊन भेट देणाऱ्या लोकांना व्यवस्थित माहिती देण्याचे काम नेमणे हा प्रयोग पहिल्यांदा झाला आणि तो इतर संग्रहालयात राबवण्यात आला. ब्रिटिशांचा अनेक गोष्टींबाबत राग येतो, पण हा प्रयोगशील स्वभाव, गुणग्राहकता, अभ्यासु वृत्ती, शिस्तबद्ध दस्तऐवजीकरण याची भारतात अनेक भन्नाट उदाहरणे आहेत. अशा गोष्टी फार शिकण्यासारख्या आहेत.
इथली इमारत अत्यंत सुंदर असली तरी जुनी झालेली आहे. वस्तुसंग्रह उत्तम आहे. निवांत माहिती बघत, न्याहाळत बघितला तर बराच वेळ सहज जातो. इथे भारतातल्या वेगवेगळ्या भागात जी विशेष कला आहे, शैली आहे त्याचे नमुने आणि थोडी पार्श्वभूमी बघता येते. त्यापैकी एका नमुन्याची गोष्ट रंजक आहे. हि शैली म्हणे महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील फक्त एका कुटुंबाकडे होती. ते कुटुंब नंतर राजस्थानच्या सीमावर्ती प्रांतात स्थलांतरित झाले आणि त्यांच्याकडून हा नमुना बनवून घेतला गेला. आत वस्तूंचे फोटो आम्ही काढले नाहीत. त्यामुळे त्या वस्तूचं नेमकं वर्णन आता आठवत नाही. तुम्ही तिथे गेलात तर नक्की सावकाश पहा, तुम्हाला सापडेल.
इथे एक आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या मोठ्या मुलांनी (९-१० वयोगट) इथे फार रस घेऊन सर्व गोष्टी निवांत बघितल्या आणि बघु दिल्या. लहान मुलांना (२-४) जेवढं दाखवता आलं तेवढं दाखवलं आणि उरलेला वेळ त्यांना बाजूला घेऊन बसलो.
इथुन बाहेर पडल्यावर आजचा उरलेला वेळ खरेदीसाठी ठरवला होता. माधवी आणि ऋचाला आम्ही आमचे व्यापार खाते सोपवले आणि त्यांचे शिष्टमंडळ बाजारात पाठवले. इथे चारदिवारीच्या भागात बापू बाजार, झवेरी बाजार, त्रिपोलीय बाजार असे वेगवेगळे भाग आहेत. तिथे शर्ट, कुर्ते, पर्स, चादरी, रजया, दागिने असे सर्व काही मिळते. तिथे रात्रीपर्यंत मनसोक्त खरेदी करून त्या थेट मुक्कामाच्या ठिकाणी आल्या.
समीर आणि मी बाल संगोपन खाते आमच्याकडे घेतले आणि मुलांना घेऊन पुन्हा जवाहर सर्कलच्या बागेत घेऊन गेलो. जेवणाची वेळ होईपर्यंत तिथेच त्यांना खेळवले. तोरण गेट आणि पत्रिका गेटच्या रात्रीच्या दिव्यांसकटचे दृश्य बघितले आणि घरी (एअर बी एन बी) गेलो.
घरीच जेवण मागवले. जेवण केल्यावर माधवी आणि ऋचाची प्रत्येकी २-४ थैल्या भरून केलेली खरेदी बघितली आणि झोपी गेलो.
पुढचा दिवस आमचा जयपूरमधला शेवटचा होता. या दिवशी आमची चित्तोडगढ साठी ट्रेन होती. त्यामुळे सकाळी एखादी जागा बघुन जेवण करून आम्हाला ट्रेन गाठायची होती.
इसरलाट
आम्ही आवरून इसरलाटला गेलो. हि जागा तशी पाहण्याच्या दृष्टीने पटकन होते. परवाच व्हायला हवी होती. पण तेव्हा वेळ संपत आल्यामुळे जमले नाही. हि सुद्धा सिटी पॅलेस जवळच आहे. एके काळी जयपूरच्या सिंहासनासाठी दोन भावांमध्ये लढाई झाली. त्यापैकी एक जिंकला आणि त्याला राज्य मिळाले. त्या विजयाची आठवण म्हणून हा मिनार बांधण्यात आला.
![]() |
![]() |
इथे वर जाण्यासाठी गोल गोल निमुळता जिना आहे. वर गेलो कि संबंध जयपूरचे दृश्य दिसते. त्यापलीकडे इथे बघण्यासाठी विशेष गोष्ट म्हणजे आपल्या हौशी पर्यटकांनी भिंतीवर लिहिलेले प्रेम व्यक्त करणारे शिलालेख. एकाच ठिकाणी एका बाजूला रक्ताची महागडी किंमत मोजून लढलेले युद्ध आणि दुसऱ्या बाजूला आयत्या इमारतीत कुठून तरी उचललेल्या विटकरीने फुकटात केलेले विद्रुप प्रेम लेख.
यानंतर आम्ही लक्ष्मी मिष्ठान्न भंडारला गेलो. इथे मिठाई आणि चाट पदार्थांचे दुकान आहे आणि बाजूलाच त्यांचे हॉटेल आहे. तिथे जेवण उत्तम होते. इथली डाळ बाटी आणि लस्सी आणि इतर पदार्थ मला चोखी धानीपेक्षा जास्त आवडले.
गच्च जेवणानंतर आम्ही सामान घेऊन स्टेशनला गेलो आणि चित्तोडगडला रात्री पोहोचलो. ४.५ दिवस जयपूरला निवांत घालवून आणि बऱ्याच गोष्टी बघत इथला प्रवास संपला. पुढचे ३ दिवस उदयपूर विभागात जाणार होते. त्याबद्द्ल उर्वरित लेखांमध्ये.
क्रमशः।
















No comments:
Post a Comment