Saturday, February 28, 2026

राजस्थानची रोजनिशी : ५ : चित्तोडगड, उदयपूर सिटी पॅलेस

काल संध्याकाळी आम्ही जयपूरहून चित्तोडगडला ट्रेन ने आलो होतो. रात्री इथेच मुक्काम केला आणि आज चित्तोडगढ दर्शन करायचे होते. त्यानंतर इथूनच उदयपूरला जाऊन तिथे उरलेला दिवस जमेल ते पहायचे आणि पुढचे दोन दिवस उदयपूर मध्येच राहायचे होते. 


उदयपूरमध्ये उदयपूर शहरासोबतच थोडे बाहेर असलेले जवळपासची काही ठिकाणं आम्हाला बघायची होती. लांब लांब फिरायचे असल्यामुळे कॅब सोयीची पडेल असा विचार करून आम्ही चितोडगडहूनच तीन दिवस कॅब ठरवली.


मराठी पर्यटक


चित्तोडगडमध्ये रात्री आम्ही जिथे जेवण केले तिथल्या मालकाने मी मराठी आहे हे ओळखले, आणि पुण्याचे का म्हणुन जुजबी गप्पा मारल्या. त्यांचे काही नातलग पुण्यात राहतात म्हणाले. असेच माझ्या बायकोसोबत ती जयपूरमध्ये खरेदी करत असताना झाले. तिथल्या दुकानदाराने सुद्धा ते पुण्याहुन आलेत का अशी चौकशी केली. त्या लोकांना मुंबईची हिंदी आणि पुण्याची हिंदी वेगळी ओळखु येते म्हणे. खरं तर आम्ही पुण्याचे नाही, छ. संभाजीनगरचे. तरी मराठी तर सोडाच आमच्या हिंदीवरही पुण्याचा प्रभाव पडलाय हे कळल्यावर गंमत वाटली.  


आपल्या मराठी मंडळींमध्ये पर्यटनाची खरंच फार आवड आहे. याआधी काही महिने आम्ही उत्तराखंडला गेलो होतो तिथेही मराठी मंडळी प्रत्येक ठिकाणी आसपास असायची. इथे जयपूरला तर रोज केसरी, वीणा वर्ल्ड वगैरे सोबत मोठमोठे मराठी समुह दिसायचे. मला फार माहिती नाही, पण इतर राज्यात अशा मोठ्या प्रवास कंपन्या आहेत का कोणास ठाऊक. तिकडे ग्रुप टूर तेवढ्या प्रचलित नसाव्यात असं वाटतं. एवढे मोठे ग्रुप मराठीच दिसतात. मी एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या ट्रेकला गेलो होतो. तेव्हा तिथला नेपाळी गाईडसुद्धा म्हणाला होता कि आमच्याकडे भारतातले जे लोक येतात त्यापैकी मोठ्या संख्येने लोक महाराष्ट्रातलेच असतात.


इतर समूह म्हटलं तर गुजराती लोक असतात, त्यांच्यात कौटुंबिक एकोपा फार छान दिसतो. त्यांचे मोठे समुह त्यांच्याच कुटुंबीय आणि गोतावळ्याचे पाहण्यात आलेत. दाक्षिणात्य कुटुंबेसुद्धा दिसतात, पण संख्येने थोडे लहान. बाकी सुटीच्या दिवसात त्या त्या राज्यातले स्थानिक लोकही असतात. उत्तराखंडची काही शहरे, जयपुर वगैरे दिल्लीहुन फार पटकन पोहोचण्यासारखी असल्यामुळे तिथे दिल्लीतुन आलेले सुद्धा बरेच लोक असतात.


आमचा चित्तोडगडचा गाइड तर म्हणाला, ये आप लोग का सीजन चल रहा है अभी. हमे सालभर का अंदाजा होता है, मराठी लोग कब आएंगे, बंगाली कब आएंगे. आप लोग गर्मीयोमे या दिवाली के बाद आते हो, वो लोग दुर्गापूजा के बाद आते है. कदाचित असं सुद्धा असेल, मुलांच्या सुट्ट्या बघुन आम्ही प्रवास करतो तेव्हा तीच मराठी लोकांची सोयीस्कर वेळ असल्यामुळे तेव्हा मराठी लोक जास्त दिसत असतील. असो.


चित्तोडगड


चित्तोडगढ हा फक्त किल्ला नाही. एकाच वेळी तो भारताच्या इतिहासातला मानबिंदू आहे आणि त्याचवेळी आपल्या हृदयातली भळभळती जखमसुद्धा. याचे मुळ नाव "चित्रकूट दुर्ग" होते. हा किल्ला प्रचंड विस्तीर्ण आहे. हि अनेक पिढ्या मेवाड घराण्याच्या राजवंशाची राजधानी होती. इथे तब्बल २७ वेळा हल्ले झाले. त्यापैकी २४ वेळा ते परतवुन लावण्यात इथल्या लोकांना यश आले.



ज्या ३ वेळा त्यांना अपयश आले, त्यावेळेस इथल्या महिलांनी मोठ्या संख्येने "जौहर" केला. सावरकरांनी हा शब्द "जय हर" चा अपभ्रंश असावा असा अंदाज केला होता. मध्यपूर्वेतून आलेल्या इस्लामी आक्रमकांची बर्बरता, त्यांचे पराभूतांप्रतीचे क्रौर्य याच्या बऱ्याच कथा आहेत. आपल्या सैन्याचा पराभव अटळ दिसत असेल तर त्यानंतर आपल्या सन्मानास ठेच पोहोचु नये म्हणुन स्त्रिया चितेमध्ये स्वतःहुन उडी घेऊन आत्मबलिदान करत असत. त्यानंतर उरले सुरले योद्धे जीवावर उदार होऊन, मरणाची खात्री असूनही बलवत्तर शत्रुवर चालुन जात असत. केवळ आपल्या गेलेल्या स्वकीयांच्या सन्मानाप्रती आदरांजली म्हणुन. याला "साका" म्हणतात.



मी लहानपणी चौथी पाचवीत असताना आई बाबांसोबत इथे येऊन गेलो होतो. तेव्हाही आम्ही गाइड केला होता आणि इथली माहिती ऐकली होती.
तशी माझी स्मृती चांगलीच आहे, पण इथल्या गोष्टीने मनावर फार परिणाम केला होता.


इथे एक मोठा विजयस्तंभ आहे. राणा कुंभ यांच्या एका युद्धातल्या विजयाच्या स्मृतीसाठी बांधलेला विजयस्तंभ आहे. अतिशय सुंदर, पाहणाऱ्याच्या मनावर लगेच प्रभाव टाकणारा हा स्तंभ आहे.



तिथुन थोडंसंच पुढे गेलं कि लगेच मोडतोड केलेली शिल्पं, काही भग्न अवशेषसुद्धा दिसतात. हा असा विरोधाभास आहे. विजय आणि पराभव दोन्हीच्या खुणा अगदी आजूबाजूला. मी वेरूळला खुपदा गेलेलो आहे. असे भग्न अवशेष पाहुन मला नेहमीच वाईट वाटतं.















लहानपणीच्या इथे दिलेल्या भेटीमुळे राणी पद्मिनीची गोष्ट मला संजय भन्साळीचा चित्रपट येण्याच्या आधीपासुन माहित होती आणि ती पाहुन आश्चर्यही वाटलं नव्हतं. काही "पुरोगामी" मंडळींनी त्यावर विनाकारण टीका केली होती, स्त्रियांना फक्त वस्तु आणि सन्मानाची ट्रॉफी असल्यासारखं दाखवलं आहे असा आक्षेप नोंदवला होता. आपण आजच्या काळातले मापदंड काही शतके आधीच्या काळावर लावणे मला चुकीचे वाटते. आपल्या समाजात भले तेव्हा आणि आज सुधारणेस भरपुर वाव असेल, स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा असेल. पण स्त्रियांना आक्रमकांकडे जी वागणुक मिळत असे तिचा विचार करता, तेव्हाच्या मानी स्त्रियांना मरण श्रेयस्कर वाटलं असेल तर ते समजु शकतं. राणी पद्मिनीची गोष्ट आज सांगितली जाते तशीच घडली असेल का यावर वादविवाद आहेत, पण असे जौहर वेगवेगळ्या काळात झाले होते हे मात्र खरे.




इथे बाजूलाच समाधीश्वर नावाचे महादेवाचे मंदिर आहे. इथला महादेव थोडा वेगळा आहे. तीन मुखे असलेल्या दुर्मिळ रूपात पाहायला मिळतो. तिन्ही मुखांवर वेगळे हावभाव आहे. त्याची गोष्ट गाइडने सांगितली, पण नीटशी लक्षात राहिली नाही. जवळच एक गोमुख कुंड आहे, ज्यातुन सतत जलप्रवाह सुरु असतो, ते आम्ही लहानपणी बघितले होते. ते यावेळी पूर्ण पाण्यात बुडाले होते.





चित्तोडगड हे संत मीराबाईंचे सुद्धा सासरचे घर होते. त्या मेवाड च्या राजवंशातल्या पुत्रवधु होत्या. लग्न झाले असले तरी त्या कृष्णभक्तीत इतक्या लीन होत्या कि त्यांचे नवऱ्याकडे, संसाराकडे हवे तितके लक्ष नव्हते म्हणुन त्यांच्या सासरकडच्या मंडळींनी त्यांचा छळ केला, मारायचे प्रयत्न केले, पण कृष्णाने नेहमी त्यांना वाचवले असे सांगितले जाते. शेवटी त्या द्वारकेत गेल्या आणि तिकडेच कृष्णाच्या मूर्तीत विलीन झाल्या अशी एक कथा आहे. या चमत्कारी कथासुद्धा किती खऱ्या किती खोट्या यावर चर्चा होते. मीराबाईंचे सासरे राणा संगा (संग्रामसिंह) यांनी त्यांच्या विनंतीवरून बांधलेले श्याम मंदिर आजही येथे आपल्याला दिसते. येथे संत मीराबाई कृष्णाची आराधना करत असत असे सांगितले जाते. समोर त्यांच्या गुरु संत रविदासांच्या पदचिन्हांवर बांधलेली छत्रीसुद्धा आहे. आपल्याकडे इतिहास व्यवस्थित लिहुन ठेवण्याची पद्धत उशिरा आल्यामुळे त्यात अनेक वेगवेगळ्या कथा दंतकथांची भर पडते. 


अशीच एक दंतकथा अल्लाउद्दीन खिलजीने राणी पद्मावतीला बघण्याचा हट्ट धरल्यामुळे राणीला एका शीश महालामध्ये आणुन तिचे फक्त प्रतिबिंब क्षणभर दाखवुन तिला परत पाठवले गेले अशी आहे. आम्ही लहानपणी आलो होतो तेव्हाच्या गाइडने हि कथा सांगितली होती आणि ती जागाही दाखवली होती.  तेव्हा उन्हाळा होता आणि फार शुष्क वातावरण होते, मला घरी जाईपर्यंत उष्णतेचा प्रचंड त्रास झाला होता. तेव्हा किल्ला आणि परिसर अगदी कोरडा ठाक होता. यावेळी मात्र चांगला पाऊस पडून गेला होता आणि ती दाखवलेली जागा आज तळ्यात पाण्याने वेढलेली होती. पद्मावत चित्रपटाच्या वेळी झालेल्या वादंगापासुन या कथेवर बराच खल झाला आणि आता असं काही घडलं नाही असं सांगतात. तो गाइड म्हणाला वो तो हमारे बापजादे गाइड लोगोंकी गलती थी. उन्होंने टुरिस्ट लोगोंको बताने के लिये बढा चढा के कोई कहानी बना दी और वही फैल गयी. 


या गाइडला इथल्या इतिहासाचा फार अभिमान होता, आणि तेवढाच जयपूरच्या राजांवर राग होता. त्यांनी मुघलांशी हात मिळवला, मेवाडचे राजा महाराणा प्रतापांवर हल्ला केला, या आणि अशा अनेक बारीक सारीक गोष्टी त्याने सांगितल्या. तेवढं वगळता अतिशय अदबीने आओ सां, पधारो सां अशा पद्धतीने बोलत होता. इथे बरेच लोक अशाच अदबीने बोलतात, ते पाहुन आमच्या मुलांना गंमत वाटली होती. तीही अधुन मधुन खाओ सां, पिओ सां अशी बोलत होती. 


चित्तोडगडला जैन समाजाची अनेक तीर्थस्थळे आहेत. शहरात धर्मशाळा आहेत. अनेक शतकांपासुन इथे जैन मुनी, जैन व्यापारी यांचा वावर आहे. जैन व्यापारी आणि मेवाडच्या राजांमध्ये चांगले संबंध होते. भामाशाह नावाच्या व्यापाऱ्याने महाराणा प्रतापांना  बरीच मदत केली होती. त्यापैकी काही आम्ही बाहेरून बघितली. 


सावलिया सेठ


चित्तोडगडहुन आम्ही कॅबने उदयपुरकडे निघालो. वाटेत एक सावलिया सेठ नावाचे मंडफिया गावात एक प्रसिद्ध कृष्ण मंदिर आहे तिथे जायचे होते. इथल्या कृष्णाचे वैशिष्ट्य असे कि हा व्यापारी वर्गात या मंदिराविषयी विशेष श्रद्धा आहे. त्याला व्यापारात भागीदार म्हणुन ठेवले तर आपली भरभराट होते अशी मान्यता आहे. अनेक व्यवसायांमध्ये कृष्ण याप्रकारे मानलेला भागीदार आहे. त्याच्या वाट्याची म्हणुन काही रक्कम देवधर्मासाठी बाजूला ठेवली जाते. त्यामुळे याला "सेठोका सेठ" असेही म्हणतात. 


पण आम्ही तिथे येईपर्यंत तिथे पट बंद होण्याची वेळ झाली होती. मी पहिल्या भागात या बद्दल सांगितले आहे. इथल्या मंदिरांमध्ये आरती, भोजन, विश्राम अशा वेगवेगळ्या निमित्ताने पट म्हणजे देवासमोर पडदे लावुन दर्शन बंद करतात. त्याची वेळ गाठणे आव्हानात्मक असते. आमची वेळ चुकली. आज कॅब दिवसभर आमच्या ताब्यात होती, चित्तोडगड आणि उदयपूर मिळुन आमचे दिवसाला ३०० किमान किमी ठरलेले असतात तेही होणार नव्हते. त्यामुळे पहाटे लवकर इथे येऊन परत चित्तोडगड किल्ला बघायला गेलो असतो तरी चालले असते. पण हि झाली पश्चातबुद्धी. आम्ही कृष्णाला बाहेरूनच नमस्कार करून पुढे निघालो. पुन्हा जोराचा पाऊस झाला. वाटेत जेवण करून आम्ही उदयपूरला पोहोचलो. 


उदयपूर सिटी पॅलेस


उदयपूरलाही कमी अधिक जोराने पाऊस होताच. आता कुठली आऊटडोअर ठिकाणे पाहण्यात अर्थ नव्हता. आम्ही सिटी पॅलेसला गेलो. उदयपूरचा सिटी पॅलेस अतिशय भव्य आहे. इथे तिकिटे, पार्किंग फीस, तिथल्या तिथे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मॉल मध्ये असतात तशा गाड्या आहेत. सगळ्याच गोष्टी अतिशय महाग आहेत. पार्किंग ५०० रुपये, ती गाडी एका दिशेने जाण्यासाठी १०० रुपये, परत येताना वेगळे पैसे. इतकी भरगच्च गर्दी असुन एवढी लुट कशासाठी असा प्रश्न पडला. 



महाराणा प्रतापांचे वडील उदयसिंग यांनी चित्तोडगडावर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे स्वकीयांच्या सल्ल्यावरून हे शहर वसवले आणि राजधानी बनवली. त्यामुळे याचे नाव उदयपुर. नंतरच्या अनेक पिढ्यांनी महालाच्या रचनेत भर घालत घालत आज या स्थितीत आणलेला आहे. महाराणा प्रतापांना मात्र या शहरात फारसे वास्तव्य करता आले नाही. त्यांचे बरेचसे आयुष्य जंगल आणि अरावली पर्वतात गनिमी काव्याने लढण्यात गेले. 


इथे राजांची वंशावळ, त्यांच्या वापरातली हत्यारे, माणिक मोती अशा बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. 






महालात फिरताना आपण कुठून कुठे जात आहोत हे आपल्याला समजत नाही. एका खोलीतुन दुसऱ्या खोलीत जाण्याचे रस्ते, जिने सगळे अगदी अरुंद आणि चिंचोळे बांधले आहेत. महाल एवढा मोठा असताना इथे जागा कमी का याचे उत्तर म्हणजे कोणी महालात हल्ला करायला आले तर त्यांना एक एक करून यायला आणि मोठे हत्यार न उगारता यायला भाग पडावे यासाठी. 













राजस्थानी चित्रांमध्ये गोष्ट सांगण्याची एक शैली आहे. कॉमिक बुक मध्ये जसं प्रत्येक प्रतिमेत वेगळा प्रसंग किंवा प्रसंगांची मालिका असते तसं इथे नसतं. एखादी घटना आणि त्यातले क्रमानुसार घडलेले वेगवेगळे क्षण इथे एकाच चित्र प्रतिमेत दाखवलेले असतात. त्यामुळे ती घटना माहित नसेल तर थोडं समजायला अवघड जाऊ शकतं. नमुना म्हणुन मी एका चित्राचा फोटो काढला आहे, यात राजा एका वृक्षावर बसलेला आहे आणि अस्वलाची शिकार करतानाचा प्रसंग आहे. यात अस्वल आडोशातुन बाहेर निघाले, झाडाजवळ आले अन मग शिकारीनंतर मरून पडले अशा अस्वलाच्या हालचाली आहेत, पण प्रथमदर्शनी पाहताना वाटेल जंगलातील अनेक अस्वले दाखवली आहेत. तसे नसुन हा आत्ता सांगितलेला घटनाक्रम आहे. 



उदयपूरला सिटी ऑफ लेक्स म्हणजे तलावांचे शहर म्हटले जाते. हे तलाव मानव निर्मित आहेत. राजस्थान म्हणजे वाळवंट अशी प्रतिभा घेऊन समजा कोणी राजस्थानात पहिल्यांदा उदयपूरला आले तर त्यांना आश्चर्याचा धक्का बसेल. या तलावातही जलमहाल, जगत मंदिर पॅलेस असे महाल बांधले आहेत. तिथे अत्यंत महागडे हॉटेल आणि रेस्टॉरंट आहे. या सगळ्याचे दृश्य सिटी पॅलेस मधुन छान दिसते. 









राजस्थानी सांस्कृतिक कार्यक्रम





पॅलेस पाहिल्यावर आम्ही पॅलेससमोरच्याच गल्ल्लीत "विरासत" नावाचा एक अतिशय सुंदर राजस्थानी सांस्कृतिक कार्यक्रम पाहिला. पपेट शो तर आधी सांगितल्याप्रमाणे ठिकठिकाणी होते आणि चोखी धानीमध्ये लोककलांचे सादरीकरणही पाहिले होते. पण त्या सर्वांचा दर्जा आणि इथल्या दर्जामध्ये जमीन अस्मानाचा फरक होता. इथे सर्व उच्च प्रतीचे व्यावसायिक कलावंत, छान बसवलेले संगीत आणि नृत्य सादरीकरण पाहायला मिळाले. इथुन जवळच गणगौर घाटावर गेल्या अनेक वर्षांपासुन असा कार्यक्रम प्रसिद्ध आहे, तिथल्याच काही कलावंतांनी आपला वेगळा चमु घेऊन इथे सादरीकरण सुरु केले आहे. 













याच गल्लीच्या तोंडाशी जगदीश्वर नावाचे उंचावर बांधलेले मंदिर आहे. तिथे छान दर्शन झाले. थोडे राजस्थानी बोलीभाषेतले भजन ऐकायला मिळाले. 












आमचे हॉटेल बंजारा हेरिटेज इथुन जवळच होते. ऑनलाईन बुकिंग करताना आपल्याला काही गोष्टींचा अंदाज येत नाही. आमचे हॉटेल छान होते, जागा छान होती. पण इथल्या अत्यंत गजबजलेल्या भागात. सिटी पॅलेस जवळ रस्ते फार छोटे आहेत, चढ उताराचे आहेत आणि अनेक ठिकाणी वन वे आहे. पॅलेस नंतर वर सांगितलेली दोन ठिकाणे आम्ही पायीच फिरलो. कॅब वाला पॅलेसच्या पार्किंगमध्ये थांबलेला होता. त्याला नेमके आमच्या हॉटेलच्या गल्लीमध्ये गाडी आणता येणार नव्हती. 


सिटी पॅलेसच्या गल्लीमध्ये एक सशुल्क पार्किंग होती, मी त्याला तिथे बोलावुन घेतले. कुटुंबाला हॉटेलमध्ये चेक-इन करून रुममध्ये सोडले. कॅबवाला सशुल्क पार्किंगमध्ये पोहोचल्यावर तिथुन सामान एका रिक्षात टाकले आणि मग हॉटेलमध्ये आणले. 


त्याच हॉटेलमध्ये टेरेस रेस्टॉरंट होते. इथल्या गल्ल्यांमध्ये अशा अनेक छोट्या पण उंच बिल्डिंग आहेत आणि त्यावर रूफ टॉप रेस्टॉरंट आहेत. त्यांना लेकचा छान व्ह्यू आहे. त्यादिवशी पावसामुळे ढगाळ वातावरणामुळे नीट दिसत नव्हते. पण इतर दिवशी दिसत असेल. तिथे संध्याकाळची हवा, योग्य आवाजात संगीत आणि एकंदर वाईब मस्त होती. जेवणही छान होते. इथे यायचा कुटाणा होत असला तरी इथली सेवा, जेवण, एकूण मुक्काम आम्हाला आवडला. 



प्रसन्न वातावरणात आणखी एक दिवस संपला. 


क्रमशः। 

राजस्थानची रोजनिशी : ४ : पत्रिका गेट, अल्बर्ट हॉल, इसरलाट

जयपुरमध्ये ऐतिहासिक स्थळे तर बरीच आहेत, पण जी गेल्या काही वर्षात बांधली गेली आणि अल्पावधीत लोकप्रिय झाली अशीसुद्धा काही ठिकाणे आहेत.. पत्रिका गेट, तोरण गेट, वर्ल्ड ट्रेड पार्क, मसाला चौक इ. 

यापैकी वर्ल्ड ट्रेड पार्क तर आपल्याकडच्या कुठल्याही आयटी पार्क सारखं ग्लास फसाड असलेलं मोठं आर्थिक केंद्र आहे. तिथेच मॉल आणि फूडकोर्ट अशाही गोष्टी आहेत. अशा गोष्टी नसलेल्या भागातुन, किंवा निमशहरी आणि ग्रामीण भागातुन आलेल्या पर्यटकांसाठी तेसुद्धा एक जरूर जाऊन यावं असं आकर्षण असेल. आम्हाला फारसं नावीन्य न वाटल्यामुळे आम्ही ते टाळलं. 

पत्रिका गेट

आजच्या दिवसाची सुरुवात आम्ही पत्रिका गेट पासुन केली. जयपुरच्या विमानतळापासुन अगदी जवळ एक जवाहर सर्कल आहे. जयपुर शहरात प्रवेश करताना एक पांढऱ्या शुभ्र रंगाचं द्वार आपलं स्वागत करतं. त्याचं नाव आहे तोरण द्वार. राजस्थानमध्ये अतिथी, विशेषतः बाहेरगावाहून आलेले जावई आधी दारावरील तोरणाला स्पर्श करून मग आत येतील अशी परंपरा होती. त्या परंपरेची आठवण ठेवत, विमानतळावर उतरलेले प्रवासी जयपूरला येताना या तोरणाला पार करून शहरात येतील, त्यांचं स्वागत हे द्वार करेल अशी ही कल्पना होती. 


या द्वाराच्या मागच्या बाजूला एक गोलाकार आकाराची बाग आहे. ती बाग ओलांडुन दुसऱ्या बाजूला आहे पत्रिका गेट. हवामहल, सिटी पॅलेस अशा जयपूरच्या प्रसिद्ध वास्तूंची झलक दाखवणारं, तशाच लालसर पाषाणातुन बनवलेलं, आणि पारंपरिक राजस्थानी पद्धतीने रंगवलेलं, अतिशय सुंदर नक्षीकाम असलेलं हे द्वार, राजस्थानच्या संस्कृतीचं आणि कलेच्या वारशाचे प्रतीक आहे. राजस्थान पत्रिका नावाचं इथे एक प्रमुख वर्तमानपत्र आहे. त्यांचा माध्यम समुह आहे. त्यांनी ह्याचा खर्च प्रायोजित केल्यामुळे याचे नाव पत्रिका गेट ठेवले गेले. 


हे दोन्ही द्वार गेल्या काही वर्षात बांधले गेले आणि फार लोकप्रिय झाले. इथे फोटो सुंदर येतात त्यामुळे "इंस्टाग्रामेबल" जागा म्हणुन इथे तरुणाईची वर्दळ असते. प्री वेडिंग शूटवाल्यांची गर्दी असते. शहरातून येताना आधी पत्रिका गेट लागतं. आम्ही पोचलो त्यादिवशी ऊन नव्हतं, थोडंसं ढगाळ आणि प्रसन्न वातावरण होतं. आम्हीही आमची फोटोची हौस भागवुन घेतली. तिथेच मुलांसाठी घोडे घेऊन फिरणारे लोक होते. त्यावर मुलांची घोड्यावरून चक्कर मारण्याची हौस फिटली. 

तिथे निवांत वेळ घालवुन रमत गमत बागेतुन फिरत फिरत आम्ही दुसऱ्या बाजुला तोरण गेटला पोहोचलो. इथे पत्रिका गेटपेक्षा थोडी कमी जागा आहे. तेवढ्या जागेत प्री वेडिंग वाल्यांचं बरंच काही चालु होतं. इथुन आम्ही पटकन निघालो आणि मसाला चौकात गेलो. 

मसाला चौक म्हणजे इथली एक खाऊ गल्ली आहे. सरकारने जागा घेऊन छान फूड कोर्ट बांधले आहे. चारही बाजूंना खाद्यपदार्थांची दुकाने आणि मध्यभागी बसायला जागा अशी व्यवस्था आहे. याचा उद्देश राजस्थानी खाद्यपदार्थ आणि विक्रेते यांना चांगली जागा मिळावी असा असला तरी इथे पावभाजी, डोसा उत्तप्पा यांचीही रेलचेल होती. आम्ही २-४ स्टॉलवरून पराठे, पावभाजी असे वेगवेगळे पदार्थ घेतले. चव ठीकठाक होती. मला वाटतं चविष्ट खाऊ गल्ली ही नैसर्गिक वेलीसारखी असते. ती आपोआप वाढत गेली, गजबजत गेली तर तिथे उत्तम चवदार पदार्थ मिळतात. स्वच्छता असेलच असं नाही. आणि अगदी पद्धतशीर आखुन रेखुन बागेत रोपटी लावावी तशी लावली तर तेवढी मजा येत नाही. 

मसाला चौकात यायचं आणखी एक कारण म्हणजे त्याच्या समोरच अल्बर्ट हॉल संग्रहालय आहे. आम्हाला पुढे तिथे जायचंच होतं त्यामुळे दुपारच्या जेवणासाठी मसाला चौक सोयीस्कर जागा होती. 

अल्बर्ट हॉल संग्रहालय

अल्बर्ट हॉल संग्रहालय हे जयपूरच्या राजाने इंग्लंडच्या राजकुमाराच्या सन्मानार्थ बांधले. हाच राजकुमार पुढे जाऊन इंग्लंडचा राजा बनला. त्याच्या जयपुर दौऱ्यावेळी इमारतीचे शिळापूजन झाले. याच दौऱ्यात जयपूरच्या सर्व इमारती रंगवल्या होत्या, ज्यावरून पिंक सिटी हे नाव कसे पडले त्यावर मी पहिल्या भागात लिहिले आहे. त्या राजकुमाराला खुश करण्याची केवढी लगबग होती हे यावरून लक्षात येते. 

इंग्रजी आणि भारतीय स्थापत्यशैलीचा मिलाफ करून हे बांधले आहे. याच्या नावात हॉल आहे कारण सुरुवातीला याचे नाव फक्त अल्बर्ट हॉल होते. राजाच्या मनात टाऊन हॉल बांधायचे होते. काही वर्षातच एका इंग्रजी संग्रहकार आणि राजाच्या पुढाकाराने इथे एक भव्य प्रदर्शन भरवले गेले. या प्रदर्शनात भारत आणि जगभरातुन कलाकुसर, शिल्पकला याचे वेगवेगळे नमुने गोळा करून मांडले गेले होते. हे प्रदर्शन यशस्वी झाल्यावर येथे कायमस्वरूपी संग्रहालय झाले. त्यामुळे याचे नाव आहे अल्बर्ट हॉल संग्रहालय. 


कल्पना करा, या सर्व गोष्टी आहेत एकोणिसाव्या शतकातल्या, म्हणजे १८७६ - १८९० च्या काळातल्या. त्या काळात भारतात असे प्रदर्शन, संग्रहालय या गोष्टी किती रोचक वाटतात. आपलं जसजसं इतिहासाचं शिक्षण, वाचन घडत जातं, तसतसं प्रत्येक कालखंडाबद्दल काही ठळक गोष्टी लक्षात राहतात आणि त्या कालखंडाविषयी आपली काही एक धारणा होते. माझ्या डोक्यात हा कालखंड म्हणजे १८५७ च्या उठाव अयशस्वी झाल्यावर जी काही वर्षे उदासीन गेली, हळू हळू राजकारण सनदशीर मार्गाकडे वळले, काँग्रेस स्थापन झाली अशा गोष्टी आहेत. त्याच काळात एकीकडे भारतात असे प्रयोग होत असतील अशी कल्पना करवत नाही. 


त्यातुन या प्रदर्शनात काही जणांना प्रशिक्षण देऊन भेट देणाऱ्या लोकांना व्यवस्थित माहिती देण्याचे काम नेमणे हा प्रयोग पहिल्यांदा झाला आणि तो इतर संग्रहालयात राबवण्यात आला. ब्रिटिशांचा अनेक गोष्टींबाबत राग येतो, पण हा प्रयोगशील स्वभाव, गुणग्राहकता, अभ्यासु वृत्ती, शिस्तबद्ध दस्तऐवजीकरण याची भारतात अनेक भन्नाट उदाहरणे आहेत. अशा गोष्टी फार शिकण्यासारख्या आहेत. 

इथली इमारत अत्यंत सुंदर असली तरी जुनी झालेली आहे. वस्तुसंग्रह उत्तम आहे. निवांत माहिती बघत, न्याहाळत बघितला तर बराच वेळ सहज जातो. इथे भारतातल्या वेगवेगळ्या भागात जी विशेष कला आहे, शैली आहे त्याचे नमुने आणि थोडी पार्श्वभूमी बघता येते. त्यापैकी एका नमुन्याची गोष्ट रंजक आहे. हि शैली म्हणे महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील फक्त एका कुटुंबाकडे होती.  ते कुटुंब नंतर राजस्थानच्या सीमावर्ती प्रांतात स्थलांतरित झाले आणि त्यांच्याकडून हा नमुना बनवून घेतला गेला. आत वस्तूंचे फोटो आम्ही काढले नाहीत. त्यामुळे त्या वस्तूचं नेमकं वर्णन आता आठवत नाही. तुम्ही तिथे गेलात तर नक्की सावकाश पहा, तुम्हाला सापडेल. 

इथे एक आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या मोठ्या मुलांनी (९-१० वयोगट) इथे फार रस घेऊन सर्व गोष्टी निवांत बघितल्या आणि बघु दिल्या. लहान मुलांना (२-४) जेवढं दाखवता आलं तेवढं दाखवलं आणि उरलेला वेळ त्यांना बाजूला घेऊन बसलो. 

इथुन बाहेर पडल्यावर आजचा उरलेला वेळ खरेदीसाठी ठरवला होता. माधवी आणि ऋचाला आम्ही आमचे व्यापार खाते सोपवले आणि त्यांचे शिष्टमंडळ बाजारात पाठवले. इथे चारदिवारीच्या भागात बापू बाजार, झवेरी बाजार, त्रिपोलीय बाजार असे वेगवेगळे भाग आहेत. तिथे शर्ट, कुर्ते, पर्स, चादरी, रजया, दागिने असे सर्व काही मिळते. तिथे रात्रीपर्यंत मनसोक्त खरेदी करून त्या थेट मुक्कामाच्या ठिकाणी आल्या. 

समीर आणि मी बाल संगोपन खाते आमच्याकडे घेतले आणि मुलांना घेऊन पुन्हा जवाहर सर्कलच्या बागेत घेऊन गेलो. जेवणाची वेळ होईपर्यंत तिथेच त्यांना खेळवले. तोरण गेट आणि पत्रिका गेटच्या रात्रीच्या दिव्यांसकटचे दृश्य बघितले आणि घरी  (एअर बी एन बी) गेलो. 


घरीच जेवण मागवले. जेवण केल्यावर माधवी आणि ऋचाची प्रत्येकी २-४ थैल्या भरून केलेली खरेदी बघितली आणि झोपी गेलो. 

पुढचा दिवस आमचा जयपूरमधला शेवटचा होता. या दिवशी आमची चित्तोडगढ साठी ट्रेन होती. त्यामुळे सकाळी एखादी जागा बघुन जेवण करून आम्हाला ट्रेन गाठायची होती. 

इसरलाट

आम्ही आवरून इसरलाटला गेलो. हि जागा तशी पाहण्याच्या दृष्टीने पटकन होते. परवाच व्हायला हवी होती. पण तेव्हा वेळ संपत आल्यामुळे जमले नाही. हि सुद्धा सिटी पॅलेस जवळच आहे. एके काळी जयपूरच्या सिंहासनासाठी दोन भावांमध्ये लढाई झाली. त्यापैकी एक जिंकला आणि त्याला राज्य मिळाले. त्या विजयाची आठवण म्हणून हा मिनार बांधण्यात आला. 
















इथे वर जाण्यासाठी गोल गोल निमुळता जिना आहे. वर गेलो कि संबंध जयपूरचे दृश्य दिसते. त्यापलीकडे इथे बघण्यासाठी विशेष गोष्ट म्हणजे आपल्या हौशी पर्यटकांनी भिंतीवर लिहिलेले प्रेम व्यक्त करणारे शिलालेख. एकाच ठिकाणी एका बाजूला रक्ताची महागडी किंमत मोजून लढलेले युद्ध आणि दुसऱ्या बाजूला आयत्या इमारतीत कुठून तरी उचललेल्या विटकरीने फुकटात केलेले विद्रुप प्रेम लेख. 

यानंतर आम्ही लक्ष्मी मिष्ठान्न भंडारला गेलो. इथे मिठाई आणि चाट पदार्थांचे दुकान आहे आणि बाजूलाच त्यांचे हॉटेल आहे. तिथे जेवण उत्तम होते. इथली डाळ बाटी आणि लस्सी आणि इतर पदार्थ मला चोखी धानीपेक्षा जास्त आवडले. 


गच्च जेवणानंतर आम्ही सामान घेऊन स्टेशनला गेलो आणि चित्तोडगडला रात्री पोहोचलो. ४.५ दिवस जयपूरला निवांत घालवून आणि बऱ्याच गोष्टी बघत इथला प्रवास संपला. पुढचे ३ दिवस उदयपूर विभागात जाणार होते. त्याबद्द्ल उर्वरित लेखांमध्ये. 

क्रमशः।

Thursday, February 26, 2026

राजस्थानची रोजनिशी : ३ : आमेर, नाहरगड

आजच्या दिवशी आम्हाला जयपूरच्या थोड्या बाहेरच्या बाजूला असलेल्या काही जागा करायच्या असल्यामुळे आम्ही एक कॅब दिवसभरासाठी ठरवली. 

आमेर

जयपुरच्या राजांची आधीची राजधानी म्हणजे आमेर इथून जवळच आहे. इथे जागा आणि पाण्याची कमतरता भासायला लागल्यावर जयपूर शहर वसवण्यात आले. त्याच भागात आमेर, जयगड, नाहरगड असे तीन किल्ले आणि आणखी छोटे मोठे पॉईंट आहेत. 

राजवंशाच्या अनेक पिढ्या आमेर इथुनच राज्य चालत होते. याचे दुसरे एक नाव अंबेर सुद्धा आहे. त्याचे स्पेलिंग Amber असे होत असल्यामुळे ते इंग्रजी शब्द अँबर असे उच्चारले जाते. मला आधी ते फक्त इंग्रजांनी अपभ्रष्ट केलेले नाव वाटत होते. परंतु विकिपीडियावर उपलब्ध माहितीनुसार या किल्ल्याचे नाव येथील अंबिकेश्वर (महादेव) मंदिरामुळे किंवा अंबा देवीमुळे पडुन त्याचे पुढे आमेर झाले. 

आपल्या मनात किल्ला म्हटलं की राजगड, रायगड असे जे किल्ले येतात तसे नाही. सह्याद्रीमध्ये किल्ले जसे प्रचंड उंच डोंगरावर असतात, तसा नाही, परंतु त्या तुलनेत एका छोट्या टेकडीवर हा किल्ला वसलेला आहे. इंग्रजीत बारीक फरक सांगायचा झाला तर याला फोर्ट म्हणण्या ऐवजी कॅसल म्हणणे कदाचित जास्त योग्य होईल. गढी हा शब्दही कदाचित योग्य होईल. हा किल्ला तुम्ही जोधा अकबर चित्रपटात बघितला असेल. जोधाबाई या इथल्याच राजकुमारी होत्या. 

गाईडच्या मते याला किल्ला म्हणणे चुक आहे, त्याच्या लेखी हा सुद्धा सिटी पॅलेस सारखा महालाच होता. आमेर म्हणजे राजदरबार आणि राजपरिवारच्या निवासाची जागा, जयगड जो इथुन समोरच दिसतो ती सैनिकांची जागा, नाहरगड इथून थोडा लांब आहे ती राजस्त्रियांच्या विरंगुळ्याची जागा. 

आमेरकडे जाताना एक तळे लागते. तिथून किल्ल्याचे दृश्य छान दिसते. तिथे काही वेळ थांबुन आम्ही किल्ल्याकडे निघालो. तुम्ही याच्या जवळूनच किल्ल्याकडे पायी जाऊ शकता, किंवा इथे हत्तीवर बसून जाण्याची सुद्धा सोय आहे. 

आम्ही गाडी केलेली असल्यामुळे गाडीने पुढून गावातून एक छोटा रस्ता आहे त्याने गेलो, परंतु तिथे मोठ्या संख्येने गाड्या असल्यामुळे ट्रॅफिक जाम होता. गाडी हळू हळू पुढे सरकत होती. शेवटी आम्ही प्रवेशद्वार जवळ आल्यावर गाडीतून उतरून ड्रायव्हरला गाडी पार्किंगमध्ये नेऊन थांबायला सांगितले आणि उरलेला रस्ता पायी पायी गेलो. 

इथल्या किल्ल्यांच्या दरवाज्यांना गणेश पोल, सुरज पोल अशी नावे असतात. त्यावरून आठवलं, इथल्या लोकांच्या बोलण्यात दरवाजाला गेट हाच शब्द वापरतात. समजा कारचं दार नीट लागलं नसेल तर कॅबवाले म्हणतील, कोई तो गेट खुला रह गया है. हॉटेलवाले काचेच्या दरवाजालासुद्धा गेट म्हणतात. आपका सामान गेटपे छोड दिजिये, बंदा ले आयेगा. आपल्याकडे सहसा घराची दुकानाची दारे असतात त्यांना दार किंवा दरवाजा, इंग्रजीत म्हटलं तर डोअर असं म्हणतात आणि गेट हा शब्द अंगणाचं गेट किंवा सोसायटीचं गेट असा वापरतात. त्यामुळे सुरुवातीला हे ऐकायला गमतीशीर वाटतं. 

आमेर किल्ल्यामध्ये अतिशय सुंदर स्थापत्य, रंगकाम बघायला मिळतं. 



गाईडच्या माहितीनुसार इथल्या दरवाजांवर, भिंतीवर जे रंग आहेत, चित्र आहेत, ते ४०० वर्षांपासून तसेच आहेत. नैसर्गिक पद्धतीने बनवलेले रंग इथे वापरले गेले आहेत. 





इथे शीश महल फार सुंदर आहे. आधी तिथे आत जाता येत असे, परंतु आपल्या पर्यटकांच्या निष्काळजी वागण्यामुळे तिथे प्रवेश बंद करण्यात आला.


इथे एका राजाला अनेक राण्या होत्या त्यांच्यासाठी राजाने वेगवेगळे महाल बनवले होते. त्यांना एकमेकींच्या महालात जाण्याची परवानगी नव्हती, पण मध्यभागी एका ठिकाणी त्या एकत्र येऊन वेळ घालवत असत. राजाला कुठल्याही राण्यांच्या खोलीत जायला मार्ग असा बनवला होता कि तो नेमका कुठे प्रवेश करत आहे, कोणत्या राणीकडे जात आहे हे इतर राण्यांना कळत नसे. 


जयपुरला याच गोष्टी ऐकायला मिळत होता होत्या. चित्तोडगडला जाईपर्यंत एकही युद्धकथा ऐकायला मिळाली नाही. यहां के राजा मुघलोंके सेनापती होते थे, हे गाईडने सांगितले. याचे कारण असे, कि जोधा अकबर चित्रपटात दाखवल्याप्रमाणे इथल्या राजांनी मुघलांशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारले होते. मुघलांच्या दरबारी त्यामुळे इथल्या राजांना मोठा मान आणि पद मिळत असे. त्यांनी शौर्य गाजवले, पण ते मुघलांसाठी, इतरत्र. त्यामुळे इथे त्यांच्या स्वतःच्या राज्यात त्यांच्यावर युद्ध प्रसंग तसे आले नाहीत. महाराणा प्रतापांच्या प्रसिद्ध हल्दी घाटीच्या लढाईत विरुद्ध बाजूने मुघलांच्या वतीने लढणारे इथल्याच राजाचे सैन्य आणि स्वतः राजा होते. आपल्या शिवरायांवर पुरंदरचा तह करायची वेळ आणणारे मिर्झा राजा जयसिंग इथलेच. पुढे ब्रिटीशांशीही जुळवुन घेतले होते. त्यामुळे इथले राजवाडे, महाल, संपत्ती, ऐश्वर्य सगळे शाबूत राहिले, बहरत गेले. 

आमेरहुन दिसणारे जयगडचे दृश्य

आज जरा ढगाळ वातावरण होते. आणि पाऊसही थेंब थेंब येऊन जात होता. दुपारच्या वेळी तो थोडा पडून गेला. आम्ही जयगडला जायचे रद्द केले. तिथे एक तोफ हेच मुख्य आकर्षण असल्याचे कळले, तिथे सैनिकी वापराचा किल्ला असल्यामुळे इतर इमारती वगैरे जास्त नव्हत्या. आम्ही दुपारचे जेवण करून थेट नाहरगडला गेलो. 

नाहरगड

नाहरगडला सर्व जयपुर शहराचा व्ह्यू दिसतो. इथे सुद्धा राण्यांसाठी बांधलेली हवेली वगैरे आहे. फार काही ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे नाही. तिथे एक नव्याने बनवलेले लोणावळ्याच्या सुनील'स वॅक्स म्युझिअमसारखे एक नवीन दालन आहे, तिथल्या शीशमहलची आमचा ड्रायवर फार जाहिरात करत होता. तोही ऐतिहासिक नाही तर आता नव्याने एक आकर्षण म्हणुन बांधलेला आहे. ह्याचे तिकीट प्रति माणशी ५०० असे होते. आम्हाला गुगलवरचे फोटो पाहुन त्यात फारसा रस वाटला नाही. 





या किल्ल्यावर पडाव कॅफे प्रसिद्ध आहे. संध्याकाळी सूर्यास्त, मोकळी हवा आणि जयपूर शहराचे दृश्य हे तिथले मुख्य आकर्षण. आम्ही गाईड न घेता निवांत तिथली हवेली बघितली, आणि संध्याकाळ होत आली होती तर तिथेच थांबायचे ठरवले. पण हवामानाच्या मनात ते नव्हते. ढगाळ वातावरणामुळे जयपूरचे दृश्य काही दिसले नाही आणि परत पाऊस सुरु झाला. सूर्यास्त दिसायची शक्यता सूर्याआधी मावळली. 

जल महाल

आम्ही तिथुन निघालो. येता येता रस्त्यात जलमहाल लांबुन बघितला. हा महाल एका तळ्यात छोट्या बेटावर बांधला आहे, त्यामुळे नाव जल महाल. पण तो सध्या पर्यटकांसाठी बंद होता. त्यामुळे बाहेरूनच बघुन पुढे निघालो. रात्रीचे जेवण शाही रसोडा नावाच्या रेस्टोरंट मध्ये केले. 



तिथले वातावरण आणि सजावट नावाप्रमाणेच शाही होती. तिथे लाईव्ह परफॉर्मन्स चालु होता. नृत्यांगना अतिथींच्या टेबलजवळ जाऊन जाऊन राजस्थानी गाण्यांवर नृत्य करत होती आणि कोणाला नाचण्यात रस असल्यास त्यांनाही प्रोत्साहन देत होती. माहौल एकदम मस्त होता. जेवण मात्र तेवढे शाही नव्हते. 

पावसामुळे आज फार लवकर अंधार पडला होता. अपेक्षेपेक्षा कमी स्थलदर्शन झाले, पण तरी मजा आली. 

क्रमशः