Thursday, March 12, 2026

राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट

राजस्थानच्या ट्रिपचा शेवटचा दिवस उजाडला. आज आमचं संध्याकाळचं विमान होतं. 

आम्ही सिटी पॅलेसच्याच भागात मुक्कामी होतो. त्या भागात थोडी पायी भटकंती करून आलो. आधी गणगौर घाटावर गेलो. गणगौर म्हणजे शिव गौरी. हे या घाटाचं नाव आहे, हा एक सणसुद्धा  आहे, आणि त्या दिवशी करायचा एक पारंपरिक नृत्यखेळाचा प्रकारसुद्धा आहे. 




मुन्नाभाई मध्ये लक्की सिंगचा एक डायलॉग आहे. त्याला अधिकारी विचारतो २० मजल्याची परवानगी असताना इमारत २५ मजल्यांची कशी बनवलीस? तो म्हणतो "बनते बनते बन गयी यार!!".  सिटी पॅलेसच्या आजुबाजुला जुन्या हवेल्या आहेत आणि अशा "बनते बनते बन गयी" छाप वेड्या वाकड्या उभ्या राहिलेल्या, एकमेकांना अगदी बिलगुन असलेल्या अनेक इमारती आहेत. वेगवेगळी दुकाने आहेत. इथे फिरायला मजा येते. 






इथल्या पिचोला, फतेह सागर असे वेगवेगळे तलाव आहेत. त्यांच्या किनारी ठिकठिकाणी घाट आहेत. घाटांवर सकाळी सुद्धा सुंदर दृश्य दिसतं आणि लायटिंगमुळे रात्रीसुद्धा. वेळ मिळेल तेव्हा इथे यायला हवं. आम्ही थोडी मित्रांसाठी राजस्थानची चित्रे असलेली शीतपेटिका-चुंबके (फ्रिज मॅग्नेट्स) घेतली. मुलींसाठी कठपुतळ्या घेतल्या. 



त्यानंतर आम्ही करणी माता मंदिरात रोपवेने गेलो. हे एका डोंगरावर आहे. इथे जाण्यासाठी पायी जायचा मार्ग आहे. एक छोटी हाईक करून तुम्ही इथे जाऊ शकता. आणि पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेला रोप वे मार्ग सुद्धा आहे. रोपवेसाठी गर्दी आणि वेटिंग बरीच असते. तिथल्या गर्दीत बसलं कि वाटलं आपण पायीसुद्धा जाऊ शकलो असतो. पण हे सकाळी लवकर ठरवायला हवं. ऊन वर चढल्यावर अवघड आहे. 





रोपवे तुम्हाला जिथे सोडतो त्याच्याही वर थोडं ५-७ मिनिटे पायऱ्या चढाव्या लागतातच. वर गेल्यावर मंदिर फार भव्यदिव्य नाही परंतु छान आहे. तिथे मंदिर वाढवण्यासाठी सध्या बांधकाम सुरु होतं. तिथुन समोर उदयपुर शहर, त्यातले सुंदर तलाव, काही होड्या, सिटी पॅलेस, बेटावरचे जगमंदिर पॅलेस हे सर्व फार छान दिसते. 

आम्ही मंदिर दर्शन करून परत रोपवे साठी वाट बघत असताना मला इंडिगो एअरलाईन्सचा मेसेज आला. आमची संध्याकाळचं विमान बदलुन आता २ तास अलीकडे आलं होतं. हे अगदी धक्कादायक होतं. सुदैवाने आम्ही शहरात होतो आणि बाकीचे बेत रद्द करून विमानतळावर जाऊ शकत होतो. हेच जर आम्ही कालसारखे नाथद्वारा किंवा आणखी कुठे बाहेर असतो तर? एक मेसेज पाठवुन कंपनी खुशाल बसली. हल्ली लोक व्हाट्सअप जास्त वापरतात, SMS कधी कधी पाहायचे राहुन जातात, तसं काही झालं असतं तर अवघड होतं. असो. 

आम्ही पुढे सज्जनगड, फतेहसागर अशा ज्या काही गोष्टी करणार होतो ते सर्व रद्द करावं लागलं. फक्त जेवण्याइतकाच वेळ शिल्लक होता. चित्तोडगडला मी "दाल बाफला" या पदार्थाच्या पाट्या काही रेस्टॉरंटसमोर पाहिल्या होत्या. दाल बाटी तर आम्ही बऱ्याचदा खातो, आणि राजस्थानमध्ये आल्यावरही दोन तीन ठिकाणी झाली होती. हा "दाल बाफला" काय प्रकार आहे तो मला खाऊन बघायची इच्छा होती. 

दाल बाफला हे दाल बाटीसारखंच असतं, फक्त बनवताना थोडं उकडून का काही तरी करून थोडं वेगळ्या पद्धतीने बनवतात. तपशील मी विसरलो. मी मॅपवर थोडं शोधलं आणि विमानतळाच्या रस्त्यावरच मला एक "दाल बाफला" थाळी रेस्टॉरंट सापडलं. आम्ही जेवणाला तिथेच थांबलो. चांगलं होतं जेवण, पण हा पदार्थ फार वेगळा किंवा भन्नाट नाही वाटला. कदाचित पुढे दुसरीकडे संधी मिळाली तर कळेल. आणि गंमत म्हणजे हे हॉटेल एका इंदोरच्या प्रसिद्ध हॉटेलची उदयपूरमधली शाखा होती. हा भाग मध्य प्रदेशच्या सीमेजवळ आहे, त्यामुळे इथली खाद्यसंस्कृती थोडीबहुत सारखी असावी. आमच्या ड्रायव्हरचं तो चित्तोडगडचा असल्यामुळे म्हणणं होतं तुम्ही हा पदार्थ तिथेच खायला हवा होता, तिथे याहुन छान मिळतो. बघु आता परत कधी दाल बाफला खायला मिळतो. 

विमानतळावर गेलो. चेक इन मध्ये थोडा गोंधळ होता. मी पूर्वी नवी मुंबईतुन पुण्याला बऱ्याचदा शेअरिंग टॅक्सीने यायचो. वाशी पुलाखाली ते लोक सीटं भरायचे. पुण्यात तुम्ही चांदणी चौक, निगडी, पिंपळे सौदागर असं काहीही सांगितलं तरी हो ला हो लावुन गाडीत बसवायचे आणि मग द्रुतगती मार्ग संपायच्या थोडं अलीकडे एक छोटा फूड मॉल आहे, तिथे थांबवुन मग प्रवासी अदलाबदल करायचा गोंधळ घालायचे. तसंच काही कदाचित प्रवासी संख्या कमी पडल्यामुळे इंडिगोने केलं असावं. दोन विमानातले प्रवासी एकाच विमानात सीटं भरून कोंबले असावेत. काउंटरवर थोडा टाईमपास झाला आणि आमचं चेक इन झालं. 

संध्याकाळी उशिरा आम्ही पुण्यात पोहोचलो. जयपुर उदयपुर हे दोनच भाग आम्ही आठवडाभर फिरलो. आणि दोन्ही ठिकाणी आणखी बरंच काही बघायला शिल्लक आहे. जयपुरजवळ खाटु श्याम नावाचं प्रसिद्ध मंदिर आहे, उदयपुर जवळ सावलिया सेठ नावाचं. उदयपूरचा फतेह सागर लेक, सज्जनगड पॅलेस, बाहुबली हिल्स, राजसमंध लेक, महाराणा प्रतापांच्या नावाने एक नवीन अम्युजमेंट पार्क सुरु झालेला आहे. अशा एक ना अनेक गोष्टी. अभयारण्य, सफारी वगैरेचा बेत  आम्ही यावेळेस केलाच नव्हता. 

म्हटलं तर लोक आठवडाभरात राजस्थानच्या दूरदूरची ठिकाणे असणारी ग्रुप टूरसुद्धा आखतात. पण अशा सहलीत दगदग बरीच होते. आपण फक्त इकडून तिकडे धावत सुटलोय असं वाटतं. आपल्याला एखादं ठिकाण जास्त आवडू शकतं, तिथे जास्त वेळ थांबावं वाटतं, काही ठिकाणी गेलो तरी फार वेळ घालवावा वाटत नाही. मोठ्या ग्रुपसोबत आपल्याला ठरलेल्या क्रमात आणि वेळेत गोष्टी कराव्याच लागतात. हातात थोडा वेळ ठेवला, नियंत्रण आपल्या हातात असेल, समविचारी मित्र असतील तर स्थलदर्शन आणि निवांत मजा दोन्ही करता येतं. आपली लोकं कमी असतील, किंवा माहिती काढायला, ठरवायला सुद्धा वेळ नसेल, ती जबाबदारी दुसऱ्यावर सोपवुन निर्धास्त फिरण्याची इच्छा असेल तर अर्थात कधी ग्रुप पॅकेज टूरसुद्धा सोयीचे असतेच. 

राजस्थानची अनेक सुंदर दृश्ये, अनेक आठवणी, चिक्कार फोटो आणि व्हिडीओ, खरेदी केलेल्या काही राजस्थानी वस्तु सोबत घेऊन आमची सुंदर संस्मरणीय सहल संपली. आणि या राजस्थानच्या रोजनिशीतले शेवटचे पानदेखील इथे संपले. 

समाप्त।

Sunday, March 1, 2026

राजस्थानची रोजनिशी : ६ : हल्दी घाटी, नाथद्वारा

आजचा दिवस उदयपुर च्या बाहेर भटकण्यासाठी ठेवला होता. सर्वप्रथम सज्जनगड म्हणजेच मॉन्सून पॅलेसला जायचं होतं. सज्जनगड म्हटलं कि आपल्या साताऱ्याचा सज्जनगड डोळ्यासमोर येतो. इथला सज्जनगड तसाच शहराबाहेर उंचावर आहे. तिथुन जवळ टेकड्या व्ह्यू पॉईंट्स प्रसिद्ध आहेत. तिकडे जाण्याआधीच आमच्या ड्रायव्हरला दुसऱ्या ड्रायव्हर कडुन समजलं कि आज सज्जनगड बंद होता. त्याने आणखी २-३ जणांना विचारून खात्री करण्याचा प्रयत्न केला. शहराबाहेर असल्यामुळे तिकडे जाण्या येण्यात वेळ घालवण्याची जोखीम नको म्हणुन आम्ही सुरुवात शहरातल्याच सहेलियोंकी बारी नावाच्या ठिकाणापासुन केली. 

सहेलियोंकी बारी

हे एक सुंदर उद्यान आहे. राजपरिवारातल्या स्त्रियांसाठी विरंगुळ्याचे, मनोरंजनाचे ठिकाण म्हणुन हे बनवण्यात आले. एकदम विस्तीर्ण उद्यान, छोटेसे तळे, अनेक कारंजे, फुलांचे ताटवे इथे बघायला मिळतात. त्याव्यतिरिक्त इथे काही नसलं तरी इथे येऊन मन प्रसन्न नक्कीच होतं. त्या काळात टीव्ही, रेडिओ काही नसताना, पडदा पद्धत प्रचलित असताना, स्त्रियांना बाहेरही मुक्त वावर करता येत नसेल. त्यामुळे अशा जागी येऊन नक्कीच विरंगुळा मिळत असेल. टीव्हीवर रामायण दाखवतात त्यात राम लक्ष्मण जेव्हा मिथिलेत पोहोचतात तेव्हा त्यांची आणि सीतेची भेट अशाच बागेत दाखवलेली आहे. 








एकलिंगजी मंदिर

यानंतर आम्ही गेलो एकलिंगजी मंदिरात. हे मेवाड राजघराण्याचे कुलदैवत. महाराणा प्रतापांच्या अनेक पिढ्या आधीचे पूर्वज बाप्पा रावळ यांनी हे मंदिर बांधले. त्यांचाही तिथे पुतळा आहे. या बाप्पा रावळांनी राज्याचे खरे स्वामी आणि राजे म्हणजे महादेवच, आम्ही फक्त त्यांचे दिवाण (सेक्रेटरी) अशा भावनेने राज्य केले. राज्यकर्त्यांकडे विनम्रता असणे फार आवश्यक आहे. त्यांच्या वंशजांची देखील अशीच मान्यता आहे. बाप्पा रावळ ते आजवर किती राजांनी खरंच हा विचार कृतीत आणला असेल ते कोणास ठाऊक. 


आजचे पंतप्रधानसुद्धा स्वतःला प्रधान सेवक म्हणवतात, आपल्या कार्यालयाचे नाव बदलुन सेवातीर्थ ठेवतात. इथे आल्यावर लक्षात येते, अशा प्रकारचा विचार आपल्या देशात किंवा संस्कृतीत केवळ लोकशाहीतुन किंवा माध्यमांमध्ये एक प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न म्हणुन आलेला नाही तर शेकडो वर्षे आधीपासुन आहे. प्रश्न हा आहे कि उच्चासनावरचा सत्ताधारी काहीही म्हणो, त्याच्या आजूबाजूची व्यवस्था तो या विचाराच्या अनुरूप राबवु शकतो कि नाही. सामान्य जनतेला सरकार दरबारी कामे करवुन घेताना आपण हक्काची सेवा घेत आहोत असं वाटतं कि बाबूंसमोर लाचार झाल्यासारखं वाटतं. असो. कुठे तरी विचाराचं बीज असेल तर त्याचं फळ मिळण्याची आशा ठेवता येते, कोणाला असं बोलण्याइतपतही विनम्रतेची गरज वाटली नाही तर कसली आशा? 

हल्दी घाटी

एकलिंग मंदिरानंतर आम्ही हल्दी घाटीला गेलो. ही महाराणा प्रतापांच्या आणि चेतक घोड्याच्या प्रसिद्ध गोष्टीची जागा. हल्दी घाटीजवळची माती पिवळसर रंगाची असल्यामुळे याचे नाव असे पडले असावे. 


जयपूरचे राजा मानसिंग यांनी मुघल बादशाह अकबराच्या वतीने मेवाडचे राजा महाराणा प्रतापांवर हल्ला केला. महाराणा प्रताप चेतक या आपल्या लाडक्या आणि रुबाबदार घोड्यावर होते. ते घोड्याला खोटी सोंड लावत असत. हत्ती हत्तीवर हल्ला करत नाही, आणि या खोट्या सोंडीमुळे शत्रुपक्षातला हत्ती गोंधळत असे. 


राजा मानसिंग एका हत्तीवर अंबारीत होते, महाराणा प्रतापांनी त्यांच्यावर थेट हल्ला केला, परंतु ते वाचले. मेवाडचे सैन्य संख्येने कमी होते. त्यांनी शौर्य गाजवले. परंतु मुघलांची सरशी होतेय असं वाटायला लागलं. महाराणा प्रताप मुघलांच्या तावडीत सापडु नयेत म्हणुन त्यांच्या साथीदारांनी त्यांना तिथुन निसटायला सांगितले. झाला मानसिंग नावाच्या त्यांच्या सरदाराने त्यांचे राजचिन्ह परिधान केले आणि मुघलांना आपण महाराणा प्रताप असल्याचे भासवत मरेपर्यंत लढले. 


महाराणा प्रताप आणि काही सैनिक तिथुन आपापल्या घोड्यांवर निसटले. चेतक घोडाही जखमी झाला होता तरीही त्याने या खिंडीत मोठी उडी मारून त्यांना पलीकडे पोहचवले आणि तो कोसळला. तिथेच त्याचा मृत्यू झाला. तो महाराणांचा इमानदार आणि लाडका घोडा होता. महाराणा प्रतापांनी त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ एक स्मारक बनवुन घेतले. 

महाराणा प्रताप म्युझियम

या ठिकाणाहून जवळच एक म्युझियम बनवण्यात आले आहे. तिथे महाराणा प्रतापांच्या आयुष्यावर आधारित अनेक प्रसंगांची शिल्पे आहेत. प्रत्येक शिल्पासमोर समूह जमला कि एक ध्वनिफीत वाजवली जाते, आणि त्या शिल्पात दाखवलेल्या प्रसंगाची माहिती मिळते. त्यासोबतच एका छोट्या चित्रपटगृहात एक लघुपट दाखवला जातो ज्यात वर सांगितलेला प्रसिद्ध लढाईचा प्रसंग सविस्तर समजावुन सांगितलेला आहे. 





राजस्थानी वीरांच्या मांदियाळीत आपल्या महाराजांना मानाचे स्थान पाहुन आनंद झाला. 

महाराणा प्रताप प्रचंड संघर्षमय आयुष्य जगले. राजस्थानातले अनेक राजे मुघलांना सामील झाल्यामुळे ते एकटे पडले होते. आर्थिक आणि मनुष्यबळ दोन्हीची चणचण त्यांनी सोसली. जंगलात राहुन, कंदमुळे खाऊन, गनिमी काव्याने त्यांनी लढा चालु ठेवला. आपला बराचसा प्रांत मुघलांच्या ताब्यातुन परत मिळवला. त्यांचे एक स्वप्न होते, त्यांची पिढीजात राजधानी असलेले चित्तोडगड परत मिळवण्याचे, ते मात्र अर्धवट राहिले. 

राजस्थानबाहेरून आलेल्या, तिथल्या इतिहासाची फारशी माहिती नसलेल्या, आणि महाराणा प्रतापांचे फक्त नाव ऐकून असलेल्या लोकांना त्यांचे आयुष्य, प्रेरणादायी चरित्र थोडक्यात समजावुन घेण्यासाठी हि उत्तम जागा आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हा प्रकल्प सरकारी नाही, एका जोडप्याने इतिहासावरील प्रेमापोटी आपल्या मेहनतीने, जमापुंजीचा वापर करून आणि लोकसहभागातुन बनवलेले स्मारक आहे. आपल्याकडे नुकताच बाबासाहेब पुरंदरेंच्या संकल्पनेतुन उभा राहिलेला शिवसृष्टीचा प्रकल्पसुद्धा असाच कौतुकास्पद आहे. 

हल्दी घाटी स्मारक

या स्मारकाजवळच उंच टेकडीवर आणखी एक जागा आहे. तिथे महाराणा प्रतापांचा चेतक घोड्यावर स्वार असलेला पुतळा आहे. आजूबाजूला काहीच नाही. दूर दूरपर्यंत अरावली डोंगर रांगांचं दृश्य. 


आमच्या ड्रायव्हरने खरं तर चेतक स्मारक समजुन आम्हाला इथे आणलं होतं. तो स्थानिक असल्यामुळे आतापर्यंत तरी काही सांगायची किंवा मॅप लावण्याची गरज पडली नव्हती. मी फक्त मधुन मधुन वेळेचा अंदाज घ्यायला मॅप बघत होतो. 

इथे आल्यावर मात्र मला त्याने चुकीच्या ठिकाणी आणल्यासारखं वाटलं. मी कुठे कुठे जायचं हे ठरवताना या जागांचे गुगलवरचे फोटो बघितले होते त्यामुळे चेतक स्मारक हे नाही हे माझ्या लक्षात आलं. मी मॅपवर चेक करून त्याला जागा आणि फोटो दाखवले. मग त्याला पण लक्षात आलं, हां ये भी एक है, लेकिन वहा कोई नही जाता. म्युझियम के बाद लोग यही पर आते है. 

इथे बरेच लोक कॅब घेऊन फिरतात त्यामुळे कुठली ठिकाणं सोबत बघायची त्याचा या ड्रायव्हर आणि त्यांच्या मालक लोकांचा सुद्धा एक आडाखा असतो. मी कॅब ठरवतांना दोन तीन जणांशी बोललो. एक जण स्वतःच मला पूर्ण दिवसाचा प्लॅन सांगत होता, आणि त्यात बदल करायचीही त्याची तयारी नव्हती. त्यामुळे जो जरा त्याबाबतीत लवचिक होता त्याच्याकडून मी कॅब घेतली होती.

त्याने मला विचारलं तिकडे घेऊन जाऊ का? पण आम्हाला आणखी जेवण करून मग नाथद्वाराला पोहोचायचं होतं. त्यापलीकडे पण एक जागा मी बघुन ठेवली होती पण तिकडे जायलाही वेळ मिळेल असं वाटत नव्हतं. त्यामुळे त्या चेतनच्या खऱ्या स्मारकाचा विचार सोडला आणि आम्ही रस्त्यात जेवण करून नाथद्वाराला गेलो. 

हल्दी घाटाजवळ चैत्र महिन्यात गुलाब भरपूर येतात म्हणे. आणि त्या गुलाबांच्या पाकळ्यांपासुन इथे गुलाबजल, गुलाब सरबत अशी अनेक उत्पादन स्थानिक लोक तयार करतात. त्याला चेत्री गुलाब का शरबत म्हणतात. महाराणा प्रतापांच्या स्मारकात सुद्धा तिथला माणुस या उत्पादनाची माहिती देत होता. इथे प्रत्येक पर्यटनस्थळांवर कुठल्या न कुठल्या उत्पादनाशी व्यापाराशी संलग्न काहीतरी असतंच. कमालीचे व्यावसायिक आहेत इथले लोक. 

नाथद्वारा

नाथद्वारा हे श्रीकृष्णाचे महत्वाचे ठिकाण आहे. इथे त्याला श्रीनाथजी म्हणुन संबोधले जाते. गुजरात आणि राजस्थान या दोन्ही राज्यातल्या भाविकांसाठी, विशेषतः वैष्णवांसाठी हे फार श्रद्धेचे स्थान आहे. या मंदीरात बाल रूपातल्या कृष्णाची काळ्या दगडातली मूर्ती आहे. 

इथल्या कथेनुसार हि स्वयंभु असुन, आधी गोवर्धन पर्वतावर प्रकट झाली होती. त्यानंतर ती मथुरेत होती. औरंगजेबाच्या मथुरेवर मंदिरांची नासधुस करण्यासाठी हल्ला करण्याची बातमी कळल्यावर तिथल्या लोकांनी ती तिथुन हलवली. त्यांचा रथ या ठिकाणी आल्यावर जमिनीत रुतला आणि पुढे सरकत नव्हता. तेव्हा पुजाऱ्यांची अशी धारणा झाली कि श्रीनाथजींनी आता याच जागेची निवड केलेली आहे. तेव्हाच्या मेवाडच्या राजांनी इथे मंदिरासाठी जागा दिली. जवळपासचा इतर कोणताही राजा औरंगजेबाच्या भीतीने या मूर्तीला जागा देण्यासाठी तयार नव्हता. 

या गावात आल्यावर तुम्हाला आपण राजस्थानमध्ये आहोत कि गुजरातमध्ये असा प्रश्न पडावा इतके गुजराती भाविक आणि दुकानदार आहेत. मला तर मागच्या वर्षी आम्ही द्वारकेत जाऊन आलो त्याचीच आठवण झाली. तसंच वातावरण, गजबज आणि थोडी अस्वच्छता. आणि इथे त्याउप्पर व्यवस्थापनाचा सावळा गोंधळ. 


नीट पाट्या नाहीत, कुठून कुठे जायचे नीट समजत नाही. मंदिरात जाण्यासाठी रांग इकडून तिकडे वळवायला पंढरपूरमध्ये आहे तशी नवीन इमारत बांधली आहे पण त्यावर नीट नामनिर्देश नाही. तिथे तुम्हाला मोबाईल वगैरे सर्व काढून ठेवावा लागतो आणि पुरुष आणि महिलांना वेगळे जावे लागते. अशा परिस्थितीत कोणी हरवले तर मज्जाच. 

आम्ही मोबाईल ठेवत असतानाच तिथले कर्मचारी ओरडायला लागले जल्दी जाओ, जल्दी जाओ, दर्शन बंद हो जायेगा. झालं, मला वाटलं इथे ते इतर मंदिरांसारखं पट बंद झाले तर सावलिया सेठ राहिलं तसं हे सुद्धा राहुन जातं कि काय. आम्ही अगदी पळत पळत गेलो आणि गर्दीत धक्काबुक्की करत कसं तरी दर्शन झालं. 

स्टॅच्यू ऑफ बिलीफ

नाथद्वारामध्येच एक नवीन विश्वास स्वरूपम नावाचं अम्युजमेंट पार्क बनवलं आहे. तिथे मुख्य आकर्षण आहे शंकराचा एक भव्य पुतळा. याचं नाव आहे "स्टॅच्यू ऑफ बिलीफ". यात आपण चित्रांमध्ये किंवा मालिकांमध्ये कैलास पर्वतावर एका पाषाणावर बसलेले महादेव, बाजूला त्रिशुल अशा प्रकारे दाखवले आहेत. हा जवळपास ३५० फुट उंच पुतळा असुन, सध्याच्या घडीला जगातील चौथा सर्वोच्च पुतळा आहे. नाथद्वाराच्या जवळपास फिरताना अनेक किलोमीटर दूरवरून हा पुतळा दिसत राहतो. 

या पुतळ्याच्या अवतीभवती एक भव्य पार्क बनवले आहे आणि त्यात वॅक्स म्युझियम, मिरर हाऊस, हॉरर हाऊस, काही साहसी खेळ, अशी अनेक आकर्षणे बनवली आहेत. तिकीट घेताना याची अनेक वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये तिकिटे आहेत. ते ठरवणं फार गोंधळाचं काम आहे. तुम्ही इथे किती वाजता पोहोचता आणि हाताशी किती वेळ शिल्लक आहे, त्यावरून हा निर्णय घ्यावा लागतो. 

पार्क मधील प्रत्येक गोष्ट सभ्य भाषेत अति व्यावसायिक आणि सरळ भाषेत अति लुटारू आहे. पार्क प्रचंड मोठा आहे. तिकीट खिडकी पासून आत जवळपास पाऊण एक किलोमीटर लांब असेल. त्यांनी तिथे जाण्यासाठी गाड्या ठेवल्या आहेत पण त्याचे वेगळे तिकीट घ्यावे लागते. येताना पुन्हा वेगळे घ्यावे लागते. आत मिळणारे खाद्यपदार्थसुद्धा महाग आहेत. 

पार्कच्या तिकिटातच संध्याकाळी एक लाईट अँड साउंड शो असतो. पुतळ्याच्या समोरच खाली ओपन थिएटर आहे, तिथे बाजुच्या बेंचेस वर जागा मिळाली तर तिथे किंवा मध्यभागी वर्तुळाकार भागात तुम्ही सरळ खाली बसुन हा शो बघु शकता. तो शो सुरु करण्याआधी संपुर्ण पार्क मधील सर्व लाईट बंद केले जातात आणि मग तो शो सुरु होतो. शो मध्ये दाखवलेले काही इफेक्ट आणि संगीत छान आहे, पण २० मिनिटाच्या शो मध्ये दाखवलेली गोष्ट आणि त्याचं निवेदन फार रटाळ होत जातं. मध्ये मध्ये तर काही दृश्य अगदी असंबद्ध वाटतात. 

पार्क नंतर आम्ही जवळच एका ठिकाणी छोटीशी चौपाटी झाली आहे, तिथे जेवलो. रात्री उशिरा उदयपूरच्या हॉटेलमध्ये पोहोचलो. उद्यासाठी थोडी आवराआवरी करून ठेवली आणि झोपलो. उद्या या ट्रिपचा शेवटचा दिवस, आणि या मालिकेला शेवटचा लेख...

क्रमशः। 

Saturday, February 28, 2026

राजस्थानची रोजनिशी : ५ : चित्तोडगड, उदयपूर सिटी पॅलेस

काल संध्याकाळी आम्ही जयपूरहून चित्तोडगडला ट्रेन ने आलो होतो. रात्री इथेच मुक्काम केला आणि आज चित्तोडगढ दर्शन करायचे होते. त्यानंतर इथूनच उदयपूरला जाऊन तिथे उरलेला दिवस जमेल ते पहायचे आणि पुढचे दोन दिवस उदयपूर मध्येच राहायचे होते. 


उदयपूरमध्ये उदयपूर शहरासोबतच थोडे बाहेर असलेले जवळपासची काही ठिकाणं आम्हाला बघायची होती. लांब लांब फिरायचे असल्यामुळे कॅब सोयीची पडेल असा विचार करून आम्ही चितोडगडहूनच तीन दिवस कॅब ठरवली.


मराठी पर्यटक


चित्तोडगडमध्ये रात्री आम्ही जिथे जेवण केले तिथल्या मालकाने मी मराठी आहे हे ओळखले, आणि पुण्याचे का म्हणुन जुजबी गप्पा मारल्या. त्यांचे काही नातलग पुण्यात राहतात म्हणाले. असेच माझ्या बायकोसोबत ती जयपूरमध्ये खरेदी करत असताना झाले. तिथल्या दुकानदाराने सुद्धा ते पुण्याहुन आलेत का अशी चौकशी केली. त्या लोकांना मुंबईची हिंदी आणि पुण्याची हिंदी वेगळी ओळखु येते म्हणे. खरं तर आम्ही पुण्याचे नाही, छ. संभाजीनगरचे. तरी मराठी तर सोडाच आमच्या हिंदीवरही पुण्याचा प्रभाव पडलाय हे कळल्यावर गंमत वाटली.  


आपल्या मराठी मंडळींमध्ये पर्यटनाची खरंच फार आवड आहे. याआधी काही महिने आम्ही उत्तराखंडला गेलो होतो तिथेही मराठी मंडळी प्रत्येक ठिकाणी आसपास असायची. इथे जयपूरला तर रोज केसरी, वीणा वर्ल्ड वगैरे सोबत मोठमोठे मराठी समुह दिसायचे. मला फार माहिती नाही, पण इतर राज्यात अशा मोठ्या प्रवास कंपन्या आहेत का कोणास ठाऊक. तिकडे ग्रुप टूर तेवढ्या प्रचलित नसाव्यात असं वाटतं. एवढे मोठे ग्रुप मराठीच दिसतात. मी एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या ट्रेकला गेलो होतो. तेव्हा तिथला नेपाळी गाईडसुद्धा म्हणाला होता कि आमच्याकडे भारतातले जे लोक येतात त्यापैकी मोठ्या संख्येने लोक महाराष्ट्रातलेच असतात.


इतर समूह म्हटलं तर गुजराती लोक असतात, त्यांच्यात कौटुंबिक एकोपा फार छान दिसतो. त्यांचे मोठे समुह त्यांच्याच कुटुंबीय आणि गोतावळ्याचे पाहण्यात आलेत. दाक्षिणात्य कुटुंबेसुद्धा दिसतात, पण संख्येने थोडे लहान. बाकी सुटीच्या दिवसात त्या त्या राज्यातले स्थानिक लोकही असतात. उत्तराखंडची काही शहरे, जयपुर वगैरे दिल्लीहुन फार पटकन पोहोचण्यासारखी असल्यामुळे तिथे दिल्लीतुन आलेले सुद्धा बरेच लोक असतात.


आमचा चित्तोडगडचा गाइड तर म्हणाला, ये आप लोग का सीजन चल रहा है अभी. हमे सालभर का अंदाजा होता है, मराठी लोग कब आएंगे, बंगाली कब आएंगे. आप लोग गर्मीयोमे या दिवाली के बाद आते हो, वो लोग दुर्गापूजा के बाद आते है. कदाचित असं सुद्धा असेल, मुलांच्या सुट्ट्या बघुन आम्ही प्रवास करतो तेव्हा तीच मराठी लोकांची सोयीस्कर वेळ असल्यामुळे तेव्हा मराठी लोक जास्त दिसत असतील. असो.


चित्तोडगड


चित्तोडगढ हा फक्त किल्ला नाही. एकाच वेळी तो भारताच्या इतिहासातला मानबिंदू आहे आणि त्याचवेळी आपल्या हृदयातली भळभळती जखमसुद्धा. याचे मुळ नाव "चित्रकूट दुर्ग" होते. हा किल्ला प्रचंड विस्तीर्ण आहे. हि अनेक पिढ्या मेवाड घराण्याच्या राजवंशाची राजधानी होती. इथे तब्बल २७ वेळा हल्ले झाले. त्यापैकी २४ वेळा ते परतवुन लावण्यात इथल्या लोकांना यश आले.



ज्या ३ वेळा त्यांना अपयश आले, त्यावेळेस इथल्या महिलांनी मोठ्या संख्येने "जौहर" केला. सावरकरांनी हा शब्द "जय हर" चा अपभ्रंश असावा असा अंदाज केला होता. मध्यपूर्वेतून आलेल्या इस्लामी आक्रमकांची बर्बरता, त्यांचे पराभूतांप्रतीचे क्रौर्य याच्या बऱ्याच कथा आहेत. आपल्या सैन्याचा पराभव अटळ दिसत असेल तर त्यानंतर आपल्या सन्मानास ठेच पोहोचु नये म्हणुन स्त्रिया चितेमध्ये स्वतःहुन उडी घेऊन आत्मबलिदान करत असत. त्यानंतर उरले सुरले योद्धे जीवावर उदार होऊन, मरणाची खात्री असूनही बलवत्तर शत्रुवर चालुन जात असत. केवळ आपल्या गेलेल्या स्वकीयांच्या सन्मानाप्रती आदरांजली म्हणुन. याला "साका" म्हणतात.



मी लहानपणी चौथी पाचवीत असताना आई बाबांसोबत इथे येऊन गेलो होतो. तेव्हाही आम्ही गाइड केला होता आणि इथली माहिती ऐकली होती.
तशी माझी स्मृती चांगलीच आहे, पण इथल्या गोष्टीने मनावर फार परिणाम केला होता.


इथे एक मोठा विजयस्तंभ आहे. राणा कुंभ यांच्या एका युद्धातल्या विजयाच्या स्मृतीसाठी बांधलेला विजयस्तंभ आहे. अतिशय सुंदर, पाहणाऱ्याच्या मनावर लगेच प्रभाव टाकणारा हा स्तंभ आहे.



तिथुन थोडंसंच पुढे गेलं कि लगेच मोडतोड केलेली शिल्पं, काही भग्न अवशेषसुद्धा दिसतात. हा असा विरोधाभास आहे. विजय आणि पराभव दोन्हीच्या खुणा अगदी आजूबाजूला. मी वेरूळला खुपदा गेलेलो आहे. असे भग्न अवशेष पाहुन मला नेहमीच वाईट वाटतं.















लहानपणीच्या इथे दिलेल्या भेटीमुळे राणी पद्मिनीची गोष्ट मला संजय भन्साळीचा चित्रपट येण्याच्या आधीपासुन माहित होती आणि ती पाहुन आश्चर्यही वाटलं नव्हतं. काही "पुरोगामी" मंडळींनी त्यावर विनाकारण टीका केली होती, स्त्रियांना फक्त वस्तु आणि सन्मानाची ट्रॉफी असल्यासारखं दाखवलं आहे असा आक्षेप नोंदवला होता. आपण आजच्या काळातले मापदंड काही शतके आधीच्या काळावर लावणे मला चुकीचे वाटते. आपल्या समाजात भले तेव्हा आणि आज सुधारणेस भरपुर वाव असेल, स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा असेल. पण स्त्रियांना आक्रमकांकडे जी वागणुक मिळत असे तिचा विचार करता, तेव्हाच्या मानी स्त्रियांना मरण श्रेयस्कर वाटलं असेल तर ते समजु शकतं. राणी पद्मिनीची गोष्ट आज सांगितली जाते तशीच घडली असेल का यावर वादविवाद आहेत, पण असे जौहर वेगवेगळ्या काळात झाले होते हे मात्र खरे.




इथे बाजूलाच समाधीश्वर नावाचे महादेवाचे मंदिर आहे. इथला महादेव थोडा वेगळा आहे. तीन मुखे असलेल्या दुर्मिळ रूपात पाहायला मिळतो. तिन्ही मुखांवर वेगळे हावभाव आहे. त्याची गोष्ट गाइडने सांगितली, पण नीटशी लक्षात राहिली नाही. जवळच एक गोमुख कुंड आहे, ज्यातुन सतत जलप्रवाह सुरु असतो, ते आम्ही लहानपणी बघितले होते. ते यावेळी पूर्ण पाण्यात बुडाले होते.





चित्तोडगड हे संत मीराबाईंचे सुद्धा सासरचे घर होते. त्या मेवाड च्या राजवंशातल्या पुत्रवधु होत्या. लग्न झाले असले तरी त्या कृष्णभक्तीत इतक्या लीन होत्या कि त्यांचे नवऱ्याकडे, संसाराकडे हवे तितके लक्ष नव्हते म्हणुन त्यांच्या सासरकडच्या मंडळींनी त्यांचा छळ केला, मारायचे प्रयत्न केले, पण कृष्णाने नेहमी त्यांना वाचवले असे सांगितले जाते. शेवटी त्या द्वारकेत गेल्या आणि तिकडेच कृष्णाच्या मूर्तीत विलीन झाल्या अशी एक कथा आहे. या चमत्कारी कथासुद्धा किती खऱ्या किती खोट्या यावर चर्चा होते. मीराबाईंचे सासरे राणा संगा (संग्रामसिंह) यांनी त्यांच्या विनंतीवरून बांधलेले श्याम मंदिर आजही येथे आपल्याला दिसते. येथे संत मीराबाई कृष्णाची आराधना करत असत असे सांगितले जाते. समोर त्यांच्या गुरु संत रविदासांच्या पदचिन्हांवर बांधलेली छत्रीसुद्धा आहे. आपल्याकडे इतिहास व्यवस्थित लिहुन ठेवण्याची पद्धत उशिरा आल्यामुळे त्यात अनेक वेगवेगळ्या कथा दंतकथांची भर पडते. 


अशीच एक दंतकथा अल्लाउद्दीन खिलजीने राणी पद्मावतीला बघण्याचा हट्ट धरल्यामुळे राणीला एका शीश महालामध्ये आणुन तिचे फक्त प्रतिबिंब क्षणभर दाखवुन तिला परत पाठवले गेले अशी आहे. आम्ही लहानपणी आलो होतो तेव्हाच्या गाइडने हि कथा सांगितली होती आणि ती जागाही दाखवली होती.  तेव्हा उन्हाळा होता आणि फार शुष्क वातावरण होते, मला घरी जाईपर्यंत उष्णतेचा प्रचंड त्रास झाला होता. तेव्हा किल्ला आणि परिसर अगदी कोरडा ठाक होता. यावेळी मात्र चांगला पाऊस पडून गेला होता आणि ती दाखवलेली जागा आज तळ्यात पाण्याने वेढलेली होती. पद्मावत चित्रपटाच्या वेळी झालेल्या वादंगापासुन या कथेवर बराच खल झाला आणि आता असं काही घडलं नाही असं सांगतात. तो गाइड म्हणाला वो तो हमारे बापजादे गाइड लोगोंकी गलती थी. उन्होंने टुरिस्ट लोगोंको बताने के लिये बढा चढा के कोई कहानी बना दी और वही फैल गयी. 


या गाइडला इथल्या इतिहासाचा फार अभिमान होता, आणि तेवढाच जयपूरच्या राजांवर राग होता. त्यांनी मुघलांशी हात मिळवला, मेवाडचे राजा महाराणा प्रतापांवर हल्ला केला, या आणि अशा अनेक बारीक सारीक गोष्टी त्याने सांगितल्या. तेवढं वगळता अतिशय अदबीने आओ सां, पधारो सां अशा पद्धतीने बोलत होता. इथे बरेच लोक अशाच अदबीने बोलतात, ते पाहुन आमच्या मुलांना गंमत वाटली होती. तीही अधुन मधुन खाओ सां, पिओ सां अशी बोलत होती. 


चित्तोडगडला जैन समाजाची अनेक तीर्थस्थळे आहेत. शहरात धर्मशाळा आहेत. अनेक शतकांपासुन इथे जैन मुनी, जैन व्यापारी यांचा वावर आहे. जैन व्यापारी आणि मेवाडच्या राजांमध्ये चांगले संबंध होते. भामाशाह नावाच्या व्यापाऱ्याने महाराणा प्रतापांना  बरीच मदत केली होती. त्यापैकी काही आम्ही बाहेरून बघितली. 


सावलिया सेठ


चित्तोडगडहुन आम्ही कॅबने उदयपुरकडे निघालो. वाटेत एक सावलिया सेठ नावाचे मंडफिया गावात एक प्रसिद्ध कृष्ण मंदिर आहे तिथे जायचे होते. इथल्या कृष्णाचे वैशिष्ट्य असे कि हा व्यापारी वर्गात या मंदिराविषयी विशेष श्रद्धा आहे. त्याला व्यापारात भागीदार म्हणुन ठेवले तर आपली भरभराट होते अशी मान्यता आहे. अनेक व्यवसायांमध्ये कृष्ण याप्रकारे मानलेला भागीदार आहे. त्याच्या वाट्याची म्हणुन काही रक्कम देवधर्मासाठी बाजूला ठेवली जाते. त्यामुळे याला "सेठोका सेठ" असेही म्हणतात. 


पण आम्ही तिथे येईपर्यंत तिथे पट बंद होण्याची वेळ झाली होती. मी पहिल्या भागात या बद्दल सांगितले आहे. इथल्या मंदिरांमध्ये आरती, भोजन, विश्राम अशा वेगवेगळ्या निमित्ताने पट म्हणजे देवासमोर पडदे लावुन दर्शन बंद करतात. त्याची वेळ गाठणे आव्हानात्मक असते. आमची वेळ चुकली. आज कॅब दिवसभर आमच्या ताब्यात होती, चित्तोडगड आणि उदयपूर मिळुन आमचे दिवसाला ३०० किमान किमी ठरलेले असतात तेही होणार नव्हते. त्यामुळे पहाटे लवकर इथे येऊन परत चित्तोडगड किल्ला बघायला गेलो असतो तरी चालले असते. पण हि झाली पश्चातबुद्धी. आम्ही कृष्णाला बाहेरूनच नमस्कार करून पुढे निघालो. पुन्हा जोराचा पाऊस झाला. वाटेत जेवण करून आम्ही उदयपूरला पोहोचलो. 


उदयपूर सिटी पॅलेस


उदयपूरलाही कमी अधिक जोराने पाऊस होताच. आता कुठली आऊटडोअर ठिकाणे पाहण्यात अर्थ नव्हता. आम्ही सिटी पॅलेसला गेलो. उदयपूरचा सिटी पॅलेस अतिशय भव्य आहे. इथे तिकिटे, पार्किंग फीस, तिथल्या तिथे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मॉल मध्ये असतात तशा गाड्या आहेत. सगळ्याच गोष्टी अतिशय महाग आहेत. पार्किंग ५०० रुपये, ती गाडी एका दिशेने जाण्यासाठी १०० रुपये, परत येताना वेगळे पैसे. इतकी भरगच्च गर्दी असुन एवढी लुट कशासाठी असा प्रश्न पडला. 



महाराणा प्रतापांचे वडील उदयसिंग यांनी चित्तोडगडावर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे स्वकीयांच्या सल्ल्यावरून हे शहर वसवले आणि राजधानी बनवली. त्यामुळे याचे नाव उदयपुर. नंतरच्या अनेक पिढ्यांनी महालाच्या रचनेत भर घालत घालत आज या स्थितीत आणलेला आहे. महाराणा प्रतापांना मात्र या शहरात फारसे वास्तव्य करता आले नाही. त्यांचे बरेचसे आयुष्य जंगल आणि अरावली पर्वतात गनिमी काव्याने लढण्यात गेले. 


इथे राजांची वंशावळ, त्यांच्या वापरातली हत्यारे, माणिक मोती अशा बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. 






महालात फिरताना आपण कुठून कुठे जात आहोत हे आपल्याला समजत नाही. एका खोलीतुन दुसऱ्या खोलीत जाण्याचे रस्ते, जिने सगळे अगदी अरुंद आणि चिंचोळे बांधले आहेत. महाल एवढा मोठा असताना इथे जागा कमी का याचे उत्तर म्हणजे कोणी महालात हल्ला करायला आले तर त्यांना एक एक करून यायला आणि मोठे हत्यार न उगारता यायला भाग पडावे यासाठी. 













राजस्थानी चित्रांमध्ये गोष्ट सांगण्याची एक शैली आहे. कॉमिक बुक मध्ये जसं प्रत्येक प्रतिमेत वेगळा प्रसंग किंवा प्रसंगांची मालिका असते तसं इथे नसतं. एखादी घटना आणि त्यातले क्रमानुसार घडलेले वेगवेगळे क्षण इथे एकाच चित्र प्रतिमेत दाखवलेले असतात. त्यामुळे ती घटना माहित नसेल तर थोडं समजायला अवघड जाऊ शकतं. नमुना म्हणुन मी एका चित्राचा फोटो काढला आहे, यात राजा एका वृक्षावर बसलेला आहे आणि अस्वलाची शिकार करतानाचा प्रसंग आहे. यात अस्वल आडोशातुन बाहेर निघाले, झाडाजवळ आले अन मग शिकारीनंतर मरून पडले अशा अस्वलाच्या हालचाली आहेत, पण प्रथमदर्शनी पाहताना वाटेल जंगलातील अनेक अस्वले दाखवली आहेत. तसे नसुन हा आत्ता सांगितलेला घटनाक्रम आहे. 



उदयपूरला सिटी ऑफ लेक्स म्हणजे तलावांचे शहर म्हटले जाते. हे तलाव मानव निर्मित आहेत. राजस्थान म्हणजे वाळवंट अशी प्रतिभा घेऊन समजा कोणी राजस्थानात पहिल्यांदा उदयपूरला आले तर त्यांना आश्चर्याचा धक्का बसेल. या तलावातही जलमहाल, जगत मंदिर पॅलेस असे महाल बांधले आहेत. तिथे अत्यंत महागडे हॉटेल आणि रेस्टॉरंट आहे. या सगळ्याचे दृश्य सिटी पॅलेस मधुन छान दिसते. 









राजस्थानी सांस्कृतिक कार्यक्रम





पॅलेस पाहिल्यावर आम्ही पॅलेससमोरच्याच गल्ल्लीत "विरासत" नावाचा एक अतिशय सुंदर राजस्थानी सांस्कृतिक कार्यक्रम पाहिला. पपेट शो तर आधी सांगितल्याप्रमाणे ठिकठिकाणी होते आणि चोखी धानीमध्ये लोककलांचे सादरीकरणही पाहिले होते. पण त्या सर्वांचा दर्जा आणि इथल्या दर्जामध्ये जमीन अस्मानाचा फरक होता. इथे सर्व उच्च प्रतीचे व्यावसायिक कलावंत, छान बसवलेले संगीत आणि नृत्य सादरीकरण पाहायला मिळाले. इथुन जवळच गणगौर घाटावर गेल्या अनेक वर्षांपासुन असा कार्यक्रम प्रसिद्ध आहे, तिथल्याच काही कलावंतांनी आपला वेगळा चमु घेऊन इथे सादरीकरण सुरु केले आहे. 













याच गल्लीच्या तोंडाशी जगदीश्वर नावाचे उंचावर बांधलेले मंदिर आहे. तिथे छान दर्शन झाले. थोडे राजस्थानी बोलीभाषेतले भजन ऐकायला मिळाले. 












आमचे हॉटेल बंजारा हेरिटेज इथुन जवळच होते. ऑनलाईन बुकिंग करताना आपल्याला काही गोष्टींचा अंदाज येत नाही. आमचे हॉटेल छान होते, जागा छान होती. पण इथल्या अत्यंत गजबजलेल्या भागात. सिटी पॅलेस जवळ रस्ते फार छोटे आहेत, चढ उताराचे आहेत आणि अनेक ठिकाणी वन वे आहे. पॅलेस नंतर वर सांगितलेली दोन ठिकाणे आम्ही पायीच फिरलो. कॅब वाला पॅलेसच्या पार्किंगमध्ये थांबलेला होता. त्याला नेमके आमच्या हॉटेलच्या गल्लीमध्ये गाडी आणता येणार नव्हती. 


सिटी पॅलेसच्या गल्लीमध्ये एक सशुल्क पार्किंग होती, मी त्याला तिथे बोलावुन घेतले. कुटुंबाला हॉटेलमध्ये चेक-इन करून रुममध्ये सोडले. कॅबवाला सशुल्क पार्किंगमध्ये पोहोचल्यावर तिथुन सामान एका रिक्षात टाकले आणि मग हॉटेलमध्ये आणले. 


त्याच हॉटेलमध्ये टेरेस रेस्टॉरंट होते. इथल्या गल्ल्यांमध्ये अशा अनेक छोट्या पण उंच बिल्डिंग आहेत आणि त्यावर रूफ टॉप रेस्टॉरंट आहेत. त्यांना लेकचा छान व्ह्यू आहे. त्यादिवशी पावसामुळे ढगाळ वातावरणामुळे नीट दिसत नव्हते. पण इतर दिवशी दिसत असेल. तिथे संध्याकाळची हवा, योग्य आवाजात संगीत आणि एकंदर वाईब मस्त होती. जेवणही छान होते. इथे यायचा कुटाणा होत असला तरी इथली सेवा, जेवण, एकूण मुक्काम आम्हाला आवडला. 



प्रसन्न वातावरणात आणखी एक दिवस संपला. 


क्रमशः।