साहित्य संमेलनातलं मोदीजींचं आणि संमेलनाध्यक्षांचं भाषण ऐकलं आणि एका माहित असलेल्या गोष्टीची पुन्हा जाणीव झाली.
मराठीला सरकारने अभिजात दर्जा दिल्यामुळे सरकार जे काही उपक्रम सुरु करेल त्याचा आर्थिक लाभ काही मराठी मंडळींना नक्कीच होईल. पण मराठीला लाभ तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही आम्ही जाणीवपूर्वक मराठीसाठी काही करू.
दुसऱ्यांशी संवाद साधायला म्हणुन भाषा हा अगदी प्राथमिक उपयोग झाला. आपल्याला ज्या संस्कृतीचा अभिमान असतो ती आपल्यापर्यंत पोहोचते ती भाषेमुळेच. भाषा आपल्याला माध्यम तर देतेच पण ओळख सुद्धा देते.
मराठीचे मोठमोठे कार्यक्रम होत असले तरी मराठी शाळा, मराठी चित्रपट, मराठी पुस्तकं या सगळ्यांची परिस्थिती चिंताजनक असल्याचं सगळेच नेहमीच म्हणतात.
बऱ्याच जणांना, विशेषतः इंग्रजी माध्यमात शिकलेल्यांना, शिकणाऱ्यांना मराठी शब्दांचे अर्थ इंग्रजी शब्द वापरून समजवावे लागतात.
हिब्रू पुनरुज्जीवन
तामिळ, मल्याळम इत्यादी लोकांच्या भाषाप्रेमाचं आपल्याला उदाहरण माहितीच असतं. आज एक उदाहरण देतो ज्यु लोकांचं.
अगदी साधारण ७०-८० वर्षांपूर्वी इस्राईल हे राष्ट्र बनलं, जगभर विखुरलेले ज्यू लोक तिथे एकत्र यायला लागले. सर्वांची वापरातली भाषा इंग्रजी, रशियन, फ्रेंच, जर्मन अशी वेगवेगळी होती.
त्यांनी निश्चय करून तब्बल १८०० वर्ष फक्त धार्मिक पुस्तकात अडकून असलेली हिब्रू भाषा अंगिकारायची ठरवली. त्याचे व्याकरण, शब्दकोश यावर काम करून सर्वांना शिकवली. वापरात आणली. आज ते मेसेजेस आणि चॅटिंगसुद्धा हिब्रूमध्ये करतात. त्यांचा संगणक असो कि मोबाईल त्यावर हिब्रु टायपिंग त्यांनी सुलभ करून ठेवलंय.
आपल्या भाषेवर आणि संस्कृतीवर प्रेम असेल तर सगळं शक्य आहे. आपल्यापुढे आव्हान त्यांच्याइतकं खडतर नक्कीच नाही. आपली भाषा जिवंत आहे, वापरात आहे, फक्त तिचा सामाजिक आयुष्यात प्रभाव कमी होतोय. तो टिकवायचा आहे आणि वाढवायचा आहे.
माझ्या परीने मी मराठीसाठी म्हणुन काही संकल्प करतोय:
१. दर महिन्याला किमान एक मराठी पुस्तक वाचणार
मोबाईल आणि इतर मनोरंजनाच्या पर्यायामुळे माझं पुस्तक वाचन हल्ली फार कमी झालं होतं. तेही मार्गावर येईल आणि नवीन लेखकांची ओळख होईल.
ज्या भाषेत नवीन लिखाण नवीन वाचन होत राहील तर ती अर्थातच बहरत राहील.
२. दर महिन्याला किमान एक मराठी चित्रपट पाहणार
मराठी चित्रपटांना चित्रपटगृहात चांगले शो मिळत नाहीत, मुंबई पुण्याच्या पलीकडे पोहचत नाहीत हे तर नेहमीच ऐकतो. पण अशात ऐकलं कि आता नेटफ्लिक्स ऍमेझॉन सारख्या OTT वरही मराठी चित्रपट घेत नाहीत.
चांगले चित्रपट नाहीत - शो नाहीत - शो ला प्रेक्षक नाहीत - प्रेक्षक चांगल्या चित्रपटांच्या प्रतीक्षेत हे वर्तुळ तोडायला सर्वांनाच आपल्या परीने प्रयत्न करावे लागतील.
३. दर महिन्याला किमान एक मराठी ब्लॉग लिहिणार
माझा ब्लॉग आहे पण अगदी अनियमित, सुचेल तेव्हा वाटेल तेव्हा. मोदींनी आपल्या भाषणात सोशल मीडियावर लिखाण करणारे सुद्धा भाषेसाठी योगदान देत असतात असा उल्लेख केला. सर्वांची मजल थेट पुस्तकं लिहिण्या-वाचण्यापर्यंत पोहचत नाही. पण आपापल्या भाषेत छोटामोठा कंटेंट बनवणे हे सुद्धा नवीन प्रकारचं योगदान आहे.
दिसामाजी काहीतरी लिहावे म्हणतात ते निदान मासामाजी तरी करून बघतो.
४. marathigoshti.com वर दर महिन्याला किमान दोन नवीन गोष्टी लिहिणार
या नावाची माझी एक मराठी कथा गोष्टींसाठीची वेबसाईट आहे. इसापनीती, बोधकथा, सणवारांच्या कथा अशा अनेक गोष्टी मी यावर लिहिल्या आहेत. बरेच जण त्यावर वाचत असतात.
वेळेअभावी बरेच दिवस यावर मला काही नवीन लिखाण जमले नव्हते. तेही आता यानिमित्ताने पुन्हा सुरु करतो.
हे सर्व जाहीर करण्याचं कारण
अर्थातच मराठीसाठी आपण सक्रियपणे काय करु शकतो असा सर्वांनी विचार करावा हे सुचवावे म्हणुन.
मराठी भाषेला, मराठी चित्रपट, नाटक, संगीत, पुस्तकांना, मराठी ब्लॉग्सला, जे जे मराठी आहे त्या सर्वांना राजासारखा मान मिळाला तर ती राजभाषा.
सर्व मराठी जणांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा.