महाशिवरात्रीच्या दिवशी मुलांना शाळेला सुट्टी असल्यामुळे त्यांना कुठे तरी नेऊन आणावं असा विचार आला. कात्रज रोडला असलेल्या शिवसृष्टीची आठवण झाली आणि तिथे जायचं ठरवलं.
समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया शिवसृष्टी
अशी काहीशी त्यांची टॅग लाइन आहे आणि ती त्यांनी सार्थ केली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून उभी राहिलेली ही शिवसृष्टी त्यांच्या लौकिकाला साजेशी झाली आहे. त्याचा आत्ताशी कुठे पहिला टप्पा पूर्ण झाला आहे, उर्वरित भागाचं काम अजुन काही वर्ष चालेल.
आत्ता अशात लल्लनटॉप या युट्युब चॅनलवर एका भारतीय इतिहासावर भरपूर संशोधन केलेल्या एका ब्रिटिश अभ्यासकाची मुलाखत पाहिली. ( लिंक )
इतिहासात रुची असणाऱ्या कोणीही आवर्जुन बघावी अशी हि मुलाखत होती. त्यात शेवटी त्यांनी भारतात इतिहासाकडे किती दुर्लक्ष केलं जातं, इतका प्राचीन आणि समृद्ध वारसा आपल्याकडे असुन त्याची किती वाईट अवस्था आहे, आपली संग्रहालये कशी देखरेखीविणा धुळ खात पडलेली असतात अशा गोष्टींवर खंत व्यक्त केली आहे.
त्याला अपवाद ठरावी अशी ही शिवसृष्टी झालेली आहे. तिच्या नावात त्यांनी सृष्टी हा शब्द जो वापरलाय तो फार समर्पक आहे. कारण इथे म्युझियम किंवा संग्रहालय म्हटलं की जो निर्जीव इतिहास समोर येतो तसं नाही तर शिवरायांचा इतिहास जिवंत करून दाखवण्याचा उत्तम प्रयत्न केलेला आहे.
हे लक्षात घेऊन विकसित देशांमध्ये जी संग्रहालये आहेत तिथे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ऐतिहासिक गोष्टींच्या सोबतीला आकर्षक देखावे, दृक्श्राव्य माध्यमातले खेळ, ऑडिओ गाईड असे प्रयोग केलेले असतात. भेट देण्यास आलेल्या लोकांमध्ये कुतूहल कसं जागृत ठेवता येईल, बाहेर पडेपर्यंत त्यांना कसं उत्साही ठेवता येईल यासाठी प्रयत्न केलेले असतात. संग्रहालयामध्ये काही विभाग कायमचे आणि काही जागेत वेगवेगळ्या विषयांवर (उदा. व्हिक्टोरिया कालखंड, नेपोलियन कालखंड ई.) विशेष मेहनत घेऊन मर्यादित कालावधीसाठी प्रदर्शन ठेवतात जेणेकरून आधी येऊन गेलेल्या लोकांनाही परत यावंसं वाटावं.
आपल्याकडची बहुतांश संग्रहालये सरकारच्या अखत्यारीत असल्याने लोक आले काय गेले काय फरक पडत नसल्यासारखं व्यवस्थापन असतं. त्यामुळेच खाजगी प्रयत्नातून शिवसृष्टीसारखे प्रकल्प उभे राहायला हवेत आणि त्याला लोकांचा पाठिंबा मिळायला हवा.
तुम्ही आजवर इथे भेट दिली नसेल तर तुम्हाला कल्पना यावी म्हणुन तिथे काय काय आहे याची सविस्तर माहिती देतोय:
संग्रहालय:
शस्त्रास्त्रे: पारंपरिक संग्रहालयाप्रमाणे इथेही एक विभाग शिवकालीन शस्त्रास्त्रांचा आहे.
रणांगण: शिवरायांच्या आयुष्यात त्यांनी सामना केलेल्या बहुतांश शत्रूंची चित्रे उपलब्ध आहेत. त्यांचा एक विभाग आहे.
या दोन्ही विभागात शिवसृष्टीचे मार्गदर्शक सविस्तर माहिती देतात. आपणच आपल्या चार वस्तु बघुन पुढे सरका असा प्रकार नाही. सर्व शस्त्रांची माहिती, ते कसे बनवतात, कुठल्या प्रकारचे योद्धे / सैनिक कुठल्या प्रसंगात वापरत असत याची माहिती सांगतात. सर्व शत्रूंच्या चित्रासमोर त्यांची माहिती थोडक्यात सांगतात.
दृक्श्राव्य खेळ:
जाणता राजा
"जाणता राजा" हे समर्थ रामदासांनी केलेल्या शिवरायांच्या वर्णनाचा एक भाग आहे. याच नावाचं बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेलं एक नाटक माझ्या लहानपणी महाराष्ट्रभर गाजलं होतं. खरेखुरे हत्ती घोडे, अस्सल वाटणारे किल्ले आणि दरबाराचे मोठाले सेट्स, मोठ्या संख्येत दाखवलेल्या सैनिकांमुळे खऱ्या वाटणाऱ्या लढाया अशा भव्य नेपथ्य आणि आयोजनामुळे नेहमीपेक्षा अतिशय वेगळा अनुभव देणारं हे नाटक होतं. त्यामुळे याला महानाट्य म्हणायचे. मला आठवतंय याचा एक दौरा छत्रपती संभाजीनगर ला तेव्हा आला होता आणि काही दिवस सलग तिथे खेळ होते, आणि प्रचंड प्रतिसाद होता. मी रोज बाबांच्या मागे लागायचो पण त्याची तिकिटे आम्हाला मिळाली नाहीत.
तर या नाटकाच्या काही संपादित केलेल्या महत्वाच्या प्रसंगांची एक क्लिप सध्या इथे दाखवली जाते. शिवसृष्टीच्या पुढच्या टप्प्यात या नाटकासाठी कायमस्वरूपी नाट्यगृहाची व्यवस्था असणार आहे, आणि तिथे त्याचे नियमितपणे प्रयोग केले जातील. हे सुरु होईल तेव्हा लहानपणी हुकलेली हि संधी साधण्याचा प्रयत्न मी नक्की करेन.
सिंहासनाधिश्वर
शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा झाला तेव्हा एक इंग्रज अधिकारी उपस्थित होता हे सर्वांना माहित आहे. तो शिवरायांना भरलेल्या दरबारात मुजरा असलेलं चित्र सुप्रसिद्ध आहे. तर या अधिकाऱ्याने त्या सोहळ्यात पाहिलेल्या गोष्टी आणि शिवरायांच्या आजूबाजूला असलेली राजचिन्हे याचं सविस्तर वर्णन लिहुन ठेवलं होतं. (आपल्याकडे अशा सविस्तर नोंदी करण्याची सवय फार आधी लागायला पाहिजे होती. अनेक ऐतिहासिक वादविवादांना कारण राहिलं नसतं.)
या वर्णनात आलेल्या वस्तु, छत्र चामरे, राजदंड, राजमुद्रा, शिवकालीन नाणी अशा गोष्टी इथे ठेवल्या आहेत आणि समोर या डायरीचे अभिवाचन एका स्क्रीनवर दाखवले जाते. राज्याभिषेकाच्या वेळेसचे रायगडावरचे वातावरण आपल्या डोळ्यासमोर उभे राहते.
श्रीमंत योगी
इथे शिवरायांच्या एका आज्ञापत्राच्या आधारे शिवरायांची स्वराज्य स्थापन करण्यामागे काय दृष्टी होती, काय स्वप्न होतं, त्यांनी कोणती मूल्ये जोपासण्याचा प्रयत्न केला हे स्वतः शिवरायांच्या मुखातुन ऐकायला मिळतं. शिवरायांचा एक पुतळा, रोबोटिक्स तंत्रज्ञानाच्या आधारे हालचाली करतो, बोलतो आणि आपल्याशी संवाद साधतो. त्यांच्या वेळेसची परिस्थिती आणि त्यांनी केलेल्या संकल्पाची माहिती देतो. शिवराय आपल्याशी बोलत असल्याचा भास होतो.
आग्र्याहुन सुटका
शिवरायांची आग्र्याहुन सुटका हा त्यांच्या आयुष्यातला प्रचंड महत्वाचा आणि परिचित असलेला प्रसंग. मिर्झा राजा जयसिंग याने त्यांना आग्र्यात जायला भाग पाडलं होतं आणि त्यांच्या सुरक्षेची आणि पाहुणचाराची जबाबदारी त्याचा मुलगा रामसिंग याकडे होती. तर या पितापुत्रांच्या चाकरीत असलेल्या एक कारकुनाने शिवराय आग्र्यात असताना परिस्थिती कशी बदलत गेली, कसं राजकारण घडत गेलं हे लिहुन ठेवलेलं आहे. तर त्याचा एक पुतळा समोर मध्यभागी आहे, एका बाजूला आग्र्याच्या दरबाराचा देखावा आहे, तिथे औरंगजेबाच्या लोकांचं राजकारण दिसतं आणि दुसरीकडे शिवरायांच्या आग्र्यातील निवासस्थानाचा देखावा आहे आणि तिथे घडणाऱ्या घडामोडी या सर्वांचं वर्णन त्या कारकुनाकडून ऐकायला मिळतं.
या रोचक प्रकरणाचे तपशील आपल्याला रंजक पद्धतीने समजतात.
रायगड सफारी (5D)
स्वराज्याची राजधानी रायगड हा भव्य असा किल्ला आहे. यावरचे मुळ महाल, कार्यालय, बाजारपेठ आता अस्तित्वात नसले तरी यांचे अवशेष इतर किल्ल्यांच्या तुलनेत बऱ्याच चांगल्या परिस्थितीत आहेत आणि त्यावरून किल्ल्यावरच्या त्याकाळच्या परिस्थितीची कल्पना येते. मी नुकताच रायगडावर जाऊन आलो आणि याआधीही २-३ वेळा गेलोय त्यामुळे तिथली दृश्य माझ्या डोळ्यासमोर होतीच.
ज्यांनी रायगड आजवर पाहिलेला नाही त्यांनाही तो जवळुन पाहिल्याचा अनुभव हा 5D शो देतो. तुम्ही इतर ठिकाणी असे 5D/6D/10D प्रकार पाहिले असतील तर तुम्हाला अंदाज असेलच. रायगडचं ड्रोन ने घेतलेलं चित्रीकरण, त्यावर ऍनिमेशनच्या साहाय्याने आता जिथे फक्त अवशेष आहेत तिथे प्रत्यक्षात कशा वास्तु असतील याची कल्पना केलेलं चित्रण (आता आलेल्या छावा चित्रपटातही या प्रकारचं चित्रण आहे) दिसतं. तिथली सर्व व्यवस्था समजते.
अशा दोन्ही प्रकारे चित्रण असल्यामुळे मला हा शो आवडला. फक्त माझ्या मते हा फक्त ३D चालला असता. युद्धप्रसंग नसल्यामुळे उगाच खुर्च्या पुढे मागे हलवुन बळजबरी ५D केला असं वाटलं. शिवसृष्टीमधे खटकलेली केवळ हीच एक गोष्ट.
दुर्गवैभव
मला प्रचंड आवडलेला हा विभाग. काही प्रमुख किल्ल्यांच्या मोठ्या आकारातल्या प्रतिकृती इथे बघायला मिळतात. पण इथेही त्याला सुंदर कल्पनांची जोड दिली आहे. प्रत्येक किल्ल्याच्या मागे पडद्यावर काही दृश्य दिसतात, तिथले गाईड किल्ल्याची माहिती सांगतात, आणि माहिती आणि दृश्याच्या अनुषंगाने किल्ल्याच्या प्रतिकृतीच्या त्या त्या भागात विशेष प्रकाशझोत टाकुन तो अधोरेखित केला जातो. किल्ल्याची माहिती फार नव्या आणि उद्बोधक पद्धतीने आपल्याला समजते.
पन्हाळगड - विशाळगड हे जवळ असलेले किल्ले, तिथला सिद्दी जौहरचा वेढा आणि एका पावनखिंडीतली ती शौर्यगाथा इतक्या चांगल्या प्रकारे कधीच समजली नव्हती. पावनखिंड या सिनेमात सुद्धा नाही. इथे उभ्या केलेल्या प्रतिकृती, विशिष्ट प्रकारे सांगितलेली माहिती, त्याला पूरक अशी प्रकाश योजना, हलत्या सावल्यांमुळे महाराजांचं पथक नेमकं कुठून कुठे गेलं, त्यांची आणि सिद्दीच्या सैन्याची गाठ कुठे कुठे पडली, बाजीप्रभू आणि बांदल सेनेने त्यांना कुठे थोपवून धरलं हा सगळा घटनाक्रम फार फार स्पष्टपणे समजतो.
स्वराज्याच्या इतिहासात भूगोलाला, सह्याद्रीला, गनिमी काव्याला इतकं महत्व का आहे, हे इथे येऊन समजतं. माझ्या मते तरी या बाकी सर्व सुंदर विभाग तर आहेतच, पण या एका विभागासाठी सर्वांनी आवर्जून यावं.
दुसऱ्या टप्प्यातले काही सुरु झालेले विभाग
आतापर्यंत सांगितलेले सर्व विभाग शिवसृष्टीच्या एकाच इमारतीत होते. तिचं नाव "सरकार वाडा" असं ठेवलं आहे. दुसरीकडे अद्याप बांधकाम चालु आहे. परंतु त्यातील काही विभाग नुकतेच सुरु झाले होते आणि भवानी मंदिराची प्राणप्रतिष्ठा तर अगदी आम्ही जायच्या दोन दिवस आधी झाली होती. त्यामुळे सुदैवाने हे भाग आम्हाला पाहता आले.
शिवरायांची अस्सल चित्रे
एका भव्य दालनात शिवरायांच्या समकालीन कलावंतांनी काढलेली त्यांची चित्रे मोठ्या आकारात लावलेली आहेत. शिवरायांनी इतर राजांप्रमाणे स्वतः कधी चित्रकाराला बोलवून स्वतः त्याच्यासमोर बसुन चित्र काढलं नाही. तेवढा निवांत वेळ त्यांच्या दगदगीच्या आयुष्यात मिळाला नसेल आणि त्यांच्या लेखी याला प्राधान्यही नसेल. आपल्या नशिबाने इतर लोकांनी वर्णनाप्रमाणे काढलेल्या चित्रांमुळे आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वाचं दर्शन होतं.
चित्रांसोबत इथे त्यांनी स्वतः लढलेल्या लढायांची माहिती आहे.
या दालनाच्या मध्यभागी शिवसृष्टीची संपूर्ण संकल्पना दाखवणारं एक मॉडेल आहे. शिवसृष्टीचे लोक इथे पूर्ण संकल्पना आणि पुढे येऊ घातलेले विभाग यांची माहिती देतात.
गंगासागर तलाव
रायगडावर असलेल्या गंगासागर तलावाची प्रतिकृती. इथे वेगवेगळ्या नद्या आणि किल्ल्यांवरचं पाणी आणुन टाकलेलं आहे.
प्रतापगड सारखं भवानी मंदिर
आपण जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा देतो त्याचं कारण भोसले कुळाची आणि पर्यायाने स्वराज्याची कुलदेवता होती तुळजापूरची भवानी माता. शिवरायांच्या कालखंडात तुळजापुर आदिलशाही भागात असल्याने त्यांना तिथे जाण्यावर मर्यादा येत असाव्यात. त्यामुळे शिवरायांनी प्रतापगडावर भवानी मंदिर बांधलं होतं.
त्या मंदिराची हि प्रतिकृती आहे. आणि चांगली गोष्ट म्हणजे हे फक्त देखाव्याचं मंदिर नाही. इथे पद्धतशीर प्राणप्रतिष्ठा पूजा करून मूर्ती बसवलेली आहे, त्यामुळे आपल्याला भवानीच्या मंदिरात जाऊन दर्शनाचा आनंद मिळतो.
स्वराज्य स्वधर्म आणि स्वभाषा
शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलंच, पण स्वधर्म म्हणजे हिंदू/ सनातन धर्माला पुन्हा सन्मान मिळवून दिला. काही शतकांच्या अंतराने एक अभिषिक्त हिंदु राजा आपल्याला मिळाला. नेतोजी पालकर यांना पुन्हा हिंदु धर्मात घेऊन एक क्रांतिकारी पाऊल उचललं.
आणखी एक दुर्लक्षित योगदान म्हणजे त्यांची स्वभाषा मराठी यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न. शिवजयंतीला फेसबुकवर मी एक पोस्ट पाहिली होती त्यात दोन पत्रांची तुलना होती. एक शिवरायांच्या कारकिर्दी आधीचं जे मराठीत असुनही आपल्याला अजिबात कळत नाही कारण त्यात अर्धेअधिक शब्द आणि वाक्यरचना फारसी आहे. दुसरं शिवरायांच्या राज्याभिषेकानंतरचं. यातलं मराठी जुनं असलं तरी थोडा अर्थ लागू शकतो.
"न होता शिवाजी तो सुन्नत होती सबकी" हे एक प्रसिद्ध वाक्य आहे. त्याजोडीला "नसते छत्रपती शिवाजी तर नसती भाषा मराठी" असंही म्हणायला हरकत नाही. कदाचित मी फारसी ब्लॉगर झालो असतो.
तर स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा यासाठीचं शिवरायांचं योगदान एका अनोख्या प्रयोगात आपल्याला बघायला मिळतं. एरवी नाटकात वेगळे सेट जरी असले तरी प्रेक्षक एकाच जागी स्थिर असतात आणि सेट फिरवतात. इथे आपण मध्यभागी प्रेक्षागृहात बसतो आणि संपूर्ण प्रेक्षागृह गोल फिरतं आणि वेगवेगळ्या स्क्रीन्स वर अगदी अस्सल वाटणारे देखावे आपल्याला बघायला मिळतात. इथल्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे आशिया खंडातील हा असा एकमेव प्रयोग आहे.
तिकीट - मोठ्यांसाठी (१६ वर्षे आणि वर) ६०० रु.
वय ५ ते १६: ३०० रु.
त्याखालील मुलांना तिकीट नाही.
संकेतस्थळ - तिकिटे बुक माय शोवरही उपलब्ध आहेत, पण ते अतिरिक्त शुल्कही आकारतात, त्यामुळे इथे येऊन काढलेलं बरं.
वेळ: सकाळी ९.३० ते ६
वर सांगितलेल्या सर्व गोष्टी बघायला जवळपास ४ तास लागतात. त्यामुळे तशा तयारीने यावे.
खाण्यापिण्याची सोय:
तिथे २-४ ठिकाणी वॉटर कुलर आहेत, त्यामुळे पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
एक छोटे उपहारगृह आहे तिथे काही मोजके पदार्थ मिळु शकतील.
सर्व परिसर आणि वॉशरूम मधली स्वच्छता चांगली आहे.
आवाहन
इतका छान प्रकल्प आपल्याकडे सुरु होऊनही त्याला प्रतिसाद मोठ्या संख्येने दिसत नाही. आम्ही गेलो तो शाळेच्या सुटीचा दिवस असुनही काहीच गर्दी नव्हती. आम्ही सोडुन इतर १०-१५ लोक होते.
ह्याची खंत तिथल्या कर्मचाऱ्यांच्या बोलण्यातूनही व्यक्त झाली. बोलता बोलता त्या म्हणाल्या आमच्या इथे दुसऱ्या गावातुन, दुसऱ्या राज्यातून आलेले लोकसुद्धा येऊन गेले पण पुणेकर मात्र काही येत नाहीत.
तेव्हा पुणेकरांनो, सर्वांना विनम्र आवाहन. शिवरायांची कारकीर्द सुरु झालेलं ठिकाण म्हणजे पुणे. त्यांची जडणघडण इथल्या लालमहालात झाली. आपल्या इतक्या जवळ असा भव्य प्रकल्प असताना आपला प्रतिसाद उदंड असला पाहिजे, तर असे काम करणाऱ्यांना बळ मिळतं, तो इतिहास ती प्रेरणा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते. त्यामुळे नक्की वेळ काढुन इथे भेट द्या. मुलांनाही घेऊन जा.
पूर्ण होईल तेव्हा बघु असा विचार करू नका. आताच ४ तास सहज जातील एवढ्या गोष्टी आहेत. याचे पुढचे टप्पे सुरु होईल तेव्हा वेळही जास्त लागेल, तिकीट दरही वाढेल, तेव्हा नवीन गोष्टी पाहण्यासाठी परत या. आपल्या इतिहासासाठी आपल्या वारशासाठी आपणच सढळहस्ते हातभार लावला पाहिजे.
आणि इतर ठिकाणी राहणाऱ्या शिवप्रेमींनो, तुम्हीही पुण्यात याल तेव्हा शिवसृष्टीसाठी वेळ राखुन ठेवा. सुट्ट्यांमध्ये त्यासाठी खास पुण्यात या. लालमहाल, शनिवारवाडा, मंदिरे, सिंहगड आणि इतर किल्ले आणि याव्यतिरिक्त वेळ घालवायला पुण्यात बरीच आकर्षणे आहेत. त्यामुळे एक हेरिटेज ट्रिप पुण्यात होऊन जाऊ देत.
जय भवानी जय शिवराय